Friday, January 17, 2014

 “देखन मे छोटे लगे………..”

येत्या २२ मार्च रोजी जागतीक जल दिन आहे. १९९२ मध्ये रियो-डी-जानेरो येथे झालेल्या संयूक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेतून ह्या जल दिनाला साजरे करण्याची कल्पना बाहेर पडली. दर वर्षी पाण्याच्या संबंधीत विविध विषय घेऊन हा दिवस साजरा केल्या जातो. ह्या वर्षीची जागतीक जल दिनाची ’थीम’ आहे “शहरांसाठी पाणी” (Water for Cities). फार पूर्वीच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये शहरांच्या शाश्वततेत जलाषये आणि वनांचे महत्व विषद केले होते.

“नगरेची रचावी,

जलाषये निर्मावी,

महावने लावावी,

नानाविधे”

(ज्ञानेश्वरी १४-३३).

हिंदीत एक म्हण आहे, ’देखन मे छोटे लगे, घाव करत गंभीर’. म्हणजेच काही गोष्टी ह्या छोट्या असतात पण त्या मोठा परिणाम करु शकतात. नदीसारख्या मोठ्या संरचना शेवटी लहान लहान गोष्टींपासूनच बनतात. शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणजे, छोटे छोटे ओहोळ बनून प्राथमिक प्रवाह (Primary streams) तयार होतात. अनेक प्राथमिक प्रवाह द्वितीय प्रवाह (Secondary streams) निर्माण करतात. अनेक द्वितीय प्रवाह तृतीय प्रवाह (Tertiary streams) निर्माण करतात. ही सगळी विविध पातळ्यांवरच्या प्रवाहांची व्यवस्था म्हणजे नदीचे खोरे. ही नदीची व्यवस्था माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरण संस्थेसारखी असते. कदाचीत म्हणूनच नद्यांना देशाच्या रक्तवाहिण्या म्हणतात! यात अतीषय महत्त्वाचा भाग असतो नदी काठच्या झाडो-याचा (Riparian Vegetation) व नदीच्या खो-यातील जमिन वापराच्या पद्धतींचा (Land use pattern). नदी काठचा झाडोरा उत्तम स्थितीत असेल आणि जमिन वापराची पद्धत जितकी निसर्गानुकूल असेल तितकीचं नदीची स्थिती चांगली असते. अशा विविध प्रवाहात मानवाने छोटे छोटे तलाव निर्माण केलेत. अशा छोट्या तलावांची, छोट्या प्रवाहांची शाश्वतता भंग पावल्याने मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. निसर्गाच्या छोट्या घटकांना वाचवल्यास, मानसांच्या छोट्या समूहांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न केल्यास मोठे परिवर्तन निश्चितच घडून येऊ शकते.
नदीच्या एकूणच पर्यावरणीय आरोग्यात छोट्या जलाशयांच मोठ महत्व असते. जैवविविधतेला पाणी पुरवठ्यासोबतच तलाव भूगर्भातील पाण्याचा साठा वारंवार भरुन काढतात. पाण्याचा प्रवाह थांबवून धरल्याने पुराचा धोका तलावांमुळे कमी होतो आणि पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली माती एखाद्या चाळणीप्रमाणे तलावातच रोखली जाते. अनेक पक्षी, मासे आणि विविध प्रकारच्या वनस्पतींचे निवासस्थान असलेले तलाव आर्थिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहेत. खाद्य म्हणून जगात सर्वात जास्त वापरला जाणारा तांदूळ शेवटी जलाशयातच येतो! पाणी जेंव्हा जमिनीच्या पृष्ठभागावरुन वाहते तेंव्हा त्यात अनेक विषारी द्रव्ये असतात तलाव अशा द्रव्यांना काढून टाकतं किंवा त्याचं प्रमाण तरी कमी करतं. तलावातील काही पानवनस्पती पाण्यातून नायट्रोजन, फॉस्फरस सारखे पदार्थ तर काढतातच पण जड धातू सारखे अती विषारी मूलद्रव्य सुद्धा पाण्यातून काढून टाकतात. म्हणजेच काय तर आपल्या विहिरीतील पाणी शुद्ध करणारे ते “जल शुद्धीकरण केंद्र” आहेत.   
अगदी प्राचीन काळापासून भारतातल्या विभिन्न प्रदेशात आपल्या पूर्वजांनी पाणी साठवण्यासाठी तलाव निर्मितीची एक सुचारु व्यवस्था निर्माण केली होती. खास करुन भारताच्या शुष्क प्रदेशात तलावांशिवाय पर्यायच नव्हता कारण अशा प्रदेशातल्या नद्या ह्या फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बारमाही नसतात आणि त्यांना बर्फाच्छादित हिमशिखरांवरुन पाणी पुरवठा होत नाही. राजस्थानातील जोहड, विदर्भातील मालगुजारी आणि जमीनदारी तलाव, शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था ही काही सुपरिचित उदाहरण आहेत. तलाव निर्माण झाल्यावर त्यांच्या व्यवस्थापनाची एक उत्तम व्यवस्था सुद्धा समाजाने निर्माण केली होती. आपला विदर्भ तर तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. माझे मित्र मनीष राजनकरच्या नुसार विदर्भातल्या एकट्या भंडारा जिल्ह्यातच ३५ हजार पेक्षा जास्त तलाव असावेत.  
पण असे तलाव, खास करुन शहरातील तलाव, आज गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. वाशिम जिल्ह्यातलं कारंजा लाड हे ऐतिहासिक गाव. छत्रपतीं शिवाजींच्या स्वराज्य स्थापनेला ह्या गावानं धनानं बरीच मदत केली होती. इ.स. १६७० मध्ये शिवाजींचे सरदार प्रतापराव गुजर ह्यांनी ४००० बैलांवर लादून प्रचंड संपत्ती कारंजातून नेली होती. ६० उंटांवर लादलेली मौल्यवान कस्तुरी विकत घेऊन ती बांधकामाच्या गा-यात टाकून कस्तुरीची हवेली बांधण्याची दानद इथलीच. नृसिह सरस्वती गुरु महारांजे जन्मस्थळ, जैनांची भव्य मंदिरे आणि अहमदनगरच्या अनिंद्य सूंदरी राजपुत्रीची कबर सुद्धा कारंजातच आहे. कारंज्याच्या तीन दिशेने तीन तलाव पुर्वजांनी मोठ्या विचारपूर्वक निर्माण केले आहेत. यातले दोन्ही तलाव गावाच्या उंचावर आहेत जेणेकरुन गावातील विहिरी नेहमी पाण्याने भरुन राहतील. यात सर्वात मोठा तलाव आहे ऋषी तलाव. करंज ऋषीला झालेला असाद्य रोग दूर करण्यासाठी ह्या तलावाचे निर्माण करंज ऋषींनी तप करुन केले अशी आख्यायिका आहे. आज ह्या तलावाचा बराचसा भाग काटेरी झुडुपांनी व्यापला असून उरलेला भाग संपण्यात जमा आहे. दुसरा तलाव आहे चंद्र तलाव. चंद्राने आपल्या गुरुच्या पत्नी सोबत व्यभिचार केला परिणामत:  गुरुने चंद्राला शाप दिला आणि चंद्राला क्षयरोग व त्वचारोग झाला. या रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी चंद्राने तप केले आणि चंद्र तलावाचे निर्माण केले अशी आख्यायिका आहे. आज कारंज्यातील बहुतांश सांडपाणी ह्या तलावात सोडतात. तिसरा तलाव सारंग तलाव. स्थानीय नगर परिषदेने ह्या तलावात चक्क दगडांची पक्की भींत बांधून ह्या तलावाला डोळ्यादेखत संपवलं आहे.
कारंजा शहराच्या उपरोक्त उदाहरणावरुन अनेक गोष्टी स्पष्ट होतात. नळ योजना बहुतांश ठिकाणी आल्याने तलावांची उपयोगिता कमी होऊन केवळ कचरा टाकण्याचे ठिकाण म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे. बेशरम सारख्या जलपर्णी वनस्पती वाढून तलावाचे क्षेत्रफळ घटत चालले आहे. गाळ जास्त झाल्याने काटेरी झुडपे वाढत आहेत आणि पाणी धारण क्षमता कमी होत आहे. अनेक ठिकाणी तलावाच्या पानलोट क्षेत्रात अतीक्रमण वाढल्याने तलाव संकुचित झाले आहेत. शहरातील सांडपाणी साठविण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग उपलब्ध झाल्याने तलाव म्हणजे मोठी गटार एवढाच अर्थ त्यांना उरला आहे.
नळ योजना पाणी पुरवठा करत आहे, पाणी कमी पडले तर नवीन बोअरवेल खोदता येतील म्हणून पारंपरिक तलाव नष्ट होऊ देणे हा शुद्ध मुर्खपणा ठरणार आहे. लांबच्या अंतरावरुन शहराला पाणी पुरवठा करणा-या, केंद्रीय पद्धतीने संसाधन पुरवणा-या व्यवस्था पर्यावरणाचा ह्रास करणा-या असतात कारण यात निसर्गात मोठे बदल करावे लागतात, उर्जेचा प्रचंड वापर केला जातो, पर्यावरणीय भेदभाव वाढीला लागतो आणि केंद्रिकृत व्यवस्था जेंव्हा कोसळून पडतात तेंव्हा निर्माण होणारे प्रश्न जास्त बिकट असतात.
तलावांसारख्या छोट्या व्यवस्थांना वाचवण्याचं काम मोठे मानवी गट करु शकत नाही. लोकांचे छोटे छोटे गट जर एकत्र आले तरच अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. त्यामुळे नदीचे संरक्षण, तलावांचे संरक्षण हे मोठी सरकारी व्यवस्था करेल असे समजू नये कारण अशा व्यवस्थांना मोठ्या प्रकल्पांमध्ये रस असतो, मोठे प्रकल्प निसर्गावर जय मिळवण्याचा माणसाचा केविलवाणा प्रयत्न असतात व त्यात लाभाचे न्याय्य वाटप होणे कठीण असते. विकेंद्रित व्यवस्था जास्त शाश्वत आणि व्यवस्थापन करायला सोप्या असतात. निसर्ग नेहमी छोट्या छोट्या पातळ्यांवर जास्त प्रभावीपणे अभिव्यक्त होत असतो.
अशा छोट्या पातळ्यांवरच्या व्यवस्थांना जास्त शाश्वत करण्याचा प्रयत्न करायला हवा तेव्हांच आपली शहरे पाण्याच्या बाबतीत शाश्वत होतील. 
आपण सारे जोडलेले


