Sunday, June 7, 2015

ग़ढा मंडला: प्रेमात पाडणारं ठिकाण

डॉ. निलेश हेडा
वेरियर एल्विन ह्या जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञाच्या आत्मकथेत वारंवार मंडल्याचा उल्लेख यायचा. गोंड आदिवासींसोबत काम करायला लागल्यावर गोंडांच्या साम्राज्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. गोंडांच्या एकुणच साम्राज्य विस्ताराचा विचार करतांना वारंवार मंडला हे ठिकाण मनात घिरट्या घालायचं. योगायोगानेच का होईना ह्या शहराच्या, तिथल्या व्यक्तिंच्या प्रेमात पडलो.  
मध्यप्रदेशच्या इशान्येला, मध्यभारतातल्या निबिड अशा पाणगळीच्या जंगलाने व्यापलेला, कधीतरी गोंड राजांच्या अल्ट्रामॉडर्न राज्यकारभाराने अन पराक्रमाने शहारलेल्या अन नर्मदेच्या विशाल पात्राने सिंचित झालेला मंडला जिल्हा आणि मंडला शहर हे जिल्ह्याच ठिकाण. २००५ मध्ये मी पहिल्यांदा ह्या शहरात गेलो अन नंतर अनेक वेळा जातच राहिलो. नागमोड्या नर्मदेच्या कुशीत वसलेलं, राणी दुर्गावतीच्या शौर्यानं अन गोंडी साम्राज्याच्या स्वर्णिम इतिहासाची साक्ष पटवणारं हे शांतीप्रिय ठिकाण. नागपूरवरुन सिवणी मार्गे मंडल्याला जातांना आसपासचा निसर्ग झपाट्याने बदलत जातो. नागपूरच्या आसपासचा उजाड प्रदेश पाणगळीच्या जंगलाने अन उंच बांधाच्या भातशेतीने हळूहळू परिवर्तित व्हायला लागला की समजावं आता आपण दंडकारण्यात प्रवेश केला आहे. गाडी पेंच व्याध्र प्रकल्पामधून जायला लागली की मला मोगलीची आठवण येते. रुडयार्ड किपलींगच्या जंगल बूकपुस्तकामध्ये वर्णीत हा प्रदेश. सिवणी हे जिल्ह्याचं ठिकाण, जागोजागी इंग्रज साम्राज्याच्या खुणारेषा अजूनही अंगावर बाळगणार हे ठिकाण. सिवणीवरुन एक राष्ट्रीय महामार्ग जबलपुरकडे निघतो अन दुसरा मंडल्याकडे. तसं सिवणी मंडला हे अंतर (११५ कि.मी.) फार नाही पण वाईट रस्ते आणि दळणवळणाच्या सोइंच्या अभावाने फार अखरतो.
मंडला शहर नर्मदा नदीच्या विशाल पात्राने दोन भागात विभागलं गेल आहे. एकदा का दोन्हीच्या मध्ये असलेल्या विशाल पुलावर आपली गाडी आली की प्रवासातला सारा तान नर्मेदला बघून निघून जातो. एखाद्या प्राचीन, ऐतिहासिक नगरीत तर आपण प्रवेश करत नाही आहोत ना आणि लगेच दोन घोडेस्वार येऊन गढा मंडला में राणी दुर्गावती की और से आपका स्वागत है”, असं तर म्हणनार नाही ना अशी शंका येते.
मंडला शहर हे नर्मदेचं शहर आहे. शहराचे सारेच संदर्भ, इतिहास, संस्कृती, सनवार, नवस, उत्सव, प्रत्येक ऋतू, प्रेयसी प्रियकराच्या आणाभाका आणि जगण्याचा शिण आलेल्या जीवांचं अंतिमस्थान ह्या नर्मदेशी जोडलेले. शहरासाठी नर्मदा फक्त नर्मदा नाही, “मां नर्मदाआहे. शहराचा प्रत्येक भाग हा ह्या नर्मदेशी नेहमीच संपर्कात असल्यासारखा असतो. सहस्त्रधारा, हाथी घाट, जेल घाट, उर्दू घाट, वैद्य घाट, महन्तवाडा घाट,  हे सारे घाट सदैव सुमत्स्य, कच्छ, नक्र, चक्र, चक्रवाक शर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदेच्या जयघोषाने आंदोलीत होत असतात. वर्ध्याच्या पवणार आश्रमात गंगेची सुंदर मूर्ती आहे तशीच एक रेखीव, मगरेच्या वाहनावर बसलेल्या नर्मदेची मूर्ती मंडला जवळच्या पुरवा गावात आहे.
