गवत
अन संध्याकाळ
सायंकाळी गावालगतच्या बोडीच्या काठावर
जावून बसलो. समोरुन सरसर ६-७ फुट लांबीची धामन सरपटत गेली. पावसाळा संपून गेला होता.
नोव्हेंबरचा दुसरा आठवडा. थंडी पडायला नुकतीच सुरुवात झाली होती. हलका धान कापायला
आला होता. भारी धान कापायला येणार होता. हा दिपावलीचा महिणा. हिंदू धर्मा प्रमाणे पंचांगानुसार
इथे दिपावली साजरी होत नाही, लोक ठरवतात आणि त्या दिवशी सारं गाव दिवाळी साजरं करतं.
समोर क्षितीजावर सूंदर नक्षी काढून ठेवली होती. मनाला एक प्रकारची तंद्री लागली होती.
समोर दाट हिरवंकच्च जंगल आत्ताच येउन गेलेल्या पावसाने यौवनात आलं होतं. हे जंगल आमची
आई, देवाजींचं वाक्य आठवलं, जंगल टिकेन तर आदिवासी टिकेल, त्याची संस्कृती टिकेल. बोडीच्या
काठावरचं बाभळीचं झाड पिवळ्या फुलांनी सजलं होतं. साधेपनात सौंदर्याची ती जीवंत अभीव्यक्ती
होती. संपूर्ण झाडं आवाजाने भरुन गेलं होतं, चिमण्यांचा प्रचंड मोठा थवा त्यावर विसावला
होता. नजरेने दिसत नव्हता पण आवाजाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता. संपूर्ण
झाडात खूळखुळे लावले आहेत असा भास होत होता. ह्या चिमण्यांची ही शत्रूंना आपली ताकद
दाखवण्याची पद्धती होती. आम्ही एकटे नाहीत, खबरदार इकडे नजर टाकली तर! जीतका आवाज मोठा
तीतके शक्ती प्रदर्शन मोठे. आता लवकरच हे झाड शांत होणार होतं, जणू ते एकटच आहे.
हळुहळू सायंकाळ घरी परतायला लागली. आवाज
बदलायला लागले. गुरं ढोरं जंगलातुन घरी परतायला लागले. तलावाच्या पलिकडच्या काठावर
काही परदेशी पाणपक्षी अजुनही चरत होते. अंधार पडायला सुरुवात होवूनही त्यांना घरी परतायची
घाई दिसत नव्हती. घरा कडे जायला निघालो. रस्त्यात गुरांना घेउन येणारा प्रभाकर मडकाम
भेटला. हा मेंढ्यात घरजावई म्हणून आलेला. गुरं चारायचं काम करणारा तो गायकी, दिवसभर
राणावनात गुरांसोबत राहणारा. दिवसभर डाला कोडोई, तेलीन हुक्के, पोनाळ खळ्या, तीतेर
आदिन, खारा गोटा, मोलोल कोहोडा इत्यादी ठिकाणी गुरे चारुन घरा कडे चालला होता. त्याच्याशी गप्पा मारायला लागलो.
आता आधी सारखं जाडी (गवत) राहिलं नाही.
बोदाखार, मुचीयाल नावाचं गवत तर संपायला आलं आहे.
का? मी.
जंगल वाढलं, झाडं वाढली, गवत कमी झालं,
मांसाहारी प्राणी कमी झाले, शाकाहारी प्राणी वाढले अन गवत कमी झालं.
’अजून?
आता बघा. आठ दहा गावाचे जनावरं मेंढ्यात
येउन चरतात....... तुकूम, कन्हारटोला, लेखा, करकाळा, हेट्टी, तोडे...............गवत
कमी होणारच नाही?
त्याने अगदी मोजक्या शब्दात गवत कमी
होण्याची कारणं सांगीतली होती. हे त्याचं विवेचन त्याच्या भटकंतीचा आणि प्रत्यक्ष निरिक्षणाचा
सार होता, ते त्याचं प्रॅक्टीकल इकालॉजीकल ज्ञान
होतं. तो बेअरफुटेड इकालॉजी होता.
मत्रू दूगा हा असाच गवतांचा तज्ञ. चांगल्या
वनस्पती शास्त्रज्ञालाही गवत म्हटलं की भिती वाटते. गवताला ओळखने म्हणजे जिकरीचं स्थान.
मात्र मत्रू दूगा ३०-४० गवतांचे प्रकार सहजपणे सांगून जातो. मंडा जाडी, बोदाल जाडी.......
आधी गोंडांच्या झोपड्या गवताने शाकारलेल्या असायच्या. ह्या झोपड्या वातानुकूलीत घराचं
काम करायच्या. उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम. आता मात्र कवेलू आणि कुठे कुठे टिनाचे
पत्रे यायला लागलेत. समाज आपले नवे रस्ते शोधून घेतो, विकल्प शोधून घेतो.
कौस्तूभने विदर्भ शब्दाची व्युत्पत्ती
सांगीतली होती: विदर्भ म्हणजे विपूल दर्भांचा प्रदेश. अजुनही वाशिम अकोला जिल्ह्यात
चांगले गवताळ प्रदेश आणि त्यावर अवलंबुन असणारे प्राणि टिकुन आहेत. तणमोर, काळविट,
निलगाय सहजपणे दृष्टीला पडेल असा हा प्रदेश. पण गवताळ प्रदेश म्हणजे पडीत जागा असा
गैरसमज होवून गवताळ प्रदेश संपवून त्यांचे रुपांतर शेतीत केल्या गेले.
गवत वाचवण्यासाठी काय करता येईल? मी
ऑगस्ट ते नोव्हेंबर
ह्या महिण्यात चराई पुर्णत: बंद पाहिजे, ह्या काळातच गवताची वाढ होवून ते पुर्णत: पिकतात.
हेच तर आधूनिक परिस्थितीकी शास्त्राचं
मत आहे. हेच प्रभाकर मडकाम, मत्रू दुगा सांगत होता.
डोक्यात हे संभाषन साठवून खोली वर आलो.
सुर्य जंगलाच्या समुद्रात लपताच थंडी वाढायला लागली. रुम वर पोहोचताच मणिराम दुगाचा
मुलगा जेवण तयार झाले म्हणुन बोलवायला आला. मी मणीराम कडे ’पेइंग गेस्ट’ म्हणुन राहत
होतो. मणिरामचं घर आदिवासी आणि आधुनिकतेचा सुरेख संगम होता. ग्रामसभेच्या इमारती शेजारी,
प्राथमिक शाळेच्या पुढे, मोक्याच्या ठिकाणी त्याचं घर. घरात विज, टी.व्ही अन गोबर गॅसची
सोय होती. मणिरामला दोन अपत्य शितल बारा वर्षांची अन गुरुदेव १० वर्षांचा. गुरुदेव
अन शितल सदासर्वदा माझ्या खोलीवर असायचे. त्यांना संगणक शिकवने, त्यांचे इंग्रजीचे
पाठ घेणे अशी माझी जबाबदारी. गुरुदेव चांगलाच संगणक शिकला होता. मणीराम दहावी पर्यंत
शिकला सवरलेला, शांत, समजदार, जबाबदार व्यक्ती, त्यामुळे ग्रामसभेचा सर्व हिशोब तोच
ठेवायचा. मणिरामच्या घराच्या शेजारीच त्यांच्या वडील अन भावाचे घर. आदिवासींमध्ये मुलाचं
लग्ण झालं की ते वेगळे राहायला सुरुवात करतात. त्या वेगळेपणात एक प्रकारची सहजता असते.
आदिवासींची घरं म्हणजे विविध प्रकारच्या
जैविक अजैविक घटकांची एक सुंदर व्यवस्थाच असते. घराच्या आवारात बकऱ्या, गुरं ढोरं,
कुत्रे, कोंबड्या यांच्या विशिष्ट जागा असतात. घराबाहेर डुकरांचा पदगुडा असतो. देवाची
एक वेगळी खोली असते त्यात विविध प्रकारचे आदिवासी देव गुण्यागोविंदाने नांदत असतात.
मात्र घरात साईबाबा, बजरंगबली, गणपती ह्या हिंदू देवानाही मानाचं स्थान असतं. अंगणात
मांडव टाकलेला असतो त्यावर भोपळ्याच्या, वालाच्या वेली चढलेल्या असतात. भोपळ्याच्या
वेलीतले बरेचशे भोपळे जंगलात पाणी नेण्यासाठी वेगळे ठेवलेले असतात ते आदिवासींचे थर्मास.
मांडवाच्या मध्यभागी नक्षीकाम केलेला मूंडा गाडलेला असतो. कधी कधी ह्या मुंड्यांची
संख्या एका पेक्षा जास्त ही असते. घराच्या मागच्या बाजुला परसबाग त्यात मका, वांगे,
टमाटे, वालाच्या वेली फुललेल्या असतात. संपुर्ण घर बांबूच्या कुंपनाने वेढलेलं असतं.
आजकाल प्रत्येक घरात नहाणी, संडास अन गोबर गॅसची सोय झालेली आहे.
मणीरामच्या अंगणातल्या मुंड्याचा विषय
निघाला.
ह्या मुंड्याला किती वर्षे झालीत? मी.
झाली असतील आठेक वर्षे. मणीरामची पत्नी
कमलताई म्हणाल्या.
म्हणजे लग्नाला आठ वर्षे झालीत. पण शितल
तर १२ वर्षांची आहे. हे कसं? माझा प्रश्न.
आम्हाला लग्नाआधीच मुलगी झाली होती.
मुलं होण्यासाठी लग्नाची काय आवश्यकता? जेंव्हा परिस्थिती चांगली असते तेंव्हाच लग्न
करायचं. जर प्रेम झालं तर एकत्र राहनं सुरु करता येते. जेंव्हा शक्य होईल तेंव्हा लग्न
करता येते. त्यामूळे मणीरामच्या लग्नात त्यांची मूलगी २-३ वर्षांची होती.
आता प्रत्येक घराच्या बाहेर शेकोट्या
पेटल्या होत्या. त्या आता रात्र भर पेटत राहतील त्या शेकोटीच्या भोवती बकऱ्या, मांजरी,
कुत्री आणि एखादा म्हातारा पहूडलेला असतो.
जेवन करुन खोलीवर परतलो. शेकोटी पेटवली.
खोलीत हळुहळू उब यायला लागली.
झोपी जातांना विचार येत होते. माणसाच्या
आदिम काळाच्या चित्रासारखं हे सारं काही. त्या चित्रात एक परस्परांवर अवलंबून असलेलं
कुटूंब आहे. त्या कुटूंबाच्या बाहेर एक उबदार असं सामाजीक विश्व आहे. त्या सामाजीक
विश्वाच्या आणि व्यक्ती आणि कुटूंबाच्या रेषा एकमेकात नामालुमपणे मिसळलेल्या आहेत.
माझं जीवन आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगेन हा अट्टाहास नाही. तीथे संसाधन मिळविण्यासाठी
संघर्ष आहे पण त्या संघर्षात सहजता आहे. निसर्गाची आव्हानं ही सहजतेने स्विकारल्या
जातात. तिथे तथाकथीक शिक्षण वगैरे काही नाही पण तरीही ज्ञानाचं लख्ख तेज आहे आणि त्याला
विनयशिलतेची सुंदर झालर आहे.
No comments:
Post a Comment