परिसर विज्ञान जीवनाचं शास्त्र आहे. हे शास्त्र सांगतं की, मानवासह कोणताही सजीव हा एकटा नाही. तो एक फार मोठय़ा नैसर्गिक व्यवस्थेचा छोटासा भाग आहे. जॉन डाने (John Donne) नावाचा लेखक लिहितो ‘माणूस समुद्रातल्या बेटासारखा सुटासुटा मुळीच नाही, तो उपखंडाचा एक भाग आहे’. परिस्थितीकी शास्त्र सांगते, आपण सारे एका अशा बृहद् व्यवस्थेचा भाग असतो, ज्याला परिसंस्था म्हटले जाते. परिसंस्थेत अनेकानेक जीव एकमेकांशी, आसपासच्या अजैविक घटकांशी संबंध ठेवून जगत असतात. आपण निसर्गापासून वेगळे आहोत. हा दुराभिमान माणसाला कधीना कधी केवळ मनस्तापच देतो.
एक झेन कथा मला नेहमीच आवडत आली आहे. एका झेन सद्गुरुच्या बागेत भोपळ्याचा वेल बहरला होता. सकाळी उठून साधूनी बघितलं की, लागलेल्या सर्व भोपळ्यांमध्ये भांडण सुरू आहे. त्याने विचारलं, काय झालं? भांडण का सुरू आहे? 
भोपळ्यांनी उत्तर दिलं, ‘आमचं आपआपसात पटत नाही. आम्ही काय करावं?’ 
साधू म्हणाला, ‘ध्यान करा’. 
भोपळे म्हणाले, ‘आम्ही भोपळे आहोत. ध्यान कसे करणार?’ तेव्हा साधू ध्यान मंडपात ध्यानस्त बसलेल्या अनेक लोकांकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाले, ‘बघा, आश्रमात सर्व भोपळे ध्यान करत आहेत’. सर्व भोपळे ध्यान करायला लागले आणि पहिल्यांदा त्यांना जाणीव झाली की, आपण सर्वजण तर एकाच वेलीनी एकमेकांशी जोडलेली आहोत. आपण सर्वजण एकाच व्यवस्थेचा भाग आहोत. शंका मिटली शांतता निर्माण झाली.
ब्रिटिश संशोधक लव्हलॉक (james Lovelock) याने १९७० च्या दशकात एक सिद्धांत मांडला. ‘गाइया’ (Gaia) हे त्या सिद्धांताचे नाव गाइया सिद्धांत हा आपल्या प्राचीन भारतीय ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचाच आधुनिक आविष्कार आहे. प्राचीन ग्रीक पुराणांमध्ये गाइया नावाची देवता होती. जिला वसुंधरा म्हटल्या जाई. गाइया सिद्धांत म्हणजे संबंध सजीव सृष्टीच्या नाते- संबंधाचा, परस्परावलंबन तत्त्वाचा, आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत, पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण त्या सर्वाना स्पर्श करणारे पृथ्वीचे वातावरण, त्यांना जीवन देणारे पाणी आणि सूर्याची ऊर्जा हे स्रोत समान आहेत.
पृथ्वीवर जीवनाची सुरुवात ३.५ अब्ज वर्षांआधी झाली असावी, असे विज्ञान मानते. सुरुवातीचे जीव अगदीच साधे आणि सारखे दिसणारे होते. पण, अनेक वर्षांच्या उत्क्रांती नंतर आजची विविधतेने नटलेली पृथ्वी आपल्याला दिसते. यासाठी पृथ्वीला ३.५ अब्ज वर्षां अविरत मेहनत करावी लागली लागत आहे.
जीवाच्या पेशीचा अथवा जीवाच्या मोठय़ा समूहाचा अभ्यास केला तर काय जाणवते?  सहजीवन आणि परस्पर सहकार्य या दोन गोष्टीतूनच या पृथ्वीवर विविधतेने नटलेली अशी सृष्टी साकार झाली आहे. पेशीचा आकार तो केवढा? अगदी डोळ्यांनी दिसणार नाही इतपत छोटा. तरीसुद्धा पेशीच्या आत ज्या क्रिया चालतात त्या परस्पर सहकार्याचं एक उत्तम उदाहरण ठरावं अशा आहेत.

उत्क्रांती शास्त्रात को- इव्होल्यूशन (Co- evolution) नावाची संज्ञा आहे. याचा अर्थ दोन जीवांची एकत्रितरीत्या (सोबत सोबत) झालेली उत्क्रांती. फुलांचे सुंदर रंग का आहेत? कारण त्यांना परागीकरणासाठी फुलपाखरांना आकर्षित करायचे असते. म्हणजेच सपुष्प वनस्पतींच्या उत्क्रांती सोबतच कीटकांची सुद्धा समृद्ध अशी जीवसृष्टी उत्क्रोंत झाली.
शेती हा सुद्धा मानव निर्मित एक परिसर संस्था आहे. विविध पिके, त्यावरील कीटक, त्या किटकांवर अवलंबून असलेले अन्य कीटक, जमीनीतले जीवाणू अशा सर्व घटकांपासून बनलेल्या व्यवस्थेत मात्र गेल्या काही दशकात प्रचंड मानव निर्मित बदल आपण केले. कीटकनाशकांच्या अवाजवी वापराने शेतीला दुष्पपरिणाम पोहोचवणारे कीटक निर्माण झालेच पण, त्याच वेळी शेतीवर अवलंबून असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्षी, सस्तन प्राणी यांचेही नुकसान झाले. शेतीत नांदणारी संपूर्ण अन्न साखळीच आपण विस्कळीत करून टाकली. व्यवस्थेत खिळ बसली.
निसर्गशास्त्राची मदत घेऊन आणि निसर्गाला समजून घेऊन आता मानव- मानवातील परस्पर संबंधांचा फेरविचार करण्याची गरज आहे. केवळ सहभागानेच विकास करता येऊ शकतो. भाषेचा, जातीच्या, धर्माच्या नावाने विभाजन करून काहीही शक्य होणार नाही. निसर्गातील सहजीवन, सहभाग, परस्पर सहकार्य, गाइया सिद्धांत सह-उत्क्रांती याना समाजशास्त्रांनी व एकूणच मानव जातीने समजून घेतले व त्यानुसार जर आपले मार्ग ठरवले तर एक सशक्त आणि युद्ध विरहित मानवतेचा जन्म आपण घडवून आणू शकतो. त्यासाठी आपल्याला फार दूर जाण्याची गरज नाही. सशक्त असा निसर्ग नावाचा शिक्षक आपल्या आसपास आहेच.
गवत अन संध्याकाळ

