मांसुन असा का वागतोय?
मृग कोरडा गेलाय. गेल्या वर्षी न भुतो न भविष्यती इतका कमी पाऊस व-हाडात पडला. रोज पावसाची वाट बघायची आणि रोज पावसानं रुसलेल्या प्रेयसी सारखा नकार द्यायचा असा नैसर्गिक खेळ खेळला जातोय. पावसाच्या लपाछपीमुळे एक प्रकारचा सामाजीक तनाव प्रत्येकच संवेदनशील व्यक्तीनं अनुभवावा असं झालं आहे. पाउस कोठे दडून बसलाय? असे नैसर्गिक बदल का होत आहेत? या प्रश्नांची उत्तरं शास्त्रिय समजावर जाणुन घेण्याची आणि त्यानुसार आपला मार्ग ठरवण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांआधी जगातील एक हजार शास्त्रज्ञांनी फार मोलाचं संशोधन करुन पृथ्वीचे तपमान वाढण्याचा व त्याच्या मानवजातीवरच्या परिणामाचा आलेख जगासमोर मांडला. आसपासच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात सोडलेल्या कार्बन डाय आक्साईड व मिथेन ह्या वायूमुळे पृथ्वीचे तपमान वाढले आहे. ह्या तपमान वाढीमुळे लाखो वर्षात स्थापीत झालेल्या निसर्ग चक्रात फार मोठा बदल झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बदलाचा सर्वात मोठा परिणाम भारत, बांग्लादेश, भुटान, श्रीलंका, नेपाळ ह्याच आशीयायी राष्ट्रांना होणार आहे. ही विषववृत्तावरची राष्ट्रे जगात सर्वात जास्त जैवविविधता धारण करुन आहेत व ह्याच देशात सर्वात जास्त गरीबी आहे हे विषेश.
हवेत वाढलेल्या कार्बन डाय आक्साईड चा आणि तापमान वाढीचा काय संबंध असावा? सुर्या पासुन प्रकाश किरणे पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीला उष्णता प्रदान करतात. परंतू आलेली सारीचं किरण पृथ्वीवर येत नाहीत तर त्याचा बराचसा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन परावर्तीत होऊन परत अवकाशात जातो व पृथ्वीचे सरासरी तपमान ठिक राखल्या जाते. परंतु कार्बन कार्बन डाय आक्साईड पृथ्वीच्या वातावरणात पसरुन राहिल्याने परत जाणाऱ्या प्रकाश किरणांना तो शोषून घेतो व उष्ण किरणांच्या स्वरुपात परत पृथ्वीकडे देतो, परिणामत: पृथ्वीचे तपमान वाढते.
अभ्यासक मानतात की, ह्या तपमान वाढीने मान्सुन, जो आपला जीवनाधार आहे, त्याचे चक्र बिघडेल. अतीषय जास्त पाउस किंवा अतीषय कमी पाउस अशी परिस्थिती निर्माण होईल. ज्याची सुरुवात झाली आहे. पुणे येथील इंडीयन इन्स्टिट्युट आफ ट्रापीकल मेटेरोलाजी (आयआयटीएम) नावाच्या संशोधन संस्थेने ’सायंस’ नावाच्या जरनल मध्ये २००६ मध्ये प्रकाशीत संशोधन पत्रानुसार अतीवृष्टीचे प्रमाण गेल्या ५० वर्षात १० टकक्यांनी वाढले आहे. बंगरुळ येथील ’द सेंटर फार मॅथेमॅटीकल माडलींग ऍंड कांप्युटर सीमुलेशन’ नावाच्या संशोधन संस्थेने मार्च २००७ मध्ये प्रकाशीत केलेल्या अहवालात दर्शवले की भारतातल्या शुष्क भागात उदा. दक्षीण गुजरात, उत्तर मध्यप्रदेश आणि दक्षीण ओरीसा, अतीवृष्टीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. हे सारे बदल पृथ्वीचे तपमान वाढल्याने होत आहे. पृथ्वीच्या तपमान वाढीचा आणि मांसूनच्या चक्रात बदल होण्याचा काय संबंध आहे? तीरुपती येथील ’नॅशनल ऍटमासफेरीक रीसर्च लेबारेटरी’च्या शास्त्रज्ञांनी ह्या घटनेचे गुढ उकलण्याच्या दृष्टीने बरीच मजल मारलेली दिसते. ’जीओफीजीकल रिसर्च लेटर’ नावाच्या जरनल मध्ये २० सप्टेबर २००८ ला प्रकाशीत झालेल्या संशोधन पत्रात ते लिहीतात की, २६ जुलै २००५ ला एका दिवसात मुंबई शहरात झालेला ९४४ मीमी इतका न भुतो न भविष्यती असा पाऊस ह्या घटनेची सुरुवात होती (पच्छिम विदर्भात वर्षभरातही इतका पाउस पडत नाही). मांसुनचे चक्र हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याच्या तपमानावर अवलंबून असते. गेल्या १०४ वर्षांच्या आकडेवारी नुसार, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढत गेल्याचे दिसते आणि त्याच वेळी अतीवृष्टीचे प्रमाणही. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत चालल्याने समुद्रातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे त्यामुळे तयार झालेली प्रचंड वाफ तापमान कमी होताच पाऊस बनून एकाच ठिकाणी कोसळते आणि काही ठिकाणी अतीवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे मांसुनचा पाउस आता असाच लपाछपी खेळत राहणार हे कटूसत्य प्रत्येकाने समजुन घ्यावं. जागतीक तापमान वाढीचे परिणाम सुरु झाले आहेत. जीतका थोडा थोडका पाऊस पडेल तो जास्तीत जास्त जमीनीत कसा मुरेल या कडे लक्ष देण्याची सरकार आणि जनता दोघांचीही जबाबदारी आहे. रोजगार हमी योजने सारख्या योजना व्यवस्थित राबवून, वैयक्तिक स्तरावर घराच्या छतावरचे पाणी जमीनीत मुरवून कमी पावसाला सुद्धा जपुन ठेवता येईल. जागतीक तपमान वाढीच्या काळ्यासावल्यांचं युग आता सुरु होत आहे. या युगात आपल्या सवई बदलवनं आणि जागतीक संकटाचा स्थानिक परिणाम जास्तीत जास्त कुशलतेने स्थानिक ठिकाणीच दूर करणं इतकच आपल्या हातात आहे.
डा. नीलेश हेडा
कारंजा (लाड), जील्हा वाशीम
( ०९७६५२७०६६६
(लेखक रुफोर्ड मारीस फाउंडेशन, लंडनचे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत)