Friday, January 17, 2014

लोक ज्ञानाचे महत्व


लोक ज्ञानाचे महत्व आता जगभरात मान्य व्हायला लागले आहे. इथे मी, मेंढ्यात आणि आसपास अनुभवलेला लोकज्ञानाचा एक आलेख मांडणार आहे. ह्याचा मुख्य भर हा मास्यांच्या अनुषंगाने मी केलेला अभ्यास हा असणार आहे. मासे, नदी आणि माणुस हे तीन माझ्या पीएचडीचे महत्वाचे घटक होते. निसर्गाचा अभ्यास हा एकांगी होवू नये, अनेक घटकांचे परस्पर संबंध समजुन घेतल्यावरच एक चित्र तयार करता येउ शकते ही विचारसरणी आता परीसर विज्ञानात आपला जम बसवू लागली आहे. पुर्वीच्या काळी जी निसर्ग अभ्यासाची पद्धत होती तीला शास्त्रिय भाषेत ’फ्लोरीस्टीक अ‍ॅंड फौनीस्टीक अप्रोच’ असे म्हणतात. म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणचा अभ्यास हा तीथल्या प्राणी वनस्पतींची यादी करुन करायची. गेल्या काही दशकात खास करुन उपग्रह चित्रांचे प्रचलन आल्यानंतर अभ्यासाचा रोख हा केवळ सजीव घटक न राहता त्यांचे अधिवासांचाही समावेश त्यात केल्या जायला लागला. ज्याला परिसर विज्ञानात ’लॅंडस्केप इकॅलॅजी’ (भूभाग परिस्थितीकी!) म्हणतात. पृथ्वी परिषदेनंतर इकोसीस्टम अप्रोच (परिसंस्था पद्धती) ची संकल्पना आपले मुळ धरु लागली आहे. या पद्धतीत परिसंस्थेचे जास्तीत जास्त घटक विचारात घेतल्या जातात. निसर्ग संवर्धनात या तात्वीक प्रणालीचं बरचं महत्व आहे. कारण निसर्ग म्हणजे अनेक गोष्टींची एक सुचारु व्यवस्था आहे. यात एका घटकात निर्माण होणाऱ्या बदलाचा दुसऱ्या घटकावर परिणाम पडतोच. परिसंस्था म्हणजे एक परस्पर अवलंबून असणाऱ्या हजारो घटकांची सुचारु व्यवस्था. किती विभीन्न घटक यात असु शकतात? यात भौतिक घटक असतील उदा. वातावरण, हवेचा वेग आणि दिशा, माती इत्यादी. यात परिस्थितीकीय घटक असतील उदा. भक्ष आणि भक्षकांचे सहसंबंध, अंकुरण्याचा वेग इत्यादी. यात सामाजीक घटक असतील उदा. संस्कृती, परिवार, धर्म इत्यादी. यात राजकिय घटक असतील उदा. सरकारी यंत्रणा, राजकिय व्यवस्थेचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन इत्यादी. यात अर्थशास्त्रिय घटक निगडीत असतील उदा. रोजगाराचा प्रश्न, बाजारपेठेची मागणी इत्यादी. यात काही असेही घटक निगडीत असु शकतात ज्या बद्दल आपण कोणते भविष्य वर्तवू शकत नाही उदा. भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव. मेंढ्यात अहींसक पद्धतीने मध गोळा करण्याच्या वेळी लोक आणि जंगल अभ्यास गटाचे सभासद एका गोष्टीवर येउन पोहचले की, मध माशांचे मध जर आपण चुकीच्या पद्धतीने काढत असु तर मधमाशा संखेने कमी होतात, मध माशा कमी झाल्याने परागीकरणावर विपरीत परिणाम होतो, परागीकरण कमी झाल्यामुळे झाडांची संख्या कमी होवू शकते, त्यावर अवलंबुन असणाऱ्या पशू पक्षांची संख्या कमी होवू शकते, म्हणजेच काय तर संपुर्ण जैवआवरणाला एका गोष्टीमुळे परिणाम भोगावे लागु शकतात. अशा प्रकारच्या समग्र समजेच्या दिशेने आता परिसर विज्ञान वाटचाल करते आहे. आदिवासीं मध्ये अशी समज उपजतच असते असे वाटते. निसर्ग एक एकक म्हणुन त्याच्या कडे बघणे. ’जंगलाला आग लागल्याने मासे कमी होतात’ हे विधान मी करायला लागलो तर तुम्ही मला वेड्यात काढाल. पण मेंढ्यातल्या जाणकार लोकांना विचारलं तर ते म्हणतील की हे खरं आहे, उन्हाळ्यात जंगलाला आग लागुन भरपुर प्रमाणात राख निर्माण होते, पावसाळ्यात ही राखं पाण्यात मिसळते नदी नाल्यात पडते, तीथल्या राखेच्या पाण्यात मासे तडफडुन मरतात. थोडक्यात काय तर निसर्ग हा अनेक घटकांचा आणि घटनांची एक क्लिस्ट असं यंत्र आहे, ज्याला समजुन घेण्यासाठी निसर्गातील विविध घटकांना विचारात घेणे अत्यावश्यक आहे.