सायंकाळी गावालगतच्या बोडीच्या काठावर जावून बसलो. समोरुन सरसर ६-७ फुट लांबीची धामन सरपटत गेली. पावसाळा संपून गेला होता. नोव्हेंबरचा दुसरा आठवडा. थंडी पडायला नुकतीच सुरुवात झाली होती. हलका धान कापायला आला होता. भारी धान कापायला येणार होता. हा दिपावलीचा महिणा. हिंदू धर्मा प्रमाणे पंचांगानुसार इथे दिपावली साजरी होत नाही, लोक ठरवतात आणि त्या दिवशी सारं गाव दिवाळी साजरं करतं. समोर क्षितीजावर सूंदर नक्षी काढून ठेवली होती. मनाला एक प्रकारची तंद्री लागली होती. समोर दाट हिरवंकच्च जंगल आत्ताच येउन गेलेल्या पावसाने यौवनात आलं होतं. हे जंगल आमची आई, देवाजींचं वाक्य आठवलं, जंगल टिकेन तर आदिवासी टिकेल, त्याची संस्कृती टिकेल. बोडीच्या काठावरचं बाभळीचं झाड पिवळ्या फुलांनी सजलं होतं. साधेपनात सौंदर्याची ती जीवंत अभीव्यक्ती होती. संपूर्ण झाडं आवाजाने भरुन गेलं होतं, चिमण्यांचा प्रचंड मोठा थवा त्यावर विसावला होता. नजरेने दिसत नव्हता पण आवाजाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता. संपूर्ण झाडात खूळखुळे लावले आहेत असा भास होत होता. ह्या चिमण्यांची ही शत्रूंना आपली ताकद दाखवण्याची पद्धती होती. आम्ही एकटे नाहीत, खबरदार इकडे नजर टाकली तर! जीतका आवाज मोठा तीतके शक्ती प्रदर्शन मोठे. आता लवकरच हे झाड शांत होणार होतं, जणू ते एकटच आहे.
हळुहळू सायंकाळ घरी परतायला लागली. आवाज बदलायला लागले. गुरं ढोरं जंगलातुन घरी परतायला लागले. तलावाच्या पलिकडच्या काठावर काही परदेशी पाणपक्षी अजुनही चरत होते. अंधार पडायला सुरुवात होवूनही त्यांना घरी परतायची घाई दिसत नव्हती. घरा कडे जायला निघालो. रस्त्यात गुरांना घेउन येणारा प्रभाकर मडकाम भेटला. हा मेंढ्यात घरजावई म्हणून आलेला. गुरं चारायचं काम करणारा तो गायकी, दिवसभर राणावनात गुरांसोबत राहणारा. दिवसभर डाला कोडोई, तेलीन हुक्के, पोनाळ खळ्या, तीतेर आदिन, खारा गोटा, मोलोल कोहोडा इत्यादी ठिकाणी गुरे चारुन घरा कडे चालला होता.  त्याच्याशी गप्पा मारायला लागलो.
आता आधी सारखं जाडी (गवत) राहिलं नाही. बोदाखार, मुचीयाल नावाचं गवत तर संपायला आलं आहे.
का? मी.
जंगल वाढलं, झाडं वाढली, गवत कमी झालं, मांसाहारी प्राणी कमी झाले, शाकाहारी प्राणी वाढले अन गवत कमी झालं.
’अजून?
आता बघा. आठ दहा गावाचे जनावरं मेंढ्यात येउन चरतात....... तुकूम, कन्हारटोला, लेखा, करकाळा, हेट्टी, तोडे...............गवत कमी होणारच नाही?
त्याने अगदी मोजक्या शब्दात गवत कमी होण्याची कारणं सांगीतली होती. हे त्याचं विवेचन त्याच्या भटकंतीचा आणि प्रत्यक्ष निरिक्षणाचा सार होता, ते त्याचं प्रॅक्टीकल इकालॉजीकल ज्ञान होतं. तो बेअरफुटेड इकालॉजी होता.
मत्रू दूगा हा असाच गवतांचा तज्ञ. चांगल्या वनस्पती शास्त्रज्ञालाही गवत म्हटलं की भिती वाटते. गवताला ओळखने म्हणजे जिकरीचं स्थान. मात्र मत्रू दूगा ३०-४० गवतांचे प्रकार सहजपणे सांगून जातो. मंडा जाडी, बोदाल जाडी....... आधी गोंडांच्या झोपड्या गवताने शाकारलेल्या असायच्या. ह्या झोपड्या वातानुकूलीत घराचं काम करायच्या. उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम. आता मात्र कवेलू आणि कुठे कुठे टिनाचे पत्रे यायला लागलेत. समाज आपले नवे रस्ते शोधून घेतो, विकल्प शोधून घेतो.
कौस्तूभने विदर्भ शब्दाची व्युत्पत्ती सांगीतली होती: विदर्भ म्हणजे विपूल दर्भांचा प्रदेश. अजुनही वाशिम अकोला जिल्ह्यात चांगले गवताळ प्रदेश आणि त्यावर अवलंबुन असणारे प्राणि टिकुन आहेत. तणमोर, काळविट, निलगाय सहजपणे दृष्टीला पडेल असा हा प्रदेश. पण गवताळ प्रदेश म्हणजे पडीत जागा असा गैरसमज होवून गवताळ प्रदेश संपवून त्यांचे रुपांतर शेतीत केल्या गेले.
गवत वाचवण्यासाठी काय करता येईल? मी
गस्ट ते नोव्हेंबर ह्या महिण्यात चराई पुर्णत: बंद पाहिजे, ह्या काळातच गवताची वाढ होवून ते पुर्णत: पिकतात.
हेच तर आधूनिक परिस्थितीकी शास्त्राचं मत आहे. हेच प्रभाकर मडकाम, मत्रू दुगा सांगत होता.
डोक्यात हे संभाषन साठवून खोली वर आलो. सुर्य जंगलाच्या समुद्रात लपताच थंडी वाढायला लागली. रुम वर पोहोचताच मणिराम दुगाचा मुलगा जेवण तयार झाले म्हणुन बोलवायला आला. मी मणीराम कडे ’पेइंग गेस्ट’ म्हणुन राहत होतो. मणिरामचं घर आदिवासी आणि आधुनिकतेचा सुरेख संगम होता. ग्रामसभेच्या इमारती शेजारी, प्राथमिक शाळेच्या पुढे, मोक्याच्या ठिकाणी त्याचं घर. घरात विज, टी.व्ही अन गोबर गॅसची सोय होती. मणिरामला दोन अपत्य शितल बारा वर्षांची अन गुरुदेव १० वर्षांचा. गुरुदेव अन शितल सदासर्वदा माझ्या खोलीवर असायचे. त्यांना संगणक शिकवने, त्यांचे इंग्रजीचे पाठ घेणे अशी माझी जबाबदारी. गुरुदेव चांगलाच संगणक शिकला होता. मणीराम दहावी पर्यंत शिकला सवरलेला, शांत, समजदार, जबाबदार व्यक्ती, त्यामुळे ग्रामसभेचा सर्व हिशोब तोच ठेवायचा. मणिरामच्या घराच्या शेजारीच त्यांच्या वडील अन भावाचे घर. आदिवासींमध्ये मुलाचं लग्ण झालं की ते वेगळे राहायला सुरुवात करतात. त्या वेगळेपणात एक प्रकारची सहजता असते.
आदिवासींची घरं म्हणजे विविध प्रकारच्या जैविक अजैविक घटकांची एक सुंदर व्यवस्थाच असते. घराच्या आवारात बकऱ्या, गुरं ढोरं, कुत्रे, कोंबड्या यांच्या विशिष्ट जागा असतात. घराबाहेर डुकरांचा पदगुडा असतो. देवाची एक वेगळी खोली असते त्यात विविध प्रकारचे आदिवासी देव गुण्यागोविंदाने नांदत असतात. मात्र घरात साईबाबा, बजरंगबली, गणपती ह्या हिंदू देवानाही मानाचं स्थान असतं. अंगणात मांडव टाकलेला असतो त्यावर भोपळ्याच्या, वालाच्या वेली चढलेल्या असतात. भोपळ्याच्या वेलीतले बरेचशे भोपळे जंगलात पाणी नेण्यासाठी वेगळे ठेवलेले असतात ते आदिवासींचे थर्मास. मांडवाच्या मध्यभागी नक्षीकाम केलेला मूंडा गाडलेला असतो. कधी कधी ह्या मुंड्यांची संख्या एका पेक्षा जास्त ही असते. घराच्या मागच्या बाजुला परसबाग त्यात मका, वांगे, टमाटे, वालाच्या वेली फुललेल्या असतात. संपुर्ण घर बांबूच्या कुंपनाने वेढलेलं असतं. आजकाल प्रत्येक घरात नहाणी, संडास अन गोबर गॅसची सोय झालेली आहे.
मणीरामच्या अंगणातल्या मुंड्याचा विषय निघाला.
ह्या मुंड्याला किती वर्षे झालीत? मी.
झाली असतील आठेक वर्षे. मणीरामची पत्नी कमलताई म्हणाल्या.
म्हणजे लग्नाला आठ वर्षे झालीत. पण शितल तर १२ वर्षांची आहे. हे कसं? माझा प्रश्न.
आम्हाला लग्नाआधीच मुलगी झाली होती. मुलं होण्यासाठी लग्नाची काय आवश्यकता? जेंव्हा परिस्थिती चांगली असते तेंव्हाच लग्न करायचं. जर प्रेम झालं तर एकत्र राहनं सुरु करता येते. जेंव्हा शक्य होईल तेंव्हा लग्न करता येते. त्यामूळे मणीरामच्या लग्नात त्यांची मूलगी २-३ वर्षांची होती.
आता प्रत्येक घराच्या बाहेर शेकोट्या पेटल्या होत्या. त्या आता रात्र भर पेटत राहतील त्या शेकोटीच्या भोवती बकऱ्या, मांजरी, कुत्री आणि एखादा म्हातारा पहूडलेला असतो.
जेवन करुन खोलीवर परतलो. शेकोटी पेटवली. खोलीत हळुहळू उब यायला लागली.

झोपी जातांना विचार येत होते. माणसाच्या आदिम काळाच्या चित्रासारखं हे सारं काही. त्या चित्रात एक परस्परांवर अवलंबून असलेलं कुटूंब आहे. त्या कुटूंबाच्या बाहेर एक उबदार असं सामाजीक विश्व आहे. त्या सामाजीक विश्वाच्या आणि व्यक्ती आणि कुटूंबाच्या रेषा एकमेकात नामालुमपणे मिसळलेल्या आहेत. माझं जीवन आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगेन हा अट्टाहास नाही. तीथे संसाधन मिळविण्यासाठी संघर्ष आहे पण त्या संघर्षात सहजता आहे. निसर्गाची आव्हानं ही सहजतेने स्विकारल्या जातात. तिथे तथाकथीक शिक्षण वगैरे काही नाही पण तरीही ज्ञानाचं लख्ख तेज आहे आणि त्याला विनयशिलतेची सुंदर झालर आहे.
परदेशी पाहुण्यांबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज

Oreochromis mossambicus
२००३ च्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या कठाणी नदीत मासे पकडता पकडता अचानक एक नविनच मासा सापडला. असा मासा मी कधीच बघितला नव्हता. नंतर समजलं की तो पुर्व आफ्रिकेतल्या नद्यांमध्ये आढळणारा तीलापीया नावाचा स्थानीक माश्यांचा कर्दनकाळ मासा आहे. १९५२ मध्ये हा मासा भारतात सोडण्यात आला होता. आता हा मासा सगळीकडेच पसरला आहे. हा मासा आपल्या पिलांची काळजी घेतो (असा गुणधर्म माश्यात फारसा बघायला मिळत नाही), आपल्या पिलांना तोंडात ठेवतो. तो इतर माश्यांची अंडी खातो, कोणत्याही परिस्थितीत जगतो, त्यावर रोग येत नाही इत्यादी.
जागतीक व्यापाराची सुरुवात झाल्या नंतर अशा अनेक परदेशी प्रजाती भारतात घर करायला लागल्या. बेशरम, जलपर्णी, गाजर गवत ही त्यांची काही वनस्पती उदाहरणे.
जैवविविधता संपण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक कारणात परदेशी प्रजातींची वाढत चाललेली संख्या हे एक महत्वाचे कारण दिल्या जाते. कधी मत्स्य पालनाला उत्तेजन मिळावे म्हणून तर कधी निव्वळ निसर्गाबद्दलच्या आपल्या अज्ञानामुळे अनेक नवीन प्रजाती आपण भारतीय निसर्गात टाकल्या ज्याची फार मोठी आर्थिक व पर्यावरणीय किमंत आपल्याला चुकवावी लागणार आहे/लागत आहे.
परदेशी प्रजाती जेंव्हा इतर ठिकाणावरुन येतात तेंव्हा ते आपल्या सोबत त्यांचे शत्रू घेऊन येत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणतेही शत्रू नसल्याने ते नव्या पर्यावरणात झपाट्याने वाढतात. स्थानीक प्रजाती आणि परदेशी प्रजातींच्या खाद्य सवई आणि अधिवास एकच असल्याने त्या स्थानीक प्रजातींशी स्पर्धा करतात आणि स्थानीक प्रजातींचा विनाश घडवून आणतात.
साधारणत:  तीन कारणांनी परदेशी प्रजाती नव्या पर्यावरणात येतात. एक म्हणजे अपघाताने त्या पर्यावरणात निसटतात. ह्यात प्रामुख्याने रोग निर्माण करणाऱ्या सुक्ष्म जिवांचा आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश होतो. दुसरं म्हणजे एका विशीष्ठ उद्देशांसाठी काही प्रजाती निर्यात केल्या जातात आणि मग त्या पर्यावरणात सुटतात उदा. शोभेसाठी काचघरात मत्स्य पालनाकरीता आणलेले मासे कधी कधी नैसर्गिक प्रवाहात सुटतात आणि तीसरे कारण म्हणजे आर्थिक फायद्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी काही प्रजाती जानूनबुजून आनल्या जातात. अनेक अभ्यास आता स्पष्ट करायला लागले आहेत की स्थानीक परिसंस्था जर धोक्यात येत असेल तर अनेक परदेशी प्रजातींना स्वत:चा जम बसवायला चांगलाच वाव मिळतो तसेच जागतीक तापमान वाढीने सुद्धा स्थानीक प्रजाती कमी होऊन परदेशी प्रजातींच्या संखेत वाढ होऊ शकते.
माश्यांबद्दल आपण विचार करु, आज भारतातील मत्स्य सृष्टीला परदेशी माशांचा प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. विदर्भापुरता विचार केला तर आज विदर्भात ५ प्रकारच्या माश्यांच्या परदेशी प्रजाती पर्यावरणात सोडण्यात आल्या आहेत. त्यात चंदेरा, तिलापीया, सायप्रिनस, आफ्रिकन मागुर, गप्पी ह्यांचा समावेश होतो. विदर्भात आणि इतर ठिकाणी सुद्धा सायप्रिनस नावाचा मासा मत्स्य पालनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातो. ह्याच सायप्रिनस माश्याने काश्मीर खोऱ्यातील सिजोथोरॅसीनी नावाच्या स्थानीक माश्यांच्या एका मोठ्या गटालाच संपवून टाकलं आहे. दुसरी माश्यांची प्रजाती म्हणजे सिल्वर कार्प (चंदेरा) सुद्धा आपल्याकडे मत्स्यपालनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातो. ह्या माश्याने सुद्धा गोविंदसागर आणि अन्य अनेक जलाषयातील कटला ह्या स्थानीक प्रजातीला संपवून टाकलं आहे.  
माशांच्या बाबतीत सरकारी मत्स्य विभागाकडे पसरणाऱ्या परदेशी माश्यांबद्दल कोणतीही माहीती नाही, अशा माश्यांच्या पसरण्याने आपल्याला मोजाव्या लागणाऱ्या पर्यावरणीय कीमती बद्दल कमालीचे अज्ञान दिसून येते. केवळ उत्पादन वाढ हा एकच उद्देश्य ठेऊन पर्यावरणात सोडलेल्या ह्या प्रजातींमुळे फार मोठा धोका स्थानीक जैवविविधतेला पोहोचणार आहे. परदेशी माशांच मत्स्य पालन जरी कितीही सक्सेसफुल ठरत असलं तरी सुद्धा मासेमारांची मोठी लोक संख्या अजुनही नद्यांमधील स्थानीक माशांवरच अवलंबून आहे. कारण मोठ्या तलावातील मासेमारीचे हक्क अजूनही मोठ्या भांडवलदारी मत्स्य पालकांच्याच हाती आहेत. स्थानीक माशांच्या संपण्याने अनेक ठिकाणच्या स्थानीक मासेमारांवर चक्क उपासमारीची वेळ येत असल्याचे चित्र आहे.  

एकुणच काय तर सरकारी पातळीवर परदेशी प्रजातींबद्दल निश्चित असे धोरण ठरवण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा धोरणात स्थानीक प्रजातींचेच प्रजनन घडवून आणून त्यांच्या उपयोगाला उत्तेजन देता येईल. अनेक ठिकाणी स्थानीक माश्यांच्या प्रजननाकडे व त्याच्या वापराकडे अनेक सामाजीक संस्था व अभ्यासक वळत आहेत. परदेशी प्रजातीच्या वापराने निकटगामी फायदा मिळेल पण दूरागामी तोटा होणार आहे हे आता समजायला लागले आहे. तिलापीयासारख्या प्रजाती वापरण्यावर सरसकट बंदी घालण्याची गरज आहे (तिलापीयाच्या वापरावर अमेरीकेसह अनेक राष्ट्रांमध्ये बंदी आहे!). अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की जर स्थानीक पर्यावरण मानवी कारणांमुळे खराब होत असेल तर अशा बदललेल्या पर्यावरणात परदेशी प्रजाती जास्त चांगल्या प्रकारे आपला जम बसवतात अशा परिस्थितीत स्थानीक पर्यावरण जास्त चांगले कसे करता येईल हे बघायला हवे. एकदा जंगल किंवा गवताळ प्रदेश उभे राहिले की गाजर गवत तिथे टिकत नाही असा अनुभव आहे.