मी नदी प्रेमी, माश्यांचा अभ्यासक त्यामुळे मंडल्याला पोहोचलो की तडक घाटावर जातो. ढिमर, मल्लाह, केवट हे पारंपरिक मासेमार नर्मदेच्या विस्तिर्ण पात्रात होडीवर मासेमारी करतांना बघणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. नर्मदेचा सहस्त्रधारा हा घाट नैसर्गिक सौंदर्याचा अमीट असा आविष्कार आहे. नर्मदेचा हट्टी प्रवाह असंख्य पाषाणांच्या सुळक्यावरुन कापला जाऊन नर्मदा अनेक धारांमध्ये विभागली जाते म्हणून सहस्त्रधारा. ह्याच घाटावर वसलेल्या वृद्धाश्रमातील वृद्धांना नर्मदेचा सहारा. ह्याच नर्मदेच्या काठावर दर १२ वर्षांनी भरणा-या कुंभ मेळ्यात सामील व्हायला अक्षरश: लाखो लोक जमतात.
मंडल्याला एक स्वर्णिम इतिहास आहे मात्र हा इतिहास मेनस्ट्रिमइतिहासाने दाबून टाकल्यासारखा वाटतो. अगदी करोडो वर्षांच्या इतिहासापासून तर अगदी आत्ताआत्ताच्या इतिहासापर्यंतची मंडला परिसराला देणगी आहे. मंडल्यापासून ४० कि.मी. अंतरावर भारतातले पहिले जीवाश्म राष्ट्रिय उद्यान आहे. ६.५ कोटी वर्षांआधीपासूनचे वनस्पती प्राण्यांचे अवशेष इथे सहजतेने सापडतात. ३० हेक्टरच्या क्षेत्रफळात पसरेले हे राष्ट्रीय उद्यान पृथ्वीच्या जिआलाजीकल इतिहासाचे दृष्य उदाहरण आहे. केळीच्या फळात पूर्वी बिया होत्या, निलगीरी हा वृक्ष भारतीय आहे वैगेरे नवीन गोष्टींचा खुलासा ह्याच जीवाश्म उद्यानामुळे झाला. ह्या उद्यानात फेरफटका मारतांना करोडो वर्षांच्या जीवनाचे अवशेष ठाई ठाई विखुरलेले दिसतात.
महाभारत काळापासून हा प्रदेश महाप्रतापी नाग वंशीयांचा प्रदेश म्हणून सुप्रसिद्ध होता. वारंवार महाभारतात आर्यांच्या व नागांच्या उडालेल्या खटक्यांची कथा येत राहते. मंडला हे नागांचं महत्त्वाचं ठाण असावं. मंडला पासून २८ कि.मी. वर नर्मदा आणि तीची एक छोटी उपनदी बुढणेरच्या संगमावर देवगांव नावाचं गाव आहे. शिध्रकोपी जमदग्नी ऋषींच्या आश्रमाचं ते गाव. प्राचीन ग्रंथात मंडला शहराचे नाव महिष्मती नगरी असे होते. महिष्मतीचा राजा सहस्त्रबाहू ह्याने परशुरामच्या वडिलांना म्हणजे जमदग्नीला मारुन त्याच्या गाई पळवल्या त्यावरुन परशुरामाने सहस्त्रबाहूचा समग्र वंश उच्छेद करुन प्रतिषोध घेतला. देवगाव मध्ये एका गुफेमधल्या मंदीरात आकर्षक शिवलिंग आहे. त्याच ठिकाणावरुन पुर्वेला १३ किलो मिटरवर वसलेल्या एका पहाडावर परशुरामाचा आश्रम आहे. तिथेच सिंगारपूर हे ठिकाण; राजा दशरथाच्या पुत्र कामेष्ठी यज्ञानंतर शृंग ऋषी या ठिकाणी येऊन राहिले अशी आख्यायिका आहे. कबिराने जेथे तपस्या केली ते ठिकाण, कबीर चबुतरा, सुद्धा मंडल्यापासून अगदी जवळ आहे. याच ठिकाणी सिख्ख गुरु नानक आणि कबिरची भेट झाली होती. मंडला शहरात असलेल्या कबीर पंथीय लोकांसाठी हे ठिकान म्हणजे काशी आहे. नर्मदेचे उगमस्थान असलेले आध्यात्मिक व नैसर्गिक सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण अमरकंटक मंडलापासून १०० कि.मी. वर वसलेले आहे.   