जवळ जवळ ६० हजार वर्षांआधी माणसाने भाषेचा शोध लावला असावा, ह्या क्लिष्ट अशा प्रतिकात्मक भाषेच्या उगमासोबतच माणसाने आधुनिक ज्ञान व्यवस्थेची मुहुर्तमेढ केली असं आपल्याला म्हणता येईल. जवळपास १० हजार वर्षांच्या आधी, जेंव्हा शेतीची सुरुवात झाली, त्याआधी मानसाचे विविध समुह हे छोट्या छोट्या गटात, एक जीनसी स्वरुपात, वास्तव्यास होते. विविध प्रकारच्या समुहात फारसा काही संबंध नसावा कारण ते वेगवेगळ्या भाषा बोलायचे. त्यामुळे ज्ञानाचे प्रवाह हे प्रत्येक समुहासाठी आपआपले भिन्नभिन्न होते आणि विविध समुहातील ज्ञानात फारशी देवाणघेवाण नव्हती. पण शेतीच्या आणि पशुपालनाच्या सोबतच विविध माणवी गटातील एकटेपणा दुर व्हायला लागला आणि विविध गटांचे परस्परांशी संबंध स्थापण व्हायला लागले. ह्यामुळे विविध ज्ञानाचे प्रवाह एकत्र यायला लागले असावेत आणि खास प्रकारच्या ज्ञानाची जोपासणा करणाऱ्या लोकांचे समुह निर्माण व्हायला लागले, उदा. वैदू इत्यादी. अशा प्रकारे शिकारी आणि भटक्या अवस्थेतील माणसाने शेती करायला सुरुवात करताच विविध प्रकारच्या ज्ञानाच्या प्रवाहांनी एकत्र येउन ज्ञानाचा एक विषाल असा साठा निर्माण झाला असावा. जगभरात आदिवासी लोक अशा मौल्यवान ज्ञानाचा साठा आपल्या जवळ बाळगुन आहेत. गेल्या काही दशकात अशा निसर्गाविषयक पारंपारिक ज्ञानाला बरच महत्व प्राप्त झालं आहे.
निसर्गाविषयक ज्ञान हे भौतीक शास्त्रातील ज्ञानाप्रमाणे नसते, ते स्थल काल सापेक्ष असते, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाबद्दल फारशी भविष्यवाणी करणे शक्य नसते. हवामान शास्त्राचचं आपण उदाहरण घेउया, विज्ञानाने इतकी प्रगती केली तरी अजुनही पावसाचा, चक्री वादळाचा, भूकंपाचा, त्सुनामीचा पक्का अंदाज बांधने आपल्याला कीतपत शक्य आहे? आपण केवळ जुण्या आकड्यांवरुन एक प्रकारचा अंदाज वर्तवू शकतो. अशा वेळी निसर्गाबद्दल सतत निरीक्षण करत राहुणच काही अंदाज बांधता येउ शकतात. आजच्या परिपेक्षात जर विविध अधिवासांचं त्यातील विविध जीवजातींसह व्यवस्थित व्यवस्थापण करायच असेल तर लोक ज्ञान, पारंपारिक ज्ञानाशिवाय पर्याय नाही.
