“देखन मे छोटे लगे………..”
येत्या
२२ मार्च रोजी जागतीक जल दिन आहे. १९९२ मध्ये रियो-डी-जानेरो येथे झालेल्या संयूक्त
राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेतून ह्या जल दिनाला साजरे करण्याची कल्पना
बाहेर पडली. दर वर्षी पाण्याच्या संबंधीत विविध विषय घेऊन हा दिवस साजरा केल्या जातो.
ह्या वर्षीची जागतीक जल दिनाची ’थीम’ आहे “शहरांसाठी पाणी” (Water for Cities). फार पूर्वीच
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये शहरांच्या शाश्वततेत जलाषये आणि वनांचे महत्व
विषद केले होते.
“नगरेची
रचावी,
जलाषये
निर्मावी,
महावने
लावावी,
नानाविधे”
(ज्ञानेश्वरी १४-३३).
हिंदीत एक म्हण आहे,
’देखन मे छोटे लगे, घाव करत गंभीर’. म्हणजेच काही गोष्टी ह्या छोट्या असतात पण त्या
मोठा परिणाम करु शकतात. नदीसारख्या मोठ्या संरचना शेवटी लहान लहान गोष्टींपासूनच बनतात.
शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणजे, छोटे छोटे ओहोळ बनून प्राथमिक प्रवाह (Primary
streams) तयार होतात. अनेक प्राथमिक प्रवाह द्वितीय प्रवाह (Secondary streams) निर्माण
करतात. अनेक द्वितीय प्रवाह तृतीय प्रवाह (Tertiary streams)
निर्माण करतात. ही सगळी विविध पातळ्यांवरच्या प्रवाहांची व्यवस्था म्हणजे नदीचे खोरे.
ही नदीची व्यवस्था माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरण संस्थेसारखी असते. कदाचीत म्हणूनच
नद्यांना देशाच्या रक्तवाहिण्या म्हणतात! यात अतीषय महत्त्वाचा भाग असतो नदी काठच्या
झाडो-याचा (Riparian Vegetation) व नदीच्या खो-यातील
जमिन वापराच्या पद्धतींचा (Land use pattern).
नदी काठचा झाडोरा उत्तम स्थितीत असेल आणि जमिन वापराची पद्धत जितकी निसर्गानुकूल असेल
तितकीचं नदीची स्थिती चांगली असते. अशा विविध प्रवाहात मानवाने छोटे छोटे तलाव निर्माण
केलेत. अशा छोट्या तलावांची, छोट्या प्रवाहांची शाश्वतता भंग पावल्याने मोठे प्रश्न
निर्माण होत आहेत. निसर्गाच्या छोट्या घटकांना वाचवल्यास, मानसांच्या छोट्या समूहांनी
मिळून एकत्र येऊन प्रयत्न केल्यास मोठे परिवर्तन निश्चितच घडून येऊ शकते.
नदीच्या एकूणच
पर्यावरणीय आरोग्यात छोट्या जलाशयांच मोठ महत्व असते. जैवविविधतेला पाणी पुरवठ्यासोबतच
तलाव भूगर्भातील पाण्याचा साठा वारंवार भरुन काढतात. पाण्याचा प्रवाह थांबवून धरल्याने
पुराचा धोका तलावांमुळे कमी होतो आणि पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली माती एखाद्या
चाळणीप्रमाणे तलावातच रोखली जाते. अनेक पक्षी, मासे आणि विविध प्रकारच्या वनस्पतींचे
निवासस्थान असलेले तलाव आर्थिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहेत. खाद्य म्हणून जगात
सर्वात जास्त वापरला जाणारा तांदूळ शेवटी जलाशयातच येतो! पाणी जेंव्हा जमिनीच्या पृष्ठभागावरुन
वाहते तेंव्हा त्यात अनेक विषारी द्रव्ये असतात तलाव अशा द्रव्यांना काढून टाकतं किंवा
त्याचं प्रमाण तरी कमी करतं. तलावातील काही पानवनस्पती पाण्यातून नायट्रोजन, फॉस्फरस
सारखे पदार्थ तर काढतातच पण जड धातू सारखे अती विषारी मूलद्रव्य सुद्धा पाण्यातून काढून
टाकतात. म्हणजेच काय तर आपल्या विहिरीतील पाणी शुद्ध करणारे ते “जल शुद्धीकरण केंद्र”
आहेत.
अगदी प्राचीन
काळापासून भारतातल्या विभिन्न प्रदेशात आपल्या पूर्वजांनी पाणी साठवण्यासाठी तलाव निर्मितीची
एक सुचारु व्यवस्था निर्माण केली होती. खास करुन भारताच्या शुष्क प्रदेशात तलावांशिवाय
पर्यायच नव्हता कारण अशा प्रदेशातल्या नद्या ह्या फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून
असल्याने बारमाही नसतात आणि त्यांना बर्फाच्छादित हिमशिखरांवरुन पाणी पुरवठा होत नाही.
राजस्थानातील जोहड, विदर्भातील मालगुजारी आणि जमीनदारी तलाव, शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था
ही काही सुपरिचित उदाहरण आहेत. तलाव निर्माण झाल्यावर त्यांच्या व्यवस्थापनाची एक उत्तम
व्यवस्था सुद्धा समाजाने निर्माण केली होती. आपला विदर्भ तर तलावांचा प्रदेश म्हणून
ओळखला जातो. माझे मित्र मनीष राजनकरच्या नुसार विदर्भातल्या एकट्या भंडारा जिल्ह्यातच
३५ हजार पेक्षा जास्त तलाव असावेत.