Thursday, January 16, 2014

एक दुर्लक्षीत मित्र



एक दुर्लक्षीत मित्र
आपल्या आसपासचे काही प्राणी दुर्लक्षीत असतात. काही प्राण्यांना आपण गृहीत घरुन असतो. असाच एक प्राणी आहे, डुक्कर. आदिवासी समाजात डुक्कर हा प्राणी फार महत्वाची भुमिका बजावतो. अनेक सणावाराला आणि महत्वाची मेजवानी देण्यासाठी डुकराच्या मांसाचे फार महत्व आहे. डुक्कर हा आकाराने फार मोठा प्राणी असल्याने एकट्या कुटुंबासाठी त्याचे मांस जास्त होते त्यामुळे समुहातच त्याच्या मासाचे वाटे केले जातात. प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर खास करुन डूकरांसाठी लाकुड आणि कवेलुंचा उपयोग करुन तयार केलेलं एक घर असते, त्याला ’पदगुडा’ म्हणतात (गोंडी भाषेमध्ये पदी म्हणजे गावठी डुकर आणि गेडापदी म्हणजे रानटी डुक्कर). लोक सांगतात की डुकराचे घर हे आतुन फारच स्वच्छ असते. डुक्कर हा आपल्या घरात कधीच घान करत नाही. मेंढ्यात ८-१० पिलांच्या कळपासह आरामात चाललेली डुकरीन बघीतली की जगाची चींता न करता आपल्याच मस्तीत चाललेल्या परम योग्याची आठवण येते. आपल्या पिलांना दुध पाजताना डुकरीनीच्या चेहऱ्यावरचा परम तृप्तीचा भाव प्रत्येक क्षणाला जीवनाचा आनंद लुटणाऱ्या तपस्व्याची आठवण करुन देतो. डुक्कर हा प्राणी खरं म्हणजे गाढवाच्या स्वभावाचा आहे असं मला वाटतं, शांत, समजदार, आपण ह्या जगात कशासाठी आलो आहे याची पुरेपुर जाणीव असलेला आणि सदासर्वदा आपल्या धेय्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नात असलेला हा प्राणी! हा प्राणी कोणालाही त्रास देत नाही, फार काही आरडाओरड करत नाहीत, चावत नाही, त्याची काळजी घेणे फार सोपे इत्यादी. पण राणडुकरांच्या बाबतीत असं नाही. त्याचा स्वभाव उग्र, तो मस्तीखोर, त्याची शिकार करणे अवघड, तो शेतीचे नुकसान करतो, तो मानसावर हल्ला करुन त्याला गंभीर दुखापत करु शकतो. राणडुकराचं २०० किलोचं धुड जेंव्हा मानसावर आदळतं तेंव्हा वाचवनारा इश्वरच असतो. प्रा. सुकुमारांचं हत्तींवरच पुस्तक वाचत होतो. हत्ती शेतीची नासधुस कशी करतो, मानसावर हल्ला कसा करतो याचं फार चांगल वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे. मला हत्तीत आणि राणडुकरात बरच साम्य आढळतं. त्यांची शेतीची नासधुस करण्याची पद्धत एक सारखीच वाटते; म्हणजे खानं कमी नाश जास्त!
आदिवासींकडे असलेल्या संपत्तीबद्दल मला मोठं आश्चर्य वाटत आलं आहे. त्यांच्या संपत्तीत शेती, पाळीव प्राणी ह्यांचा फार मोठा सहभाग असतो. त्या संपत्तीतला डुक्कर हा महत्वाचा घटक. ती आदिवासींची एक प्रकारची जीवंत संपत्ती आहे. ते प्रत्येकाकडे असायलाच हवे अन्यथा तुम्ही गरीब समजले जाण्याची शक्यता असते. महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात आजकाल एक मजबुत आणि स्वस्त वाहन फार लोकप्रिय होत आहे, कमी अंतरावर जाण्यासाठी ह्याचा उपयोग करतात. याला लोक डुक्कर म्हणतात. एकदा मध्यप्रदेशात फिल्डवर्क करतांना लोकांनी त्याच वाहणाला ’सुअर’ म्हटल्यावर गम्मत वाटली!
अभ्यासाच्या बाबतीत मला वाटतं आपण काही प्राण्यांवर अन्यायच केलेला आहे. यातील तीन प्राणी म्हणजे पाळीव डुक्कर, गाढव आणि पाळीव कुत्रा. ह्या प्राण्यांचा परिस्थितीकीय अंगाने, स्वभावावर फारसे अभ्यास झालेले दिसत नाहीत, हे तिन्हीही प्राणी ग्रामीण भारताचे फार महत्वाचे भाग असुनही. मेंढ्यात प्रत्येक घरात सरासरीने ५ ते ६ डुकरं तरी असतात आणि २ ते ३ कुत्रे. सकाळीच पदगुड्यातुन मुक्त केलेली डुकरं दिवसभर गावाच्या आसपास चरत असतात. संध्याकाळी त्यांना पदगुड्यात पुन्हा बंद केल्या जाते.
पुढे जाण्याआधी डुकरांबद्दल थोडी अधीक माहिती देण्याची माझी इच्छा आहे. सस्तन प्राण्यांच्या सुईडी (Suidae) ह्या परिवारातली डुकर ही जात ज्याला शास्त्रिय भाषेत सस स्क्रोफा (Sus scrofa) म्हणतात. पाळिव डुक्कर ही त्याची उपजात (Sus scrfa domestica). भारतात आढळणा-या जंगली डुकरांना सस स्क्रोफा क्रिस्टाटस (Sus scrfa cristatus) म्हटल्या जातं. भारतात वाघांचं ते एक महत्त्वाचं खाद्य असतं. ७ ते ९ हजार वर्षांआधी मानवाने डुकराला पाळायला सुरुवात केली असावी. जग भरात वेगवेगळ्या ७ प्रदेशांमध्ये एकाच वेळी जंगली डुकराला माणसाळवण्याची सुरुवात झाली असावी असे अभ्यासक सांगतात. मांसासोबतच याची मजबुत हाडे शेकडो वर्षांपर्यंत आयुधं आणि ढाली बनवण्यासाठी वापरात होती आणि याच्या केसांचा उपयोग तेंव्हाही आणि अजुनही ब्रश तयार करण्याकरीता केला जातो. एखाद्या व्यक्तिला निर्बुद्ध, अस्वच्छ, आळशी म्हणून हिनवण्यासाठी आपण डुक्कर ह्या शब्दाचा शिवी म्हणून उपयोग करत असतो. प्रत्यक्षात मात्र डुक्कर हा फार बुद्धीमान प्राणी आणि अभ्यासकांनुसार कुत्रे आणि मांजरांपेक्षाही जास्त चांगल्यापेक्षा त्यांना प्रशिक्षीत केल्या जाऊ शकते. जगभर हा प्राणी आढळतो. जगभरातल्या आदिवासी व अन्य संस्कृतित डुकरांच महत्वाचं स्थान आहे. चिन मध्ये डुक्कर हे त्यांच्या बाराव्या राशीचं प्रतिक आहे. चिनी संस्कृतीत डुक्कर हे ओज, चेतना आणि जीवनशक्ति चे प्रतिक मानण्यात येते.  मलायन आर्चीपेलागोचा भाग असलेल्या बॅर्नीयो (Borneo) देशात जंगली डुकरांच्या कवट्या बहादुरीचे प्रतीक म्हणुन ओळखल्या जातात व मानसाच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत दफन केल्या जातात. निकोबार बेटांवर सुद्धा डुकरांचे सांस्कृतीकदृष्ट्या फार महत्व आहे; त्यांचे डुकरांबद्दलचे प्रेम वाखाणन्यासारखे असते, अगदी डुकरांच्या प्रेमात त्यांनी गाणी आणि कविता सुद्धा लिहल्या आहेत. डुकर हे संपत्तीचे ध्योतक समजल्या जाते आणि दंड म्हणुन देण्याच्या ऐवजात डुकरांचा वापर करण्यात येतो. हिंदु धर्मात विष्णूचा तीसरा अवतार वराहाच्या स्वरुपातच होता. हिरण्ययक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला सागराच्या तळाशी लपवुन ठेवले तेंव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूने वराहाचे रुप घेतले आणि सागराच्या तळातुन धरतीची सुटका केली. ह्याच काळापासुन नव्या कल्पाची सुरुवात झाली होती. हिंदू धर्मात १८ पुराणांपैकी एक पुराण वराह पुराण सुद्धा आहे.       
असो, ह्या प्रकरणाचा उद्देश डुकरांच्या मी नोंदवलेल्या एका विशिष्ठ स्वभाव विशिष्ठावर प्रकाश टाकणे हा आहे. एक दिवस कुठे तरी जाण्यासाठी गडचिरोलीच्या बसस्टॅंडवर उभा होतो. आपल्या ८-१० पिलांसह एक भली मोठी डुकरीन आरामात समोरुन चालली होती. अचानक समोरुन येणाऱ्या बसने एका मध्यम आकाराच्या डुकराला चिरडले. तो जागीच ठार झाला. अगदी दोन मिनीटांसाठी सारी डुकर मंडळी स्तब्ध झाली; पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी मेलेल्या पिलाला खायला सुरुवात केली. पाच मिनीटांच्या कालावधीत हाडांसह, कवटीसह अख्ख पिल्लू साऱ्या डुकरांनी फस्त केलं आणि जणुकाही काही घडलच नाही ह्या तोऱ्यात मजल दरमजल करीत तो काफीला निघुन गेला.
बेंगलुरला पोहचल्यावर प्रा. माधव गाडगिळांना मी हे निरीक्षण सांगीतलं. त्यानी सांगीतलं की ’कॅनाबॅलीझमचा’ (स्वत:च्याच प्रजातीला खाउन टाकण्याची प्रवृती. ही प्रवृत्ती सस्तन प्राणी जगतात फारशी आढळत नाही) हा एक प्रकार आहे. जेंव्हा डुकराना वाटलं असेल की आता आपल्या हातात काहीच नाही तेंव्हा संसाधन वाया न जाऊ देण्यासाठी त्यांनी स्वत:च फस्त करुन टाकलं. ह्यासाठी त्यांनी एक उदाहरन सुद्धा सांगीतलं. हावर्ड विद्यापीठातुन परतल्यानंतर ते पेपर वॅप्स (Paper Wasp) नावाच्या भिंगोटीच्या स्वभावाचा अभ्यास करत होते. भिंगोटीच्या एका वसाहतीत बऱ्याच भिंगोट्या आणि त्यांची अंडी होती. काही दिवसानंतर अंड्यावर एक रोग आला आणि हळुहळु अंडी नष्ट व्हायला लागली. आता आपली अंडी वाचण्याची शाश्वती नाही हे जानुन भिंगोट्यांनी स्वत:च ती फस्त करायला सुरुवात केली!
हे ऐकुन फारच अंतर्मुख झालो. मानवी जीवन मुल्य आणि नैसर्गिक मुल्य यात बरीच तफावत आहे. निसर्ग फायदे आणि तोटे ह्या तत्वावर चालतं. तीथे सिमीत संसाधनातुन जीवनाचा प्रवास कसा अखंडीतपणे सुरु राहिल हे बघावं लागतं. तीथे संसाधन वाया घालवुन चालत नाही. संसाधन (उदा. प्रथीनं) तयार करण्यासाठी निसर्गाला बरीच मेहनत घ्यावी लागते ते असेच वाया गेलेले चालत नाही. कोणत्याही परीस्थितीत संसाधनांचे रुपांतरन उर्जेत व्हायला पाहीजे ही निसर्गाची ठाम भूमिका असते. निसर्ग हा मोठा काटकसरी आहे!