असो, तर धिवर आणि गोंड लोकांचं मास्यांबद्दलचं, आणि एकुणच नदी बद्दलचं ज्ञान गोळा करण्यात मला रस होता. ह्या साठी सर्व प्रथम लोकांना किती प्रकारच्या मास्यांच्या प्रजाती माहित असतात हे मी जानुन घ्यायला सुरुवात केली. अभ्यासादरम्याण असं जाणवलं की गोंडाना ४३ जातीचे मासे तर धिवरांना ६३ जातींच्या मास्यांची माहिती असते (मास्यांची यादी शेवटी जोडली आहे). अगदीच जवळपास राहत असलेल्या ह्या दोन समुहातील लोकात ज्ञानाच्या बाबतीत ही तफावत का आहे? कारण मासे मारणे हा धिवरांचा व्यवसाय आहे तो गोंडांसाठी रिकाम्या वेळी करण्याचा उद्योग आहे, धिवरांचा मासे पकडण्याचा परिघ हा गोंडा पेक्षा फार मोठा आहे. धिवर मासे पकडण्यासाठी चक्क वैनगंगा नदी पर्यंतसुद्धा जातात. शास्त्रिय भाषेत सांगायचं म्हणजे मासेमारीच्या बाबतीत गोंड हे अपार्चुनिस्टीक (संधीसाधू) आहेत तर धिवर हे स्पेशालिस्ट. एखाद्या तथाकथीक अशिक्षीत व्यक्तिला इतक्या मोठ्याप्रमाणावर जीवजातींची माहिती असण्याचं कारण म्हणजे त्यांचं जीवन हे ह्या जैविक घटकांवर अवलंबून असते. ग्रिनेल नावाच्या शास्त्रज्ञाने (ऋrinnel १९८७) एस्कीमो बद्दल लिहलय, ’एस्कीमो ३० विभिन्न प्रकारच्या बर्फांना ओळखू शकतात तर १० विविध प्रकारच्या चिखलांना वेगवेगळी नावं त्यांनी दिली आहेत, त्यांचे जगणे हे ह्या फरकावरच अवलंबून आहे. पण त्यांच्या भाषेत केवळ एका फुलाचे नाव आहे!’ 
मास्यांबद्दल ज्ञान गोळा करतांना मी हे ज्ञान दोन पातळीवर गोळा करण्याचे ठरविले, एक म्हणजे प्रजातीच्या पातळीवर आणि दुसरे म्हणजे मस्त्य समुहाच्या पातळीवर. प्रजातीच्या पातळीवर म्हणजे विविक्षित अशा जाती बद्दल ज्ञान गोळा करणे; उदा. ’बोद (बगारीयस बगारीयस) ह्या मास्याच्या प्रमाणात दिवसें दीवस काय बदल होत आहेत?’ मस्त्य समूहाच्या पातळीवर म्हणजे संपूर्ण मास्यांच्या समूहाबद्दलचे ज्ञान, उदा. मास्यांच्या प्रजननाबद्दल लोकांचे ज्ञान.
लोकांच्या म्हणन्यानुसार जवळ जवळ ७२ % मास्यांच्या जाती हळुहळु का होईना संपत आहेत, २१ % जातीत कोणताही फरक पडत नाही तर ८ % प्रजातींचं प्रमाण नदीत वाढते आहे. स्थानिक जाणकारांच्या नुसार घोगर, जरांग, कडू, पिंजर आणि तंबू (अnguilla bengalensis bengalensis) ह्या जाती तर स्थानिक स्तरावर संपल्यावर जमा आहे. काय कारणांनी हे सारं घडत आहे? लोक म्हणतात की लोकसंख्यावाढीने मासेमारीचे प्रमाण वाढले. काही लोक मासेमारीकरीता विषाचा वापर करायला लागलेत. वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तर विजेच्या तारांचा वापर करुन काही लोक मासेमारी करतात. लोकसंख्यावाढीचा परिणाम शेतीतुन जास्त उत्पादन काढण्यावरही झाला परिणामत: नदीच्या पाण्याचा शेतीसाठी जास्त उपयोग व्हायला लागला. अडाण ही पैनगंगेची एक महत्वाची उपनदी, माझ्या पीएचडीची ही दुसरी नदी. ही नदी जीथे पैनगंगेला मीळते ते ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातील चिमटा हे गाव. तीथले भोई लोक म्हणत होते की, ’शेतीला पाणीदेण्यासाठी नदीवर शेकडो शेतकरी आपल्या खुप जास्त हॅर्सपावरच्या मोटर लावतात आणि दिपावली पर्यंत पुर्ण नदी कोरडी होते मग मासे कोठूण राहणार? आधीच अडाण नदीवरच्या धरणाने बराच विनाश केला आता हे सधन शेतकरी, भोई, धिवर लोकांनी काय करावं?’ आधूनिक शेतीने, बाजाराच्या तणावाने आणि अतीआधूनिक शेतीने (हरित क्रांतीने) संसाधन आधारीत लोकांना देशोधडीला लावले आहे.
