Friday, January 17, 2014

डोळे बंद करुन कसे चालेल ?

सिंचन आणि तेही विदर्भातले हा राजकारण्यांचा जिव्हाळ्याचा मुद्दा; पण गेल्या अनेक वर्षांची आकडेवारी सांगते की सिंचनाचा प्रश्न जसा आहे तसाच आहे. सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जी मोठ्या धरणांची कास धरल्या गेली त्याने केवळ देशाचं आणि समाजाचं नुकसानच झालं आहे हे अजुनही आम्हाला समजत नाही हे आपलं दुर्दैव. सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी लहान लहान पातळ्यांवरच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने आज आपण जिथे आधी होतो तिथेच आहोत. डोळे खाडकन उघडून टाकणारं एक तथ्य आपण बघुया, १९९१-९२ ते २००३-०४ दरम्यान भारत सरकारने सिंचनासाठी मोठ्या धरणांवर सुमारे १००,००० कोटी रुपये (एक लाख कोटी!) खर्च केले आहेत पण आश्चर्याची बाब अशी की ह्या बारा वर्षांच्या कालावधीत कालव्याद्वारे होणारे सिंचन एका एकरानेही वाढले नाही! उलट ते कमी झाले. गस्ट १९८६ मध्ये विविध राज्यांच्या सिंचन मंत्र्यांसमोर केलेल्या आपल्या भाषणात स्व. राजीव गांधीनी म्हटले होते की, “शायद, हम विश्वास से कह सकते है कि इन परियोजनाओं से लोगों को कोई फायदा नहीं हुआ है. सोलह सालों से हमने धन गंवाया है. सिचांई नहीं, पानी नहीं, पैदावार में कोई बढ़ोतरी नही, लोगों के दैनिक जीवन में कोई मदद नही, इस तरह उन्हें कुछ भी हासिल नही हुआ है.”
गेल्या बारा वर्षात केलेला खर्च जर जल संधारणाच्या स्थानिक लोक आधारित, विकेंद्रित स्वरुपाच्या कामांवर केला असता, गावागावातील मृत होत चाललेले छोटेमोठे पारंपरिक तलाव संरक्षित केले असते आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याला प्राथमिकता दिली असती तर भारताचं चित्र काही वेगळच असतं.  
आज आपण प्रामुख्याने भूगर्भातील पाण्यावर आपल्या सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि कारखान्यांना लागणा-या पाण्यासाठी अवलंबून आहोत. बोअरवेलद्वारे पाण्याचा अविरत उपसा भारतभर सुरु आहे. संपूर्ण भारतात १९ दशलक्ष बोअरवेल आहेत (जुलै २००९ ची आकडेवारी). अशा परिस्थितीत जास्त तार्किक आणि परिणामकारक काम कोणतं असू शकते? तर जमिनीतील पाण्याची पातळी पुन्हा भरुन काढण्यासाठी जास्तीत जास्त जल पुनर्भरणाची कामे, जल संधारणाची कामे करावित. रोजगार हमी योजनेची प्रभावी अमलबजावणी व छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे सारख्या कामांनी हे शक्य आहे. परंतु दुर्दैवाने संपूर्ण भारताचा विचार केला तर जल पुनर्भरनाचे कोणतेही प्रभावी धोरण सरकारने तयार केले नाही. गेल्या १३ वर्षांपासून भारत सरकारचे केंद्रिय भुजल प्राधीकरण (Central Ground Water Authority) अस्तित्वात आहे पण सरकारी गैरजबाबदार पद्धतीने चालणा-या ह्या विभागाने आजवर भुजलाच्या बाबत कोणतेही प्रभावी धोरण दिलेले नाही.  
खरं म्हणजे मागील काही काळांपासून मांसूनचे बिघडलेले चक्र हा जागतिक तापमान वाढीचा दृष्य परिणाम आहे हे आता सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांआधी जगातील अनेक शास्त्रज्ञांनी फार मोलाचं संशोधन करुन पृथ्वीचे तापमान वाढण्याचा व त्याच्या मानवजातीवरच्या परिणामाचा आलेख जगासमोर मांडला. आसपासच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात सोडलेल्या कार्बन डाय क्साईड व मिथेन ह्या वायूमूळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे. ह्या तापमान वाढीमूळे लाखो वर्षात स्थापित झालेल्या निसर्ग चक्रात फार मोठा बदल झाला आहे.
हवेत वाढलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचा आणि तापमान वाढीचा काय संबंध असावा? सूर्यापासून प्रकाश किरणे पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीला उष्णता प्रदान करतात. परंतु आलेली सारीचं किरण पृथ्वीवर येत नाहीत तर त्याचा बराचसा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन परावर्तित होऊन परत अवकाशात जातो व पृथ्वीचे सरासरी तापमान व्यवस्थित राखल्या जाते. परंतु कार्बन कार्बन डाय क्साईड पृथ्वीच्या वातावरणात पसरुन राहिल्याने परत जाणा-या प्रकाश किरणांना तो शोषून घेतो व उष्ण किरणांच्या स्वरुपात परत पृथ्वीकडे देतो, परिणामत: पृथ्वीचे तापमान वाढते.
