Monday, July 13, 2009

नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परिघ

नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परिघ
आमाझीरीया हे मध्यप्रदेशातील सिवणी जिल्ह्यातील एक छोटसं गाव. रुडयार्ड किपलींग नावाच्या लेखकाने ’जंगल बुक’ ह्या पुस्तकात गौरवलेला हा मोगलीचा प्रदेश. सपेरे, बंसोड आणि गोंड आदिवासी ह्या तीन जनजाती ह्या छोट्याशा गावच्या रहिवाशी. ३० ते ४० झोपड्याचं हे गाव. या गावातील ’सपेरे’ हे सापांचा खेळ करुन आणि वनौषधी देवून आपली उपजीवीका करतात, बंसोड हे बांबुच्या वस्तु बनवतात तर गोंड हे शेती आणि जंगलातील वनोपजांवर अवलंबून आहेत. गावातले हे तीन मानवी समूह तीन विभीन्न प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत. तिघांतही संसाधनांसाठी कोणतीही स्पर्धा नाही, आपआपल्या संसाधनांवर पारंपरिक पद्धतीने हे तीनही समूह अवलंबून आहेत. आपआपल्या सामाजीक ’निश’ सांभाळुन आहेत.
परिस्थितीकी शास्त्रात ’इकॅलॅजीकल निश’ नावाची संकल्पना आहे. ही सर्वसमावेशक अशी संकल्पना जशी मानवेतर जीव समूहांना लागू पडते तशीच ती मानवी समाजातील विविध घटकांना सुद्धा लागू पडते. जीव भरपूर असतात पण संसाधनं मर्यादीत असतात, अशा परिस्थितीत सिमीत संसाधनातून उपजीवीका चालवने प्रत्येक जीवाला भाग असते. अशा प्रयत्नातुन मग जगण्याच्या विविध पद्धतींचा जन्म होतो. जर सारे जीव एकच प्रकारच्या पद्धती वापरायला लागले तर संसाधने टिकणार तर नाहीच, पण जीवाजीवात प्रचंड स्पर्धा होवून साऱ्या निसर्गाचाच तोल ढळला जाऊ श्शकतो. इकॅलॅजीकल निशची संकल्पना सांगते की, परिसंस्थेत प्रत्येक सजीवाची एक विशीष्ठ अशी भूमिका, जागा असते आणि त्याच्या त्या खास जागेमुळे त्याचे आणि अन्य सजीवांचे संसाधनांसाठीचे संधर्ष टळतात. आणखी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे मांसाहार करणे ही वाघाची नीश आहे तर गवत खाने ही गाईची. मासेमारी ही मासेमारांची नीश आहे तर शेती करणे ही शेतकऱ्यांची.
आमाझीरीयातील तीनही समुहांच्या आपआपल्या निश आहेत. ते इतरांच्या संसाधनांवर अतिक्रमन करत नाहित. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष होत नाहीत.
पण आता परिस्थिती बदलायला लागलीय. आता पुर्वीच्या संसाधनांवर अवलंबून असने शक्य राहिले नाही. आता साप कमालीचे कमी झालेत. वन्य जीव संरक्षण कायदा झालाय. आता सापांचा खेळ करने शक्य राहिले नाही. आता लोकांनी काय करावं? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आम्ही जेंव्हा पहिल्यांदा गावात गेलो तेंव्हा लोकांमध्ये एक प्रकारची भीती होती. हे वन विभागाचे अधिकारी असावेत, आता आपल्यावर केस तर होणार नाही अशा साशंक मनाने लोक आमच्या कडे बघत होते. पण हळूहळू विश्वास यायला लागला, लोक जमू लागली, लोक बोलती झाली.
साब, आपने जब कानुन बनाया तब हमको पुछा नही, आपने जब कीटनाशक को निकाला तब भी हमको पुछा नही........ अब साप कम हो गये, अब वन विभाग हमारे साप पकडकर ले जाते है, हमको जीने का कोई सहारा नही रहा.”
आमाझीरीया पासून ६०० की.मी. दूर अकोला जिल्ह्याले पारधी हेच मराठी भाषेत बोलत होते. प्रश्न एकच होता. नैसर्गिक संसाधने कमी झालीत. नैसर्गिक संसाधने हिरावून घेण्यात आली. निशचं अतीक्रमन केल्या गेलं. पारधी हे परंपरेने काळविट, ससे, मोर, तीतर, बटेर यांची शिकार करुन उदरनिर्वाह करणारे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता बाजारपेठेच्या प्रभावाने शिकारीवर परंपरेने अवलंबुन नसणारे लोक सुद्धा शिकार करायला लागले आहेत. आधुनिक बंदुका, प्रखर प्रकाशाचे झोत टाकणाऱ्या विजेऱ्या, हात बॅंब चा वापर करुन हे व्यापारी शिकार करायला लागले आहेत. एक प्रभावशाली गट स्वत:च्या निशचा परिघ वाढवून दुसऱ्यांच्या निशवर आक्रमन करु लागला आहे. शिवनी जिल्हा आणि अकोला जिल्हा ह्या दोन्ही ठिकाणचा प्रश्न एकच आहे, संसाधन कमी होने, पारंपरिक नीश नष्ट होणे.