मंडला हे गोंड साम्राज्याचं महत्त्वाचं ठिकाण. सोळाव्या शतकाताच्या सुरुवातीपासून गोंड राजे संग्रामसाही यांनी आपल्या राज्याचा विस्तार मंडलापासून ५२ गढांपर्यंत केला. १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच त्याच्या राज्याचा विस्तार भोपाळपासून तर छोटा नागपूर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून तर चांदा (चंद्रपूर) पर्यंत केला. दुर्गावती ही संग्रामसाहीची पत्नी. संग्रामसाहीच्या तरुणपणातच झालेल्या मृत्यूनंतर राणी दुर्गावती मंडलाच्या सिंहासनावर आरुढ झाली. विद्वत्ता, ऐश्वर्य, कला व संस्कृतीचा अत्युच्च संगम हिच्या काळात झाला असे म्हणतात. त्या काळी अकबराने राणी दुर्गावतीच्या राज्यकारभाराचा अभ्यास करण्यासाठी एक दुत मंडल्याला पाठवला होता. मंडल्यामध्ये नर्मदा आणि बंजर नदीच्या संगमावर वसलेला गोंडांचा ऐतिहासिक किल्ला गोंड साम्राज्याच्या उत्कर्ष आणि पतनाचा मूक साक्षीदार आहे. किल्ला तिन्ही बाजूने नर्मदेने वेढलेला असून चौथ्या बाजूने दोन मोठमोठे खंदक निर्माण केले आहेत. किल्याच्या आत राजराजेश्वरीचे मंदीर संग्रामसाहीने बनवले होते. तथापि राणी दुर्गावती नंतर गोंडांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि एका स्वर्णीम युगाचा अंत झाला. त्या स्वर्णयुगाचे भग्न अवशेषच फक्त शिल्लक आहेत.
नैसर्गिक दृष्टीने मंडल्यावर निसर्गाने बरीच कृपादृष्टी केलेली आहे. कान्हा हा जगप्रसिद्ध व्याध्र प्रकल्प मंडल्यापासून १०० कि.मी. अंतरावर आहे. संपूर्ण शहरात गर्द झाडी आहे, उद्यानं आहेत, पुतळे आहेत आणि जिल्ह्याचे ठिकाण असूनही फारसी धावपळ नाही. मंडल्याच्या रस्त्यावरुन अनेक युगं एकाच वेळी हातात हात घालून मार्गक्रमण करतांना वाटचाल करतांना दिसतात. आजूबाजूच्या गोंड टोल्यावरुन मंडल्याच्या बाजारात अनवाणी पायाने लाकडाच्या मोळ्या, कोळसे, बांबूच्या गवताच्या विविधांगी वस्तू, जंगलातली वनोपजं विकण्यासाठी आणनारी गोंड मंडळी मनाला एका वेगळ्याच प्रदेशात घेऊन जातात. अजूनही आपली समाज व्यवस्था ही जैवभार आधारित समाजव्यवस्थाच आहे हे मनाला पटते. विविधता ही मंडल्याच्या एकुणच जीवनाचा सुर आहे, बाजारात असंख्य प्रकारचे मासे, भाज्या, कंद, मातीची विविध आकाराची भांडी, विविध प्रकारचे गुण्यागोविंदाने नांदणारे लोक हे आदिवासी विभागाचं विशेष इथे बघायला मिळते. नर्मदेबद्दलची समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये असणारी आस्था, श्रद्धा निसर्गाला आपण कोणत्या दृष्टीकोनातून बघतो याची प्रचिती देते. देशाच्या अन्य भागांमध्ये जेव्हा नद्या मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या आहेत तेव्हा मंडल्याची नर्मदा अजूनही यौवनावस्थेतच वाटते.  
नागपूरकडे जाणारी बस नर्मदेच्या एक किलोमीटर लांब पुलावर पोहोचते आपोआप प्रवाशांचे हात जोडल्या जातात. खाली घाटावर,
सहस्त्र शिरसं विन्ध्यं नाना द्रुम लता वृतम,
नर्मदां च नदीं दुर्गां महोरगनिषेविताम
चे स्वर दरवळत राहतात.


No comments:

Post a Comment