जागतीक तपमान वाढ आणि शहामृग झालेलो आपण
परिस्थितीकी शास्त्रात ’कॅरींग कपॅसीटी’ नावाची संकल्पना आहे. ह्याचं मराठी भाषांतर आपण करु ’धारण क्षमता’. ही संकल्पना सांगते की प्रत्येक परिसंस्थेची (उदा. जंगल, नदी) जीवांच्या संखेला धारण करण्याची व संसाधने देण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेच्या पार जर आपण जीवांची संख्या वाढवत गेलो किंवा नैसर्गिक संसाधनांचं दोहन करत गेलो की अख्ख्या परिसंस्थेचा तोल ढळतो. आजचे पर्यावरणीय वास्तव असेच आहे. निसर्गाच्या क्षमतेच्या पार आपण त्यातुन नैसर्गिक संसाधने घेत आहोत आणि निसर्गाला अपेक्षीत नसणाऱ्या गोष्टी त्यात टाकतो आहोत. ही परिस्थिती आपला घात करायला निघालेली आहे. आणि ह्या परिस्थितीला ’विकास’ असं गोंडस संबोधन देऊन आपण ह्या परिस्थितीला सार्वत्रीक होकारही मिळवून दिला आहे. आपल्या तथाकथीत विकासाचा हाच जर आपला वेग राहीला तर आपला घात होणार आहे.
गेल्या काही वर्षांआधी जगातील एक हजार शास्त्रज्ञांनी फार मोलाचं संशोधन करुन पृथ्वीचे तपमान वाढण्याचा व त्याच्या मानवजातीवरच्या परिणामाचा आलेख जगासमोर मांडला. आसपासच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात सोडलेल्या कार्बन डाय आक्साईड व मिथेन ह्या वायूमुळे पृथ्वीचे तपमान वाढले आहे. ह्या तपमान वाढीमुळे लाखो वर्षात स्थापीत झालेल्या निसर्ग चक्रात फार मोठा बदल झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बदलाचा सर्वात मोठा परिणाम भारत, बांग्लादेश, भुटान, श्रीलंका, नेपाळ ह्याच आशीयायी राष्ट्रांना होणार आहे. ही विषववृत्तावरची राष्ट्रे जगात सर्वात जास्त जैवविविधता धारण करुन आहेत व ह्याच देशात सर्वात जास्त गरीबी आहे हे विषेश.
अभ्यासक मानतात की, ह्या तपमान वाढीने मान्सुन, जो आपला जीवनाधार आहे, त्याचे चक्र बिघडेल. अतीषय जास्त पाउस किंवा अतीषय कमी पाउस अशी परिस्थिती निर्माण होईल. ज्याची सुरुवात झाली आहे. पुणे येथील इंडीयन इन्स्टिट्युट आफ ट्रापीकल मेटेरोलाजी (आयआयटीएम) नावाच्या संशोधन संस्थेने ’सायंस’ नावाच्या जरनल मध्ये २००६ मध्ये प्रकाशीत संशोधन पत्रानुसार अतीवृष्टीचे प्रमाण गेल्या ५० वर्षात १० टकक्यांनी वाढले आहे. बंगरुळ येथील ’द सेंटर फार मॅथेमॅटीकल माडलींग ऍंड कांप्युटर सीमुलेशन’ नावाच्या संशोधन संस्थेने मार्च २००७ मध्ये प्रकाशीत केलेल्या अहवालात दर्शवले की भारतातल्या शुष्क भागात उदा. दक्षीण गुजरात, उत्तर मध्यप्रदेश आणि दक्षीण ओरीसा, अतीवृष्टीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. हे सारे बदल पृथ्वीचे तपमान वाढल्याने होत आहे. पृथ्वीच्या तपमान वाढीचा आणि मांसूनच्या चक्रात बदल होण्याचा काय संबंध आहे? तीरुपती येथील ’नॅशनल ऍटमासफेरीक रीसर्च लेबारेटरी’च्या शास्त्रज्ञांनी ह्या घटनेचे गुढ उकलण्याच्या दृष्टीने बरीच मजल मारलेली दिसते. ’जीओफीजीकल रिसर्च लेटर’ नावाच्या जरनल मध्ये २० सप्टेबर २००८ ला प्रकाशीत झालेल्या संशोधन पत्रात ते लिहीतात की, २६ जुलै २००५ ला एका दिवसात मुंबई शहरात झालेला ९४४ मीमी इतका न भुतो न भविष्यती असा पाऊस ह्या घटनेची सुरुवात होती (पच्छिम विदर्भात वर्षभरातही इतका पाउस पडत नाही). मांसुनचे चक्र हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याच्या तपमानावर अवलंबून असते. गेल्या १०४ वर्षांच्या आकडेवारी नुसार, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढत गेल्याचे दिसते आणि त्याच वेळी अतीवृष्टीचे प्रमाणही. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत चालल्याने समुद्रातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे त्यामुळे तयार झालेली प्रचंड वाफ तापमान कमी होताच पाऊस बनून एकाच ठिकाणी कोसळते आणि काही ठिकाणी अतीवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते.
दुसरा महत्वाचा बदल जागतीक तपमान वाढीमुळे होणार आहे तो म्हणजे ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे. ह्यामुळे समुद्राकाठीवसलेल्या शहरांना उदा. मुंबई, चेन्नई सारख्या शहरांना प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. भारताच्या बाबतीत विचार केल्यास हिमालयाची बर्फाच्छादीत शिखरे वितळून सुरुवातीला गंगेला भरपूर पुर येईल व नंतर ती कोरडी होईल. त्यामुळे उत्तर भारतातील जन जीवन कमालीचे प्रभावीत होणार.
असे म्हनतात की शहामृगाच्या मागे शत्रू लागला तर शहामृग आपले डोके रेतीत खुपसून बसतो. उद्देश्य हाच की त्याला शत्रू दिसू नये. पण शत्रू दिसत नाही याचा अर्थ तो नसतो अशातला भाग नसतो. आपली अवस्था शहामृगासारखी झाली आहे. आपले दुर्दैव हे की ह्या महत्वाच्या पर्यावरणीय बदलाची गंभीरता आपल्या जन प्रतीनीधींना आणि सामान्य जनतेला अजुनही पटलेली दिसत नाही. पर्यावरणाच्या अभ्यासाचे शिलेदार सुद्धा ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन थातुरमातुर समाधान देऊन मिरवतांना दिसतात. आपण निसर्गाच्या सत्यांपासून पाठ फिरवून बसलो आहोत. ह्या परिस्थिती संदर्भात अमेरीकेने भारताला दोष देण्याखेरीज किंवा अमेरीकेने आशीयायी देशांना दोष देण्याखेरीज फारशी मजल मारलेली दिसत नाही. जागतीक तपमान वाढ हा मानवतेला निर्माण झालेला आजवरचा सर्वात मोठा धोका असुन प्रत्येकाने ह्या बाबतीत धर्म, राष्ट्रीयता, विचारधारा, वैयक्तीक स्वार्थ बाजूला ठेऊन विचार करण्याची गरज आहे. तेव्हांच हा विनाश रोखल्या जाईल आणि लाखो वर्षांच्या मेहनतीने निर्माण झालेली जीवसृष्टी अबाधीत राहिल.
डा. नीलेश हेडा
कारंजा (लाड), जील्हा वाशीम
( ०९७६५२७०६६६
(लेखक रुफोर्ड मारीस फाउंडेशन, लंडनचे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत)
No comments:
Post a Comment