पण असे तलाव,
खास करुन शहरातील तलाव, आज गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. वाशिम जिल्ह्यातलं कारंजा
लाड हे ऐतिहासिक गाव. छत्रपतीं शिवाजींच्या स्वराज्य स्थापनेला ह्या गावानं धनानं बरीच
मदत केली होती. इ.स. १६७० मध्ये शिवाजींचे सरदार प्रतापराव गुजर ह्यांनी ४००० बैलांवर
लादून प्रचंड संपत्ती कारंजातून नेली होती. ६० उंटांवर लादलेली मौल्यवान कस्तुरी विकत
घेऊन ती बांधकामाच्या गा-यात टाकून कस्तुरीची हवेली बांधण्याची दानद इथलीच. नृसिह सरस्वती
गुरु महारांजे जन्मस्थळ, जैनांची भव्य मंदिरे आणि अहमदनगरच्या अनिंद्य सूंदरी राजपुत्रीची
कबर सुद्धा कारंजातच आहे. कारंज्याच्या तीन दिशेने तीन तलाव पुर्वजांनी मोठ्या विचारपूर्वक
निर्माण केले आहेत. यातले दोन्ही तलाव गावाच्या उंचावर आहेत जेणेकरुन गावातील विहिरी
नेहमी पाण्याने भरुन राहतील. यात सर्वात मोठा तलाव आहे ऋषी तलाव. करंज ऋषीला झालेला
असाद्य रोग दूर करण्यासाठी ह्या तलावाचे निर्माण करंज ऋषींनी तप करुन केले अशी आख्यायिका
आहे. आज ह्या तलावाचा बराचसा भाग काटेरी झुडुपांनी व्यापला असून उरलेला भाग संपण्यात
जमा आहे. दुसरा तलाव आहे चंद्र तलाव. चंद्राने आपल्या गुरुच्या पत्नी सोबत व्यभिचार
केला परिणामत: गुरुने चंद्राला शाप दिला आणि
चंद्राला क्षयरोग व त्वचारोग झाला. या रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी चंद्राने तप
केले आणि चंद्र तलावाचे निर्माण केले अशी आख्यायिका आहे. आज कारंज्यातील बहुतांश सांडपाणी
ह्या तलावात सोडतात. तिसरा तलाव सारंग तलाव. स्थानीय नगर परिषदेने ह्या तलावात चक्क
दगडांची पक्की भींत बांधून ह्या तलावाला डोळ्यादेखत संपवलं आहे.
कारंजा शहराच्या
उपरोक्त उदाहरणावरुन अनेक गोष्टी स्पष्ट होतात. नळ योजना बहुतांश ठिकाणी आल्याने तलावांची
उपयोगिता कमी होऊन केवळ कचरा टाकण्याचे ठिकाण म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे.
बेशरम सारख्या जलपर्णी वनस्पती वाढून तलावाचे क्षेत्रफळ घटत चालले आहे. गाळ जास्त झाल्याने
काटेरी झुडपे वाढत आहेत आणि पाणी धारण क्षमता कमी होत आहे. अनेक ठिकाणी तलावाच्या पानलोट
क्षेत्रात अतीक्रमण वाढल्याने तलाव संकुचित झाले आहेत. शहरातील सांडपाणी साठविण्याचा
सोपा आणि स्वस्त मार्ग उपलब्ध झाल्याने तलाव म्हणजे मोठी गटार एवढाच अर्थ त्यांना उरला
आहे.
नळ योजना पाणी
पुरवठा करत आहे, पाणी कमी पडले तर नवीन बोअरवेल खोदता येतील म्हणून पारंपरिक तलाव नष्ट
होऊ देणे हा शुद्ध मुर्खपणा ठरणार आहे. लांबच्या अंतरावरुन शहराला पाणी पुरवठा करणा-या,
केंद्रीय पद्धतीने संसाधन पुरवणा-या व्यवस्था पर्यावरणाचा ह्रास करणा-या असतात कारण
यात निसर्गात मोठे बदल करावे लागतात, उर्जेचा प्रचंड वापर केला जातो, पर्यावरणीय भेदभाव
वाढीला लागतो आणि केंद्रिकृत व्यवस्था जेंव्हा कोसळून पडतात तेंव्हा निर्माण होणारे
प्रश्न जास्त बिकट असतात.
तलावांसारख्या
छोट्या व्यवस्थांना वाचवण्याचं काम मोठे मानवी गट करु शकत नाही. लोकांचे छोटे छोटे
गट जर एकत्र आले तरच अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. त्यामुळे नदीचे संरक्षण, तलावांचे
संरक्षण हे मोठी सरकारी व्यवस्था करेल असे समजू नये कारण अशा व्यवस्थांना मोठ्या प्रकल्पांमध्ये
रस असतो, मोठे प्रकल्प निसर्गावर जय मिळवण्याचा माणसाचा केविलवाणा प्रयत्न असतात व
त्यात लाभाचे न्याय्य वाटप होणे कठीण असते. विकेंद्रित व्यवस्था जास्त शाश्वत आणि व्यवस्थापन
करायला सोप्या असतात. निसर्ग नेहमी छोट्या छोट्या पातळ्यांवर जास्त प्रभावीपणे अभिव्यक्त
होत असतो.
अशा
छोट्या पातळ्यांवरच्या व्यवस्थांना जास्त शाश्वत करण्याचा प्रयत्न करायला हवा तेव्हांच
आपली शहरे पाण्याच्या बाबतीत शाश्वत होतील.
No comments:
Post a Comment