Friday, April 23, 2010

मांसाहारी जीव जंगलाचे व शेतीचे रक्षण करतात

मांसाहारी जीव जंगलाचे व शेतीचे रक्षण करतात !

डॉ. नीलेश हेडा,

संवर्धन,

कारंजा (लाड)

( ९७६५२७०६६६

अमरावती जिल्ह्यातल्या पिंपळखुटा नावाच्या गावातला एक युवा शेतकरी सकाळी शेतात जातो आणि शेतीची रानडुकरांनी केलेली नासधुस बघून त्याला धक्का बसतो आणि घरी येऊन विष प्राशन करुन आत्महत्या करतो. कारंजा लाड जवळ खेर्डा नावाचे गाव. खेर्डा येथील एका मजूराला धडक मारुन निलगाईने जागीच ठार केले. ह्या आणि अशा घटना दिवसेंदीवस वाढत चालल्या आहेत. वन्य जीव आणि माणूस ह्याच्यातल्या परस्पर संघर्षाची तिव्रता वाढत चालल्याची दिसते. ह्या घटनांचा परिसर विज्ञानाच्या अंगाने मुलभूत विचार करण्याची गरज आहे. राणडूकरांची, हरणांची, निलगाईंची संख्या का वाढली याचा निसर्ग नियमांनी विचार करुन मूलभूत उपाय करण्याची गरज आहे.

१९६९ मध्ये राबर्ट पायने (Robert Paine) नावाच्या शास्त्रज्ञाने परिसर विज्ञानातली ‘स्टोन स्पेसिज’ (Keystone Species) नावाची नावाजलेली संकल्पना दिली होती. आष्ट्रॅलिया मधील ग्रेट बॅरीयर रिफ मध्ये केलेल्या संशोधनाच्या आधारावर त्याने हे काम केले. ग्रेट बॅरीयर रिफ हा खुप चांगली जैवविविधता असलेला समूद्राच्या खारफूटी जंगलाचा भाग. ह्या परिसरात तारा मासा (Pacific north west startfish) आणि मोठ्या आकाराची गोगलगाय (Large snail) हे दोन महत्त्वाचे मांसाहारी जीव. पायनेच्यानुसार जर ह्या दोन्ही जीवांना त्यांच्या अधिवासातुन काढून टाकलं तर हे दोन जीव ज्या भक्षांवर अवलंबून असतात त्यांच्या भक्षांच प्रमाण सुरुवातीला अनेक पटींनी वाढते आणि पर्यायाने संपूर्ण परिसंस्थेचा नाश होतो. म्हणजेच काय तर ह्या संकल्पनेनुसार परिसंस्थेत काही जीवांवर संपूर्ण परिसंस्थेचे आरोग्य अवलंबून असते. जर अशा जीवांची संख्या घटली तर पर्यायाने संपूर्ण परिसंस्थेचाच तोल जातो. अशा जिवांना कीस्टोन स्पेसीज म्हणतात. कोने एकेकाळी विदर्भात भरपूर प्रमाणात आढळणारे चित्ते, वाघ, बिबटे, लांडगे, कोल्हे हे सर्व मांसाहारी जीव आपल्या साठी कीस्टोन स्पेसीज होते. एका अर्थाने शाकाहारी जीवांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेऊन ते जंगलाचे आणि शेतीचे रक्षणच करायचे.

असे मांसाहारी जीव जरी संखेने कमी असले तरी त्यांच्यावर निसर्गाने अनेक जबाबदा-या दिल्या होत्या. ते जंगलांचे, वनस्पतींचे खरे रक्षक होते. कारण वनस्पतींना नष्ट करणा-या शाकाहारी प्राण्यांच्या संखेवर ते नियंत्रण ठेवायचे. त्यांच्या मुळे शेती सुरक्षीत होती. पण अशा मांसाहारी प्राण्यांचे अधिवास आपण नष्ट केल्याने त्यांची संख्या कमालीची घटली. चित्ते व वाघ तर आपल्या विभागातून संपूर्णपणे नामशेष झाले. ह्या जीवांचे विषिष्ट असे अधिवास असतात. त्यांच्या अधिवासात जर बदल झाले तर आपोआपच त्यांच्या संखेवर प्रतिकुल असा परिणाम होतो. हे मांसभक्षी जीव कमालीचे कमी झाल्याने आपल्या विभागातील रान डुक्कर, निल गाय, हरीण कमालीचे वाढले ज्याचा परिणाम आपोआपच शेती वर व्हायला लागला. एकी कडे शाकाहारी जीवांना पोसणारी जंगले कमी होत चालली आणि दुसरी कडे शेती फोफावत चालली परिणामत: आपली भूक भागवण्यासाठी ह्या शाकाहारी जीवांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला यात नवल नसावे. आज आपल्या कडे शेतीच्या नाशासाठी जंगली जनावरांचा त्रास हा महत्त्वाचा त्रास असल्याचे लोक सांगतात. त्याच वेळी ह्या शाकाहारी जिवांचा लोकांना शारीरीक त्रास सुद्धा भरपूर व्हायला लागला. रान डुकरांनी किंवा निलगायने जखमी केलेल्या, जीवे मारल्याच्या अनेक घटना निरंतर वर्तमान पत्रातुन येत असतात. या घटणांचा एकच अर्थ आहे की मानसाने वन्य जीवांच्या अधिवासात अतीक्रमन केले. माणूस असो की वन्य प्राणी आपल्या घरात झालेले अतीक्रमण सहन करत नाही व आक्रमक होतो हे साधेसे तत्व ह्या मागे आहे.

अशा परिस्थितीत रान डुकरांच्या किंवा हरणांच्या शिकारीला नियंत्रीत परवाणगी देणे हे एक समाधान असु शकते पण संपूर्ण उपाय निश्चितच नाही. संपूर्ण उपायात मांसभक्षी जीवांचे अधिवास पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याशीवाय दुसरा मार्ग नाही. असे अधिवास ज्यात प्रामुख्याने जंगलांचा समावेश होतो पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याची तातडीने गरज आहे. हे काम लोक सहभागाने होऊ शकते. जर हे करण्यात आपण कमी पडलो तर शेतीचा व उरलेल्या जंगलांचा असाच नाश होत राहिल. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने विचार केल्यास आसपास जंगलाचे प्रमाण व्यवस्थित प्रमाणात असणे हे केवळ शाकाहारी जिवांच्या दृष्टीनेच चांगले नाही तर इतर अनेक बाबतीत हे महत्त्वाचे आहे.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि रुफोर्ड मॉरिस फाउंडेशन, लंडन चे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत.)

No comments:

Post a Comment