आदिवासींचे निसर्ग संवर्धन
डा. निलेश हेडा

आदीवासी आणि निसर्गावर अवलंबुन असणारे लोक संसाधनांचा अती उपयोग करतात काय? गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा लेखा ह्या गोंड आदिवासींच्या गावात दोन वर्ष वास्तव्यास असतांना या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. आणि उत्तर आहे नाही. या उलट आदिवासी निसर्गाचं संरक्षणच करत आले आहेत याचाही उलगडा झाला.
या संबंधात लोपेज, माधव गाडगीळ सारख्या काही शास्त्रज्ञानी केलेले अभ्यास मला आठवले. आदिवासी जीवनात संसाधनांचा अतीवापर संभवत नाही असं ते म्हणतात. जीथे आदिवासी आहेत तीथे तीथे जंगल अजुनही टिकुन आहे या पेक्षा मोठा पुरावा आणखी काय असु शकतो! दोन तीन कारणांनी आदिवासी संसाधनांचा दुरुपयोग, अतीउपयोग करत नाहीत, एक म्हणजे संसाधन मिळवण्याच्या ज्या पारंपारीक पद्धती आहेत त्या फारच साध्या असतात, कितीही प्रयत्न केला तरी एका विशीष्ट काळात त्या पद्धतींनी फारसं काही हाती लागत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, संसाधनांवर अवलंबुन असणारी लोकसंख्या. गडचिरोली जिल्ह्यात किंवा अन्य ही आदिवासी क्षेत्रात लोकसंखेची घनता अन्य भागाच्या तुलनेत फारच कमी आहे, त्याचाही परिणाम एकुणच संसाधन कमी वापरण्यात होत असतो.
तीसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या संसाधनांचा उपयोग करण्याची पद्धती ज्याला परीस्थितीकी शास्त्रात ’मल्टीपल रिसोर्स युज स्ट्रॅटेजी’ (Multiple Resource Use Strategy) असे म्हणतात. एकाच प्रकारच्या संसाधनांवर लोक जर अवलंबुन असले तर ते विविक्षित संसाधन हा हा म्हणता संपुण जावू शकते, पण वापरायला अनेक प्रकारची संसाधनं उपलब्ध असल्याने निसर्गचक्रात सर्वच संसाधनांचा वापर एका नंतर एक करता येतो. ज्या वेळी एक प्रकारचे संसाधन फळण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले असते तेंव्हा अन्य संसाधनांचा विकल्प उपलब्ध असल्याने पहिल्या संसाधनाला फळन्यासाठी (प्रजननासाठी) बरीच उसंत मिळालेली असते. 
चौथी गोष्ट आहे, संचय करुन न ठेवण्याची मानसीकता. मेंढ्यात संसाधनांचा संचय करायची मानसीकता मला कधीही दिसली नाही. वर्तमान काळात जगणारे हे लोक; महाविरांचा अपरिग्रहाचा सिद्धांत माहित नसुनही लोक अपरीग्रह नामालुमपणे करतात.
आणि पाचवी गोष्ट आहे, संसाधनांचा विवेकशील उपयोग करण्याला कारणीभूत असणारे अलीखीत सामाजीक नियम, परंपरा व धार्मिक समजुती.
निसर्गावर आश्रीत असलेले लोक पारंपारीक पद्धतीत दोन स्तरांवर निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न करतात असे अभ्यासक मानतात. एक म्हणजे प्रजातीच्या पातळीवर, म्हणजे एखाद्या प्रजातीला अभय प्रदान करणे. उदा. माकडाला भारतातल्या बहुतांश भागात अभय प्रदान केलेलं आहे किंवा वडा पिंपळाच्या झाडांना कापण्यावर बंदी केलेली असते. दुसरी पातळी म्हणजे, परिसंस्थेच्या पातळीवर. उदा. देवराया आणि पवित्र कुंड. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. इथल्या झाडांना तोडायला बंदी असते. पवित्र तळ्यातील मास्यांना किंवा पाणपक्षांना पकडण्यावर धार्मिक बंदी असते. प्रजातीच्या पातळीवर; काही प्रजातींना पवित्र मानने, काही प्रजातींचा उपयोग धार्मिक व मंगल कार्यात करणे, काही विशिष्ठ वयात काही प्रजातीना न खाने, काही विशीष्ठ काळातच प्रजातींचा उपयोग करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 
मेंढ्यातील गोंड लोकात विविध गोत्राचे (आडनावांचे) लोक विविध प्रकारच्या प्राणी वनस्पतीना देव मानतात, ज्याला इंग्रजीत ’टोटेमीक स्पेसीज’ असे म्हणतात. भारतात अंदाजे ३००० च्या आसपास विविध लोकसमुह आहेत. त्यातील जवळ जवळ १००० जनजाती ह्या वनस्पती प्राण्यांना देव मानतात. गोंड लोक हे मुळत: निसर्ग पुजक आहे. गोंड लोकात विविध आडनाव असणाऱ्या लोकांचे विविध देव असतात. ते साधारणत: वनस्पती किंवा प्राणी असतात. लोक समजतात की त्यांच्या कुल देवतेच्या प्रजातींपासुन त्यांचा वंश पुढे चालत आला आहे. आपल्या कुलदेवतेला लोक खात नाहीत किंवा कोणतीही इजा करत नाही.
उदाहरणार्थ ’हलामी’ आडनावाच्या लोकांनी बोद मासा खावू नये असा नियम आहे तर ’नैताम’ आडनावाच्या व्यक्तिंनी कासव, ’दुगा’ हे सापाला देव मानतात तर ’हिचामी’ एक प्रकारच्या किटकाला, ’गावडे’ निल गाईला माता मानतात तर ’कुमोटी’ आंब्याच्या झाडाला इत्यादी इत्यादी. मेंढ्यात प्रत्येक आडनावाच्या व्यक्तिचे कोणते देव आहेत याची मी यादी तयार केली, तेंव्हा मी आच्छर्यचकीत झालो, कारण अगदी किटकांपासुन तर सस्तन प्राण्यांपर्यंत प्रत्येक वंशाचे आपले देव होते. अशा प्रकारे विविध गटांनी (विविध वंशाच्या लोकांनी) काही विशिष्ठ प्रजातींना अभय देण्याचं काय कारण असावं? कारण अगदी सोपं आहे, एका विशीष्ठ गटाने एखादी प्रजात वापरली नाही म्हणजे ती इतरांना वापरायला मोकळी असते त्यामुळे एकाच प्रजातीवर येणारा सर्व लोकांचा ताण कमी होतो.
ज्या प्रमाणे काही विशीष्ठ प्रकारच्या प्रजाती काही आडनावाचे लोक खात नाहीत (इजा करत नाहीत) तसच काही विशीष्ठ वयातल्या व्यक्तिनी काही विशीष्ठ प्रकारचे प्राणी खावू नये असा प्रवाद आहे. उदा. लग्नाआधी करीयाल उसीड, बेहरा किडेर (सुतार पक्षी), काकड (पानकावळा) इत्यादी पक्षी खावू नये असा दंडक आहे.
आपण विचार करुया की जर फळं परिपक्व होण्याआधीच लोकांनी एकमेकात स्पर्धा करुन ती तोडायला सुरुवात केली तर एकतर चांगल्या प्रतिची फळं ही मिळणार नाही आणि निसर्गाचही नुकसान होईल. या साठी काही विशिष्ठ तीथी नंतरच एखादी विशिष्ठ गोष्ट वापरावी असा अलिखीत नियम मेंढ्यात आहे. उदा. चिचोडा भाजी (एक प्रकारची जंगली भाजी), आवळा, करवुल माटी (एक प्रकारचा जंगली खाद्य कंद) ह्या गोष्ठी चुरनाच्या (चुरना = धान कापणी व मळनी) आधी (= डिसेंबर जानेवारी) खाउ नयेत असा नियम आहे. तर पळसवेल, वराली (एक प्रकारची जंगली भाजी), चहा डोडो आखाडी (जुलै - आगस्ट) च्या पुर्वी खात नाहीत. आदिवासी समाजात पोलोची प्रथा पाळली जाते. पोलो म्हणजे सुट्टीचा दिवस. त्या दिवशी कोणतेही शेतीकाम किंवा अन्य काम करत नाही, त्या दिवशी देवपुजा केली जाती. बऱ्याच प्रजाती ह्या पोलो नंतरच वापरल्या जातात.
आता आपण विविध प्रकारच्या आधिवासाच्या पातळीवरच्या निसर्ग संवर्धनाच्या पारंपारीक प्रयत्नांचा आढावा घेउ. आधुनिक समाजात सरकारी प्रयत्नांनी घोषीत केलेले वन्य जीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं इत्यादी असतात. आदिवासी समाजातही काही जागांना त्यातील विविध जीवजातींसह अभय दिलेलं असतं. यातला पहिला प्रकार म्हणजे देवराई. अशी एक देवराई मेंढ्यातही आहे. यातला दुसरा प्रकार असतो पवित्र तळी किंवा डोह. ह्या दृष्टीने मेंढ्याच्या लगतहुन वाहणाऱ्या कठाणी नदीवरील ’देवुर कुंडी’, ’वादादीन’, ’देव डोह’ सारख्या ठिकाणी लोक मासे पकडत नाहीत. अशी ठिकाणं म्हणजे माश्यांसाठी एक प्रकारची अभयारन्ये (की अभयाकुंडे!) असतात.
अशा प्रकारे अजूनही भारतातल्या अनेक भागात पारंपरिक पद्धतीने निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्य प्रवाहातल्या समाजाने निसर्गाला वाचवण्यासाठी या सर्व निसर्ग मित्रांपासुन शिकण्याची गरज आहे.
                                                                                               
डा. नीलेश हेडा,
संवर्धन, कारंजा (लाड)
(०९७६५२७०६६६)

(लेखक रुफोर्ड मारीस फाउंडेशन, लंडन चे नदी अभ्यास व संरक्षणाच्या बाबतीतले फेलो आहेत).

Saturday, November 16, 2013

माझे आदिवासी खाद्य जीवन
डा. निलेश हेडा
मेंढ्यातले खाद्य जीवन लिहितांना बऱ्याचदा माझ्या तोंडात पाणी येत आहे. खाद्य पदार्थांची इतकी विविधता मी इतर कोठे बघीतली नाही. बरेचदा मला वाटतं, जैविक विविधता आणि खाद्य विविधता यांचे सरळ प्रमाण असावे. जितकी जैविक विविधता जास्त तितकी अन्नाची विविधता जास्त. मेंढ्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत भरपूर नवीन गोष्टी खायला मिळाल्यात.
मोहा फुल
मोहा (=इरपी) पासून आपण सुरुवात करुया. मोहा हा आदिवासींचा कल्पवृक्ष. ह्या झाडाने आदिवासींच्या जीवनात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. परिस्थितीकी शास्त्रात "की स्टोन स्पेसीज" नावाची संकल्पना आहे. मराठीत त्याचं भाषांतर आपण ’मूलभुत संसाधन’ असं करुया. परिसंस्थेत साऱ्याच प्रजाती महत्त्वाच्या असतात पण त्यातल्यात्यात काही ह्या फार जास्त महत्त्वाच्या असतात कारण अनेक अन्य प्रजातींचे जगणे ह्या मूलभूत संसाधनांवर अवलंबून असते. मोहा हा त्यातलाच एक. मोहाची फुलं (गोंडीत इरपी पुंगार) म्हणजे एक प्रकारची किशमीश. शर्करेने भरपूर अशी ही फुलं चविष्ठ आणि पौष्ठिक असतात. त्यांच्या फुलांची पोळी करतात. एका कार्यशाळेत मोहाची चिक्की खायला मिळाली, दिल खुश हो गया! मोहाची फुलं पाण्यात टाकून त्या पाण्याला उकळवायचं, काही वेळाने फुलातील सर्व साखर पाण्यात उतरते नंतर फुलांचा चोथा काढून टाकायचा, घटट झालेल्या पाण्याला भरपूर वेळ उकळत राहायचं, घटट झालं की ताटात थापायचं. मजेदार चिक्की तयार! मोहाच्या फळाची साल उकडून मीठ मिरची सोबत खातात.
बांबूचे कंद
आदिवासी जीवनातील दुसरी सर्वात महत्त्वाची प्रजाती म्हणजे बांबू. बांबूचे कंद (गोंडीत वास्ते) हा माझा मेंढ्यातला आवडता खाद्य प्रकार (ह्याच कंदाचा पुढे बांबू तयार होतो). पावसाळ्यात येणारे हे कंद अनेक पद्धतीने खाता येतात पण याचे तळून केलेले वडे म्हणजे चविची पर्वणीच असतात. हे कंद किसुन वाळवून साठवताही येतात आणि ह्याचा मौसम सरला की भाजी बनवून खाता येते. बेंगलुरच्या एका तीनतारांकीत हॅटेलात बांबू कंदाच्या एका डिशची किम्मत ४५० रुपये आहे हे बघून चाट पडलो होतो!
तांदूळ हे मेंढ्यातलं महत्त्वाचं अन्न. हातसडीचे तांदूळ, म्हणजे राईसमील मध्ये न पाठवता घरीच साळी कुटून तयार केलेला तांदूळ. हा तांदूळ जर आपण खाल्ला तर अश्वत्थाम्याच्या कथेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हातसडीचे तांदूळ खाल्ले की जाणवतं आजवर आपण भाताच्या नावाने केवळ ’स्टार्च’ खात होतो. मेढ्यांत जेवणासोबत आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जावा. जेवण कोणतेही असो पण सोबत तांदळाच्या पिठाला आंबवून तयार केलेली आंबील (=जावा) ही हवीच. हा काहीसा आंबट चवीचा पदार्थ शेतात जंगलात काम करताना सोबत घेऊन जातात आणि जेव्हाजेव्हा भूक किंवा तहान लागेल तेव्हा तेव्हा ह्याचा समाचार घेतला जातो. 
वास्ते
पावसाळा थोडासा ओसरायला लागला की बांबूच्या बेटाच्या तळाशी पांढरीशुभ्र भूछत्रे (मशरुम=कुहुक) फुलायला लागतात. भूछत्रांची भाजी एकदा शिवरामकडे खायला मिळाली. हिदकुहुकु, पुतकुहुकु आणि तुमीर बोरसेला हे तीन भूछत्रांचे प्रकार मेंढ्यात खाण्यासाठी वापरतात. प्रथीनांनी भरपूर हे अन्न आम्हा शहरवासीयांना मिळू शकत नाही हे आमचं दुर्दैव. पण योग्य आणि बिनविषारी भूछत्रे ओळखण्यासाठी सरावलेली दृष्टी आणि अनुभव असावा लागतो.
जंगली  भाज्यांची भरपूर  पर्वणी पावसाळ्यात बघायला मिळते. जवळ जवळ २५ प्रकारच्या जंगलातल्या भाज्या खाण्यात असतात. त्यापैकी करटुले ह्या वेलीची फळे गडचिरोली आणि काही अन्य विदर्भातील जिल्ह्यातून शहरात ट्रकांनी भरुन पाठविली जातात.
पावसाळा सरला आहे. पावसाळ्यात भरपूर पोषन मिळवून अनेक कंदांनी आपल्या मुळात भरपूर खाद्य पदार्थ साठवून ठेवले आहेत. जवळ जवळ १५ प्रकारचे कंद लोक खातात (बेसे माटी, हिर माटी, जंगा माटी, कैमुल माटी, करवुल माटी, कसुर माटी, केहका माटी, कुपट माटी, पद माटी, पोवाड माटी, सावली माटी, सुपार माटी, तुपुड माटी, गंजा माटी, हातुर उल्ली माटी! माटी म्हणजे कंद!). काही प्रकारचे कंद आपण आरामात भाजून किंवा उकडून खाऊ शकतो पण काहींच्या बाबतीत काळजीपूर्वक प्रक्रिया करण्याची गरज असते. एकदा एक समाजसेवा महाविद्यालयाचा चमू मेंढ्यात आला. त्यातील एका (अती उत्साही!) विद्यार्थीनीने एक प्रकारचा कंद अभावितपणे चावला. कंद चावताच तिचा श्वास अवरुद्ध व्हायला लागला, तिला धड बोलताही येईनासे झाले. मला वाटलं हिला फिट वगैरेचा झटका आला असावा. जवळ जवळ एक तासानंतर ती पूर्व पदावर आली. तेच मशरुमच्या बाबतीत असतं.
पळसाची फुलं
उन्हाळ्यात विदर्भाची जंगले पळसाच्या लालचुटूक फुलांनी नव्या नवरी प्रमाणे नटतात. त्याची भडक रंगाची फुलं प्रेमीयुगलांच्या ’दिलचा दर्द’ वाढवितात. त्यातच भरीस भर म्हणजे होळी येते. ह्या मादक अशा ऋतूत तीन प्रजाती फार महत्त्वाच्या असतात, दोन प्रजाती मन रंगीत बनवतात तर एक तन! त्यातली एक म्हणजे ताडीची झाडं, ह्याची ताडी पिऊन मस्त होण्यासाठी. दुसरी प्रजाती म्हणजे मोहा, ह्याच्या फुलांच्या दारुबद्दल अधिक सांगणे न लगे! पळसाच्या फुलांपासून रंग आणि ’सॅफ्ट ड्रिंक’ तयार होते. ज्याला ताडी अन मोहाची चालत नाही त्याने पळस फुलांच्या शरबतचा आनंद घ्यायचा! पळसाची लालभडक फुलं सावलीत वाळवून ठेवतात. शरबत बनवायच्या आधी त्यांना काहीवेळ पाण्यात भिजत ठेवायचं, नंतर ओली  झालेली  फुलं  काढून  टाकायची, गाळून साखर टाकली की रंगीत पेय तयार. याची चव काही फारशी मला आवडली नाही पण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी हे शरबत रामबाण आहे. एकदा जंगलात भटकत होतो. सोबत केशव गुरनुले म्हणुन एक मित्र होते. केशव गुरनुले म्हणजे एक प्रकारचे ’जंगल बुक’ आहेत. जंगलाबद्दल त्यांना इतक्या अंतरंग गोष्टी माहीत आहेत की मला त्यांचा हेवा वाटतो. उन्हाळ्याचे दिवस होते, चालता चालता तहान सुद्धा लागली होती आणि प्रचंड थकवाही जाणवत होता. पाणी लवकर प्राप्त होईल याची चिन्ह दिसत नव्हती. केशव मला म्हणाला की तहान आणि थकवा घालवण्यासाठी पळसाच्या फुलांच्या देठाकडची बाजू शोषायची. त्यात असणारा पाण्याचा एक थेंब फार गोड असतो. मी ही युक्ती आजमावली, अशी बरीच फुलं शोषल्यानंतर थोडेसे पाणी शरीराला मिळाले आणि त्यातील ग्लुकोज मुळे थकवा सुद्धा गेला. फार जास्त जर तहान लागली तर मात्र आपल्याला ’डावड तोंडा’ नावाच्या वेलीचा शोध घ्यावा लागेल. ह्याच्या दांडीच्या पेरात भरपूर  पाणी  (एका माणसाची पूर्ण तहान भागवेल इतके!) असते. नारळाच्या पाण्याशी साधर्म्य असणारी चव असलेल्या दावडतोंडाच्या पाण्याने आपला शारीरिक संगणक ’रिफ्रेश’ झालाच म्हणून समजा. याच तीन प्रजातींपैकी ताडीचे कंद सुद्धा एक उत्तम ’टाईमपास’ खाध्य आहे.
आता काही जंगली फळांबद्दल. भिलाई खोजी (गोंडी भाषेत भिलाई म्हणजे मांजर आणि खोजी म्हणजे पायांचा ठसा. मांजराच्या पायांच्या ठश्याचा आकार असणारे फुल असलेली वनस्पती!), जांभूळ (=नेंडी), चिंच (=हित्ता), सुर्या (=कडही), बेल (=महाका), पिही पोरटी, बोर (=रेंगा), उंबर (=तोया) इत्यादी फळे मेंढ्यात चवीने खाल्ली जातात. यातील तेंदू (=तुमरी) आणि चारोळी (=रेखा) बद्दल थोडी जास्त माहिती.
तेंदू ची फळे