अभ्यासक मानतात की, ह्या तापमान वाढीने मान्सून, जो आपला जीवनाधार आहे, त्याचे चक्र बिघडेल. अतिशय जास्त पाऊस किंवा अतिशय कमी पाऊस अशी परिस्थिती निर्माण होईल. ज्याची सुरुवात झाल्याचे दिसते आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपीकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) नावाच्या संशोधन संस्थेने सायंसनावाच्या संशोधन पत्रिकेत २००६ मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रानुसार अतिवृष्टीचे प्रमाण गेल्या ५० वर्षात १० टक्क्यांनी वाढले आहे. बॅंगलोर येथील द सेंटर फॉर मॅथेमॅटीकल मॉडलींग अॅंड कांप्युटर सीमुलेशननावाच्या संशोधन संस्थेने मार्च २००७ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात दर्शवले की भारतातल्या शुष्क भागात उदा. दक्षिण गुजरात, उत्तर मध्यप्रदेश आणि दक्षिण ओरीसा, अतिवृष्टीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. हे सारे बदल पृथ्वीचे तापमान वाढल्याने होत आहे. पृथ्वीच्या तापमान वाढीचा आणि मांसूनच्या चक्रात बदल होण्याचा काय संबंध आहे? तिरुपती येथील नॅशनल एटमॉसफेरीक रिसर्च लेबारेटरीच्या शास्त्रज्ञांनी ह्या घटनेचे गूढ उकलण्याच्या दृष्टीने बरीच मजल मारलेली दिसते. ’जिओफीजीकल रिसर्च लेटरनावाच्या जरनल मध्ये २० सप्टेबर २००८ ला प्रकाशित झालेल्या संशोधन पत्रात ते लिहितात की, २६ जुलै २००५ ला एका दिवसात मुंबई शहरात झालेला ९४४ मि.मी. इतका न भुतो न भविष्यती असा पाऊस ह्या घटनेची सुरुवात होती (पश्चिम विदर्भात वर्षभरातही इतका पाऊस पडत नाही). मांसूनचे चक्र हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. गेल्या १०४ वर्षांच्या आकडेवारी नुसार, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढत गेल्याचे दिसते आणि त्याच वेळी अतिवृष्टीचे प्रमाणही. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत चालल्याने समुद्रातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे त्यामूळे तयार झालेली प्रचंड वाफ तापमान कमी होताच पाऊस बनून एकाच ठिकाणी कोसळते आणि काही ठिकाणी अतीवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. गेल्या varshi परतीच्या मांसूनने दक्षिण भारतात केलेला कहर याचे अगदीच जवळचे उदाहरण आहे.
त्यामूळे मांसूनचा पाऊस आता असाच लपाछपी खेळत राहणार हे कटूसत्य प्रत्येकाने समजुन घेतले पाहिजे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम सुरु झाले आहेत. जितका थोडा थोडका पाऊस पडेल तो जास्तीत जास्त जमिनीत कसा मुरेल याकडे लक्ष देण्याची सरकार आणि जनता दोघांचीही जबाबदारी आहे. रोजगार हमी योजने सारख्या योजना व्यवस्थित राबवून, वैयक्तिक स्तरावर घराच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरवून कमी पावसाला सुद्धा जपून ठेवता येईल. जागतिक तापमान वाढीच्या काळ्यासावल्यांचं यूग आता सुरु होत आहे. या यूगात आपल्या सवयी बदलवनं आणि जागतिक संकटाचा स्थानिक परिणाम जास्तीत जास्त कुशलतेने स्थानिक ठिकाणीच दूर करणं इतकच आपल्या हातात आहे.
अशा संक्रमण काळात निकटगामी आणि दुरागामी रणनीती अंतर्गत अनुरुप व्यवस्थापनाच्या (Adaptive management) तत्वाला अनुसरुन आपण काय करु शकतो ह्याचा समाजातल्या सर्व स्तराने गंभीर विचार करण्याची गरज आहे. जी विकासाची संकल्पना सरकार, सर्व सामान्य जनता आणि समाजासाठी झटणा-या स्वयंसेवी संघटनेने अनेक वर्षांपासून जोपासलेली आहे त्याचा बारकाईने विचार करणे व त्यातील फोलपणा व्यापक समाजात पसरविने जरुरीचे आहे. पर्यावरणाच्या प्रश्नांच्या बाबतीत जनमानसात जन जागृती करण्यासाठी आग्रही व आक्रमक पद्धत व भूमिका अवलंबण्याची गरज आहे. जल संरक्षण, छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे, जल संधारण हा आता ऐच्छिक मुद्दा उरला नाही ही आता अपरिहार्यता आणि आग्रहाची बाब झाली आहे.



No comments:

Post a Comment