संसाधन कमी होण्याला कोण जबाबदार आहे? सपेरे, बंसोड की पारधी? मला वाटतं ह्या पैकी कोणीही नाही. जबाबदार आहेत बाजारपेठेची भूक भागवनारे, संसाधनांचा अविवेकी वापर करणारे तथाकथीक सभ्य समाजाचे लोक. पारंपरिक लोकांच्या शिकारीच्या किंवा संसाधनांना काढण्याच्या पद्धतीचं इतक्या साध्या असतात की कीतीही प्रयत्न केला तरी त्यातुन फार काही हाती लागत नाही.
जसजसी लोकसंख्या वाढत गेली, यंत्रवादाने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली तसतशी मानसाची भूक वाढत गेली. शहरे वाढवण्यासाठी जंगले दूर हटवल्या गेली, शहरात रोशनाई होण्यासाठी गावातल्या संसाधनांवर आधारीत विज बाहेर पाठवल्या गेली. शहराच्या स्विमींग पुलला भरण्यासाठी गावातले पाण्याचे साठे शहराकडे वळविण्यात आले. मुठभर राजकारण्यांचे आणि बिल्डर्सचे खिसे भरण्यासाठी धरणे बांधल्या गेली. आपली शहरातली सारी मिजास खेड्यातुन वाहणाऱ्या संसाधनांवर अवलंबुन आहे. खेड्यांना नागवून आम्ही शहरवासी भरजरी श्रूंगार करुन बसलो आहोत.
तर असा विचीत्र खेळ आपल्या देशात, नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणाऱ्या लोकांसोबत खेळने सुरु आहे. यामुळे संसाधनांचही नुकसान होत आहे. पुर्वी आसपासच्या संसाधनांबद्दल एक प्रेमाची भावना स्थानिक लोकांमध्ये होती. आपलं जंगल, आपली नदी, आपले तळे म्हणून त्याची जोपासना केली जायची. संसाधनांना वापरण्यासाठी समाजाने निर्माण केलेले काही नियम होते. पण हे सारं आता बदलायला लागलं आहे.
इंजोरी, मानकोपरा हे अडान नदीच्या काठावर वसलेली गावं. वाशिम जिल्ह्यातुन यवतमाळ जिल्ह्यात वाहत जातं अडान ही नदी पैनगंगेला जावुन मिळते. माझ्या पीएचडी निमीत्त ह्या नदीच्या काठावर वसलेल्या भोई आणि धिवर लोकांशी बराच संवाद करता आला. ह्या नदीतील माश्यांवर परंपरेने अवलंबून असलेले भोई हे लोक. अडान नदीवर कारंजा जवळ धरण बांधल्या गेलं. नदीतील माश्यांवरचा भोई लोकांचा हक्क संपला. मग धरणात मासे वाढवण्यात आले. ४५० कुटुंबीयांनी एकत्र येउन सोसायटी स्थापन केली पण काही कारणाने त्याची लिज न भरल्यामुळे धरण हातातून गेलं.
धरन झाल्याने वाहती नदी थांबली. कारंजा सारख्या शहरातील लोकांच्या बगीचातील परदेशी फुलझाडांना पाणी देण्यासाठी धरणाच्या खालच्या लोकांच्या वाटचे पाणी थांबविण्यात आले. आर्णि तालुक्यातील चीमटा गावातील लोक अडान आणि पैनगंगेच्या संगमावर मासेमारी करत होते. दुपार झाली होती. सकाळपासुन दुपार पर्यंत अंदाजे दोन किलोच्या आसपास मासे त्यांनी पकडले होते. चार लोकात दोन किलो मासे, प्रती मानसी अर्धा किलो! चाळिस रुपये किलो बाजारभावाप्रमाणे १० रुपये प्रति व्यक्ति ही त्यांची दिवसभराची कमाई! काठावर धनाड्यड्य व्यक्तिंच्या शेती होत्या. पाच पाच हॅर्स पावरच्या मोटारीने संपूर्ण नदी जानेवारीतच कोरडी करण्याचे उद्योग सुरु होते. एक धिवर म्हातारा व्यथित अंत:करनाने सांगत होता, ’आता संपुर्ण नदी कोरडी होणार. पुढचे सहा महिने कसं जगावं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. नदीच्या आसपासची जंगल कटाई, नदी काठच्या शेतीत किटकनाशकांचा अतोनात वापर, धरने, शेतीसाठी नदीच्या पाण्याचा अविवेकी वापर, मासेमारीसाठी विषांचा प्रयोग, परदेशी माश्यांची पैदास अशा अनेक कारणांनी नदीतील माश्यांची संख्या अतोनात कमी झाली आहे. याचा भुर्दंड भोई, धिवर, केवट सारख्या लोक समुदायांना सोसावा लागत आहे.
एकुणच काय तर, आधूनिक विकासाने पारंपरिक लोकांची नीश पद्धतशीरपणे संपवली आहे.
डा. नीलेश हेडा,
संवर्धन, कारंजा (लाड)
( ०९७६५२७०६६६
(लेखक रुफोर्ड मारीस फाउंडेशन, लंडन चे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत)

No comments:

Post a Comment