मोहा आणि बांबू नंतर आदिवासी जीवनात तेंदू हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्यातच तेंदुला फळे येतात. मी ज्या वर्षी मेंढ्यात होतो त्या वर्षी तेंदु फळाचा बार आला होता. दरवर्षी इतक्या जास्त प्रमाणात फळे लागत नाहीत. लोक सांगतात की एका वर्षी जर का जास्त फळे लागली तर येणाऱ्या वर्षात झाड आराम करतं! ज्या प्रमाणे मोहा फुलं ही आदिवासींची किशमीश आहे त्याच प्रमाणे तेंदु फळे ही त्यांचा चिकू आहे (अन बिब्बे आणि चारोळी म्हणजे काजू!). तेंदूच्या फळांना सुकवून, कणगीत (=ढोलीत) साठवून ठेवतात आणि पावसाळ्यात खातात. त्यावर्षी मी भरपूर तेंदुफळे खाल्ली. कोणत्याही घरी गेलं की घरमालकीन परडीभर फळे आणून पुढ्यात ठेवायची. तसच एकदा चारोळीच्या बाबतीत झालं. जंगलभर चारोळीची झाडं अक्षरश: चारोळीने लगडून गेली होती. त्यावेळी भरपूर चारोळी खाल्ली.
मधाच्या बाबतीत मेंढा भाग्यवान आहे. मधाच्या बाबतीत जो सहभागी अभ्यास मेंढा गावकऱ्यांनी केला, जी व्यवस्थापकीय पावलं उचलली ती अनेक गावांना स्फुर्तीदायक ठरावी अशीच आहेत. मधमाशी हा इटूकला पिटुकलासा जीव पण सहजीवनाचं आणि सामाजिक व्यवस्थापनाचं शिक्षण देणारं ते एक जिवंत उदाहरण आहे. मध तर ते देतच पण त्याच सोबत परागीकरणाची अनमोल सेवा निसर्गाला प्रदान करतं. बहुतांश ठिकाणी मध काढायची जी पद्धत आहे ती विध्वंसक असते. सरळ सरळ पोळे जाळून टाकणे, झाड तोडून टाकणे अशा पद्धतीने मध काढल्यामुळे माशा तर मरतातच पण मधाची गुणवत्ता सुद्धा घसरते. डॅ. गोपाल पालीवाल, एक तरुण वैज्ञानिक, किटकशास्त्राचा पदवीधर आणि त्याच विषयात आचार्याची पदवी मिळवलेला तरुण. त्याने मेंढ्यात बराच काळ ठाण मांडले. लोकांसोबत मधमाशांचा अभ्यास करता करता मध काढायची अभिनव आणि निसर्गानुकूल अशी पद्धतही शोधून काढली. ह्या पद्धतीत त्यांच्या चमुने मेंढ्यात एक अभिनव असा पोषाख तयार केला. ह्या पोषाखामधून मधमाशीचा डंख शरीरापर्यंत पोहचू शकत नाही. हा पोषाख घालून आणि हेल्मेट घालून सायंकाळी झाडावर चढायचं (अंधारात मधमाशांना व्यवस्थित दिसत नाही) आणि मधमाशांच्या पोळ्यात जो भाग मधाचा असतो फक्त तेवढाच कापून काढायचा. ना मधमाशांचा मृत्यू, ना अंड्यांची हानी ! याही पुढे जाऊन गोपाल पालीवाल म्हणतात की, अशा पद्धतीमुळे मधमाशा आळशी बनत नाहीत आणि पुन्हा मध गोळा करण्यासाठी तत्परतेने सज्ज होतात. म्हणजेच जास्त परागीकरण आणि जास्त निसर्ग संवर्धन! असो, माझ्या दोन वर्षाच्या काळात भरपूर मध खायला मिळाले.
मेंढ्याच्या मांसाहारी जीवनाबद्दल मला जास्त लिहिता येणार नाही. ज्यावेळी मी मेंढ्यात होतो तेंव्हा माझ्या विषयाच्या प्राण्याशिवाय (मासे) मी इतर प्रकार खात नव्हतो. माश्यांच्या (=मीन) बाबतीत बरीच विविधता मेंढ्यात बघायला  मिळते. मासे हा आदिवासींचा ’विक पॅइंट’. कठाणी नदी खेरीज माश्यांच्या संदर्भात दुसरा कोणताही स्त्रोत मेंढ्याजवळ  नव्हता. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी लोकांनी सामुहिक व वैयक्तिक स्तरावर आता मासे पाळायला सुरुवात केली आहे. ह्या बाबतीत मेंढ्यातील लोकांनी उचललेल्या एका महत्त्वाच्या पावलाची माहिती इथे द्यावीशी वाटते. मेंढ्यात वनतलाव निर्माण करायचा होता. या कामासाठी सरकारी मदत सुद्धा मिळाली. जंगलातील ’मोलोल कोहोडा’ (=मोलोल म्हणजे ससा आणि कोहोडा म्हणजे नाला. जिथे ससे पाणी प्यायला येतात ती जागा!) ह्या ठिकाणची निवड अभ्यास गटाने केली. मोलोल कोहोडा हे ठिकाण जंगल आणि शेतीच्या सिमेवर आहे. हे ठिकाण निवडण्याच्या संदर्भात दूरदृष्टी ही होती की वन्य प्राण्यांना पाणी मिळावे आणि शेतीलाही. पण तलावाचे काम अर्धे झाले आणि सरकारी निधीतील पैसा संपला. आता काय करावं? असा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला. त्यातच पावसाळा आला. तलाव पाण्याने अर्धा भरला. त्यात गावकऱ्यांनी माश्यांची बीजाई सोडली. मासे मोठे झाले. गावकऱ्यांनी ठरवलं की जर एक किलो मासे कोणाला हवे असतील तर त्याने १० बाय १० फुट एवढा तलाव खोदायचा. हा हा म्हणता तलावाचे काम पूर्ण झाले. आज त्या तलावात माश्यांचे चांगलेच उत्पादन लोक घेतात आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला मोठ्या अभिमानाने हा तलाव दाखवतात.
उपरोक्त खाद्य जीवन कमी अधिक प्रमाणात बऱ्याच आदिवासी भागात बघायला मिळेल. खाद्य साधनांची विविधता हे त्यातील समान दुवा आढळतो. इतके खाद्य प्रकार असुनही आजकाल बऱ्याच आदिवासी भागात  कुपोषणाचे  प्रमाण  जास्त का आहे? या प्रश्नाचा विचार आपल्याला अनेक अंगानी करण्याची गरज आहे. मेंढ्यात कुपोषण नाही, कारण अन्नाची शाश्वती आहे. जंगल भरपूर आहे, चांगल्या स्थितीत आहे. ग्रामसभा सक्षम असल्याने अन्नाचे दुर्भिक्ष जाणवत नाही. ’धान्य कोश’ सारख्या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्याने काही विशिष्ठ काळात जाणवणारे अन्नाचे दुर्भीक्ष आता जाणवत नाही. पण अन्य ठिकाणी अशी परिस्थिती आता राहिली नाही. जंगल नष्ट झाल्यामुळे आता पूर्वीसारखी अन्नाची शाश्वती राहिली नाही. सरकारी स्तरावर याबाबतीत बरेच प्रयत्न केले जात असतात पण असे प्रयत्न म्हणजे वरवरची मलमपटटी केल्यासारखे असतात. मूळ प्रश्न आहे जैवविविधतेचे संवर्धन आणि लोकांना त्या संसाधनाना वापरण्याचा हक्क. इंग्रजाच्या आगमनानंतर आजवर सुद्धा जंगल नावाची संकल्पना केवळ सागवान सारख्या काही मोजक्या प्रजातींची शेती इथपर्यंतच सिमीत राहिलेली आहे. यवतमाळच्या जंगलात फिरताना ही भीषण परिस्थिती वारंवार जाणवत होती. जैवविवीधतेच्या संकल्पनेची माहिती नसणाऱ्या व्यक्तिसाठी इतके घनदाट जंगल पाहून आनंदाच्या उकळ्या फुटाव्या पण त्या जंगलाला जंगल न म्हणता सागवानाची शेती म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल.  लोक सांगत होते, ’गावाला भरपूर जंगल आहे पण आमच्या काय कामाचे? सारं जंगल सागवानाने भरलेलं, सागवान खाता येत नाही, त्याला विकता येत नाही, उलट ह्या जंगलाचा त्रासच आहे’.
त्यामुळे कुपोषणाचा विचार करताना मूलभूत विचार हा जंगलावरच्या लोकांच्या हक्काचा व्हायला हवा, जैवविवीधतेला वाचविण्याचा व्हायला हवा. जंगलावरचे हक्क मिळाले तर लोक जंगल वाचवतील, स्वत: जाणीवपूर्वक निर्णय घेतील, जैवविविधता वाचेल कुपोषण कमी होईल. १९७० पासुन भारतातील २५० जिल्ह्यात ’पोषण सुधार कार्यक्रम’ (nutrition enhancement programme) राबविल्या जात आहे; पण ह्या कार्यक्रमाचे फलित काय आहे? तर कुपोषणाचा आलेख वाढतच चाललाय. कारण रोग वेगळाच आहे आणि औषधी वेगळीच दिल्या जात आहे. चक्क लोकांना भिकाऱ्यासारखे अन्न वाटप करणे सुरु आहे. पण शाश्वत दृष्टीने प्रयत्न केले जात नाहीत.
दुसरा मुद्दा ह्या खाद्य जीवनाशी संबंधित इतक्या सरस गोष्टी असुनही त्यांना बाह्य जगात स्थान का नाही. का मोहाची फूल व्यवस्थितपणे पॅक केलेल्या वेस्टनात मिळत नाही. कारण ह्या गोष्टींची जाहिरात नाही. ह्या सर्व गोष्टींवर प्रक्रिया करण्याचं तंत्र लोकांकडे नाही. मेंढ्यात ग्रामसभेतर्फे मोहाची खरेदी केल्या जाते. एकदा पावसाळ्यानंतर मोहाच्या गोदामाला बघायला गेलो. मोहाच्या फुलांमधून चक्क अळ्या बाहेर येत होत्या, त्याचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठीच केल्याजाणे शक्य होते. तेच डिंकाच्या, चारोळीच्या, तेंदू फळाच्या बाबतीत आहे, मुल्यवृद्धीच्या तंत्राची कमतरता.
येणारा काळ हा हवाबंद खाद्य पदार्थांचा काळ असणार आहे. एक मोठी बाजारपेठ ह्या क्षेत्रात उभी राहणार आहे असे जागतिक बाजारपेठेच्या एकुणच प्रवाहावरुन दिसते. कोणत्याही किटकनाशकापासून वंचीत अशा वनखाद्याच्या क्षेत्रात आदिवासीं क्षेत्राला बरीच संधी आहे. गरज आहे व्यवस्थितपणे आखलेल्या रणनीतीची आणि तळागाळापर्यंत तंत्रज्ञान पोहचवण्याची.