परदेशी
पाहुण्यांबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज
Oreochromis mossambicus |
२००३ च्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या कठाणी
नदीत मासे पकडता पकडता अचानक एक नविनच मासा सापडला. असा मासा मी कधीच बघितला
नव्हता. नंतर समजलं की तो पुर्व आफ्रिकेतल्या नद्यांमध्ये आढळणारा तीलापीया नावाचा
स्थानीक माश्यांचा कर्दनकाळ मासा आहे. १९५२ मध्ये हा मासा भारतात सोडण्यात आला
होता. आता हा मासा सगळीकडेच पसरला आहे. हा मासा आपल्या पिलांची काळजी घेतो (असा
गुणधर्म माश्यात फारसा बघायला मिळत नाही), आपल्या पिलांना तोंडात ठेवतो. तो इतर
माश्यांची अंडी खातो, कोणत्याही परिस्थितीत जगतो, त्यावर रोग येत नाही इत्यादी.
जागतीक व्यापाराची सुरुवात झाल्या नंतर अशा अनेक
परदेशी प्रजाती भारतात घर करायला लागल्या. बेशरम, जलपर्णी, गाजर गवत ही त्यांची
काही वनस्पती उदाहरणे.
जैवविविधता संपण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक कारणात
परदेशी प्रजातींची वाढत चाललेली संख्या हे एक महत्वाचे कारण दिल्या जाते. कधी
मत्स्य पालनाला उत्तेजन मिळावे म्हणून तर कधी निव्वळ निसर्गाबद्दलच्या आपल्या
अज्ञानामुळे अनेक नवीन प्रजाती आपण भारतीय निसर्गात टाकल्या ज्याची फार मोठी
आर्थिक व पर्यावरणीय किमंत आपल्याला चुकवावी लागणार आहे/लागत आहे.
परदेशी प्रजाती जेंव्हा इतर ठिकाणावरुन येतात तेंव्हा
ते आपल्या सोबत त्यांचे शत्रू घेऊन येत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणतेही शत्रू
नसल्याने ते नव्या पर्यावरणात झपाट्याने वाढतात. स्थानीक प्रजाती आणि परदेशी
प्रजातींच्या खाद्य सवई आणि अधिवास एकच असल्याने त्या स्थानीक प्रजातींशी स्पर्धा
करतात आणि स्थानीक प्रजातींचा विनाश घडवून आणतात.
साधारणत: तीन
कारणांनी परदेशी प्रजाती नव्या पर्यावरणात येतात. एक म्हणजे अपघाताने त्या
पर्यावरणात निसटतात. ह्यात प्रामुख्याने रोग निर्माण करणाऱ्या सुक्ष्म जिवांचा आणि
अपृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश होतो. दुसरं म्हणजे एका विशीष्ठ उद्देशांसाठी काही
प्रजाती निर्यात केल्या जातात आणि मग त्या पर्यावरणात सुटतात उदा. शोभेसाठी
काचघरात मत्स्य पालनाकरीता आणलेले मासे कधी कधी नैसर्गिक प्रवाहात सुटतात आणि
तीसरे कारण म्हणजे आर्थिक फायद्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी काही प्रजाती
जानूनबुजून आनल्या जातात. अनेक अभ्यास आता स्पष्ट करायला लागले आहेत की स्थानीक
परिसंस्था जर धोक्यात येत असेल तर अनेक परदेशी प्रजातींना स्वत:चा जम बसवायला
चांगलाच वाव मिळतो तसेच जागतीक तापमान वाढीने सुद्धा स्थानीक प्रजाती कमी होऊन
परदेशी प्रजातींच्या संखेत वाढ होऊ शकते.
माश्यांबद्दल आपण विचार करु, आज भारतातील मत्स्य
सृष्टीला परदेशी माशांचा प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. विदर्भापुरता विचार
केला तर आज विदर्भात ५ प्रकारच्या माश्यांच्या परदेशी प्रजाती पर्यावरणात सोडण्यात
आल्या आहेत. त्यात चंदेरा, तिलापीया, सायप्रिनस, आफ्रिकन मागुर, गप्पी ह्यांचा
समावेश होतो. विदर्भात आणि इतर ठिकाणी सुद्धा सायप्रिनस नावाचा मासा मत्स्य
पालनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातो. ह्याच सायप्रिनस माश्याने काश्मीर
खोऱ्यातील सिजोथोरॅसीनी नावाच्या स्थानीक माश्यांच्या एका मोठ्या गटालाच संपवून
टाकलं आहे. दुसरी माश्यांची प्रजाती म्हणजे सिल्वर कार्प (चंदेरा) सुद्धा
आपल्याकडे मत्स्यपालनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातो. ह्या माश्याने सुद्धा
गोविंदसागर आणि अन्य अनेक जलाषयातील कटला ह्या स्थानीक प्रजातीला संपवून टाकलं
आहे.
माशांच्या बाबतीत सरकारी मत्स्य विभागाकडे पसरणाऱ्या
परदेशी माश्यांबद्दल कोणतीही माहीती नाही, अशा माश्यांच्या पसरण्याने आपल्याला
मोजाव्या लागणाऱ्या पर्यावरणीय कीमती बद्दल कमालीचे अज्ञान दिसून येते. केवळ
उत्पादन वाढ हा एकच उद्देश्य ठेऊन पर्यावरणात सोडलेल्या ह्या प्रजातींमुळे फार
मोठा धोका स्थानीक जैवविविधतेला पोहोचणार आहे. परदेशी माशांच मत्स्य पालन जरी
कितीही सक्सेसफुल ठरत असलं तरी सुद्धा मासेमारांची मोठी लोक संख्या अजुनही
नद्यांमधील स्थानीक माशांवरच अवलंबून आहे. कारण मोठ्या तलावातील मासेमारीचे हक्क
अजूनही मोठ्या भांडवलदारी मत्स्य पालकांच्याच हाती आहेत. स्थानीक माशांच्या
संपण्याने अनेक ठिकाणच्या स्थानीक मासेमारांवर चक्क उपासमारीची वेळ येत असल्याचे
चित्र आहे.
एकुणच काय तर सरकारी पातळीवर परदेशी प्रजातींबद्दल
निश्चित असे धोरण ठरवण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा धोरणात स्थानीक प्रजातींचेच
प्रजनन घडवून आणून त्यांच्या उपयोगाला उत्तेजन देता येईल. अनेक ठिकाणी स्थानीक
माश्यांच्या प्रजननाकडे व त्याच्या वापराकडे अनेक सामाजीक संस्था व अभ्यासक वळत
आहेत. परदेशी प्रजातीच्या वापराने निकटगामी फायदा मिळेल पण दूरागामी तोटा होणार
आहे हे आता समजायला लागले आहे. तिलापीयासारख्या प्रजाती वापरण्यावर सरसकट बंदी घालण्याची
गरज आहे (तिलापीयाच्या वापरावर अमेरीकेसह अनेक राष्ट्रांमध्ये बंदी आहे!). अभ्यासात
हे सिद्ध झाले आहे की जर स्थानीक पर्यावरण मानवी कारणांमुळे खराब होत असेल तर अशा
बदललेल्या पर्यावरणात परदेशी प्रजाती जास्त चांगल्या प्रकारे आपला जम बसवतात अशा
परिस्थितीत स्थानीक पर्यावरण जास्त चांगले कसे करता येईल हे बघायला हवे. एकदा जंगल
किंवा गवताळ प्रदेश उभे राहिले की गाजर गवत तिथे टिकत नाही असा अनुभव आहे.
No comments:
Post a Comment