काही मासे हे लोक जास्त आवडीने खातात तर काही लोकांना आवडत नाहित. तसा विचार केला तर सर्वच प्रकारचे मासे खाण्यासाठी असतात. त्यातल्या त्यात बोद (ऑagarius bagarius), तंबू (ऊresh water eel), वाघूर (इlarias batrachus) सवडा (हallagu attu) हे मासे जास्त चवदार असतात तर चाचा (ङenentodon cancila) हा मासा चविच्या बाबतीत सर्वात नावडता आहे.
काही मासे हे खाण्यासोबतच औषधीसाठीही वापरल्या जातात उदा. हिचार मिन (इhanda nama) हा मासा एका विशिष्ट प्रकारच्या रोगात, ज्यात रोग्याला अंधारात दिसते पण प्रकाशात दिसत नाही, वापरला जातो. माडुम मिन नावाचा मासा मदूरी नावाच्या रोगात, ज्यात सर्वांगावर फोड येतात, वापरला जातो. वाघूर (इlarias batrachus), इंगूर आणि गट्टी (कystus sps.) हे मासे सर्वात पौष्टीक समजल्या जातात आणि आजारातून बाहेर आल्यानंतर आणि गरोदर अवस्थेत खालल्या जातात.
या व्यतीरीक्त विविध ऋतूत मास्यांच्या प्रमाणाबाबत, प्रत्येक जातीच्या अधिवासाबद्दल, लोकांना प्रत्येक जातीच्या असलेल्या महत्वाबद्दल, विविध जातींच्या सद्य प्रमाणा बद्दलही लोकांजवळ ज्ञान आहे.
आता आपण मासे ह्या एकुणच समुहाबद्दल लोकांकडे असलेल्या ज्ञानाचा विचार करु. मास्यांच्या बाबतीत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचे स्थलांतर. लोकांना मी स्थलांतराच्या ज्ञानाबद्दल त्यांची समज विचारली, लोक म्हणतात: पावसाळा सुरु झाला की स्थलांतर सुरु करण्याचा मान कालामीन नावाच्या मास्याला असतो. काला मीन जणू स्थलांतराची सुरुवात करतो. त्याच्या मागोमाग अन्य मासे स्थलांतर सुरु करतात. स्थलांतराच्या कार्यात एकाच जातीचे मासे एकमेकांच्या शेपटीला पकडून नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने डोंगराकडे चढतात. आणि उंच ठिकाणी जाउन प्रजनन करतात. या काळात पकडलेले मासे अतीषय पौष्टीक असतात. हे स्थलांतराबाबतचे लोक ज्ञान आधूनिक ज्ञानासारखेच आहे.    

दुसरा मत्स्य समुहाबद्दलचा माझा प्रश्न होता मास्यांचे प्रजनन. लोकांच्या मतानुसार: प्रजननाच्या काळात मादी पिलांना जन्म देते, नर मादिच्या मागोमाग येतो आणि नवजातांवर दुध शिंपडतो, ते दुध छोटी पिलं पितात आणि त्यांची वाढ होत जाते. लोक म्हणतात की मास्यांचा जन्मदर (फेकूंडीटी) इतका जास्त असतो की एक मास्यांची जोडी एका धिवर कुटूंबाला वर्षभर मासे पुरवू शकते. सुरुवातीच्या काळात पिलं इतक्या वेगाने वाढतात की त्यांची वाढ ही साध्या डोळ्यांनीही बघता येते.

No comments:

Post a Comment