Saturday, March 14, 2015

माझी चित्तरकथा

डा. निलेश हेडा
दोन गोष्टी आपल्याला आयुष्यात कधी म्हणजे कधीच जमल्या नाहीत, एक म्हणजे नृत्यकला आणि दुसरं म्हणजे चित्रकला. ह्या दोन महान कलांच्या बाबतीत घोर न्युनगंड घेऊनच या नश्वर जगात आम्ही आलो आहोत. त्यामूळे लग्नाच्या मिरवणूकीत नाचणारे जीव बघितले की कितीही घाईत आम्ही असलो तरी दोन क्षण का होईना थबकून डोळे भरुन पाहतो जरुर. एक तर आमची शारीरिक उंची ही सहा फुटाच्याही पार गेलेली असल्याने नाचतांना आम्ही कसे दिसू याचा साधासा विचारही आम्हाला प्रचंड दडपण आणतो. “नाचता येईना अंगण वाकडे” अशा सारख्या म्हणींचा आमच्यावर सुतरामही प्रभाव पडत नाही कारण अंगण सरळ असो की वाकडे आमच्यासाठी सारखेच!
चित्रकलेच्या बाबतीत भारताचा झेंडा काय तो (तो ही फडकत नसलेला!) आम्ही निष्णातपणे काढू शकतो, त्यातही मधलं अशोक चक्र काढण्यासाठी एक रुपयाचा कलदार लागतोच! तरी सुद्धा ह्या वेळी एका वर्कशाप मध्ये जेवनानंतर, प्रचंड बोर होत असतांना, एक अबस्ट्रॅक्ट की काय तरी प्रकारात मोडणारं चित्र काढून आम्ही हौस भागऊनच घेतली. (वर्कशाप मध्ये बोर व्हायचं कारण सुद्धा होतं म्हणा. म्हणे, "स्केलिंगअप का अर्थ है होरिझंटल और व्हर्टीकल दिशामें आबजेक्टिव का बढना”. किंवा म्हणे, “समाज मनात जोवर आपण लॉगइन करत नाही तोवर सामाजिक परिवर्तनाला दिशा मिळत नाही”. बापरे! मानसासारखं बोला की रे बाबांनो!).
तर या वर्कशाप मध्ये आम्ही रेखाटलेलं खालील चित्र हे जीवनातल्या विविधतेला अन कॉम्प्लेक्सिटीला लांबी, रुंदी अन खोलीचं भरजरी परिमाण प्राप्त करुन देणारं आधूनिक चित्रकलेचं दालन अनेक अंगानी समृद्ध करणारा प्रयत्न आहे. ह्या आमच्या चित्राने चित्रकलेच्या फ्रांज गोथे पासून तर हुसैन पर्यंतच्या प्रयत्नांना एक आडवा उभा अन तिरपा छेद दिला आहे! (काय पण मस्त मार्केटींग व्वा व्वा! एनजीओ क्षेत्रात जर काही काळ आम्ही अधिक टिकलो (तशी शक्यता कमीच वाटते म्हणा!) तर टकल्या मानसाला सुद्धा कंगवा विकण्याची कला अवगत करुन घेऊ यात शंका नाही!).
खालील चित्र हे कोणत्याही फॉर्म मध्ये (उदा. इलेक्ट्रानिक, लिक्विड, सॉलिड इत्यादी) आपण वापरु शकता. चित्रकाराच्या नावाचा उल्लेख केला नाही तरी चालेल. शेवटी आम्ही कॉपी राईट वाले नसून कॉपी लेफ्ट वाले “लेफ्टिस्ट” आहोत!)No comments:

Post a Comment