Saturday, March 14, 2015


गेल्या तिन दशकांमध्ये व-हाडात नेमकं काय घडलं?
डॉ. निलेश हेडा
गेल्या तिस वर्षात व-हाडात नेमकं काय घडलं? तिस वर्षातले बदल अगदी संक्षेपात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे. व-हाड शेतक-यांच्या आत्महत्येकरीता कुप्रसिद्ध आहे. शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच परिस्थितीकी शास्त्रिय (Ecological) गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच एक कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न. माझा जन्म हा आसोला ह्या छोट्याश्या गावात झाला. गेल्या तिस वर्षात एखाद्या चित्रपटाप्रमाणे ग्रामिण परिदृष्य बदलतांना बघतोय. त्या चित्रपटाचा हा संक्षिप्त आढावा. या लेखाचा उद्देश्य कोणतेही समाधान सुचवणे नसून केवळ बदलाचा आढावा घेणे मात्र आहे.   
************************************************************************************************
दोन दशकांआधी व-हाडात सोयाबीन आलं. ज्वारी हळुहळू बाद होत गेली. ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला. कडब्याचा चारा नसल्याने गोधन कमी झालं. २०० बैलांचा पोळा ५० बैलांवर आला. अनेक गावांमधून चक्क पोळ्याचा सनच हद्दपार झाला. “खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायराणांचं महत्व कमी झालं. गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड” असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं. गायरानांवर अतिक्रमन झालं. सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला. सोयाबीनचा उल्लेख कोणत्याही स्थानिक पारंपरिक औषधी प्रिपरेशनमध्ये आढळत नाही. सोयाबीनशी कोणतेही सांस्कृतीक संदर्भ जुळलेले आढळुन येत नाहीत. पुर्वीच्या काळी घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं. एक आधार असायचा. बिकट परिस्थितीत लोकं ज्वारीच्या “कण्या” खाऊन जगली. ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला. सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या. त्यातच डि.ए.पी. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली. सेंद्रिय कर्ब (organic carbon) हा जमीनीतला अत्यंत महत्वाचा घटक. तो जर कमी होत जात असेल तर माती मृत होत जाते. व-हाडात अनेक ठिकाणी तो चक्क ०.२ टक्क्यांपर्यंत घसरला. एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे दुसरीकडे त्यात शेनखताची कमतरता यामुळे जमीनीची पाणी धारण करुन ठेवण्याची क्षमता आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली. जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून भूजल संपुष्टात यायला लागलं. (सोयाबीन सारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली. एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या. अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं धान्य कमी भावात ग्रामीन भागात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली. त्यातुन लाचारीचा जन्म झाला. लाचारीतुन आत्मसन्मान गेला. आत्मविश्वास गेला. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं. शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवकांना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला. गावागावात अमूक सेना तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले.  इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुन वाहायला लागला. डोळ्यादेखत ३०-३२ वर्षांची किती पोरं दारु पिऊन पटापट गेली? इलेक्शन आलं, छटाक भर आकाराच्या गावात घड्याळीवाले, कमळवाले, इंजनवाले, पंजावाल्यांच्या दुकानदा-या सुरु झाल्या. गाव विभागलं, दुभंगल. यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे सबसीडीसाठी चकरा मारणा-या लाचार शेतक-याची संख्या वाढायला लागली.
दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले; त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला. सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं. शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं. त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली. नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले. त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला. जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं. नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली. तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन व-हाडात आल्या. यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला.
गावातले सुतार, लोहार, कुंभार सगळे कुठे गेले? माझ्या वाशिम जिल्ह्यातल्या आसोला गावचा जयराम सुतार परफेक्ट सुतार होता. स्वभावाने मात्र फार गरम. जरासाक तिरसट. शेतात तिफनाची दाती तुटली तर अख्खा तिफन त्याच्याकडे घेऊन जायची गरज नव्हती. तुटलेली दाती नेली की गावातल्या कोणत्याही तिफनाचं माप घेऊन तासून परफेक्ट मापाची दाती बनऊन द्यायचा. शेतात गेलं की त्यानं तासून दिलेली दाती तंतोतंत बसलीच पाहिजे कारण गावातल्या सगळ्या तिफनाच्या दातीच्या छिद्राचं माप तो एकच ठेवायचा. सगळ्या गावाची सुतारकी त्याच्याकडे असल्याने दिवसभर "बिझी" राहुन सुद्धा आम्हा लहान मुलांसाठी खेळण्याच्या बैल बंड्या बनऊन द्यायचा. गावात पहिला ट्रॅक्टर अन लोखंडी नांगर आल्यावर मात्र तो जास्त काळ जगला नाही. आता आपलं गावाला फार काम नाही असं तर वाटलं नाही त्याला?
तसाच एक उद्धव सुद्धा होता. उद्धव परफेक्ट तिफन हानायचा. त्याची काकरं सरळ लाइनात यायची कंपासच्या स्केल ने जमीनीवर सरळ रेषा ओढावी तशी. दोन काकरातलं अंतर एक सारखं पॅरेलल नसलं की डव-याचा फेर देतांना डवरा निट चालत नाही. उद्धवच्या दोन्ही काकराच्या रेषा परफेक्टली पॅरलल असायच्या. गावाकडे गेलो की त्याला मी पायथॅगोरस नावाने हाक मारायचो. तिफनाच्या मागे सरतं चालतं. त्यातल्या नारवाट्यातुन बाया बियानं टाकतात. तिफन बरोबर चालवला नाही की बियानं जमीनीत विशिष्ठ खोलीवर पडत नाही. बरोबर उगवत नाही. सरताच्या मागे फसाट चालते. फसाट जमीनीच्या पोटात पडलेल्या बियानावर माती झाकते. माती व्यवस्थितच झाकल्या जायला हवी नाही तर पुन्हा बियाणं व्यवस्थित उगवत नाही. त्यामुळे तिफन व्यवस्थित चालत जाणे गरजेचे. म्हणूनच मृगाच्या धारा आल्या की उद्धव गावातला एक्सपर्ट बनायचा. त्याची अपाइंटमेंट घ्यावी लागायची. त्याच्या हातुन पेरणी झाली की सर्वजण निश्चिंत व्हायचे. कमी जास्त पाऊस झाला तरी बियानं हमखास उगवायचं. उद्धवचा मुलगा अहमदाबाद मध्ये बंगल्यांची रंगरंगोटी करायला गेला. बापासारख्याच भिंतीवर ब्रश ने सरळ रेषा काढायचा तो. दोन ब्रशच्या फटका-यांच्या रेषा परफेक्टली पॅरलल असायच्या. दर दिवाळीला तो उद्धवसाठी कपडे पाठवायचा. गेल्या वर्षी उद्धव गेला. त्यानंतर त्याचा पोरगा अहमदाबादवरुन कधीच परतला नाही!
भोई ही व-हाडातली मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करणारी जनजात. व-हाडाच्या शुष्क प्रदेशात वर्षातला संपूर्ण काळ मासेमारीवर अवलंबून राहणे शक्य नसते त्यामुळे ह्या जमातीने मासेमारी सोबत काही पुरक व्यवसाय सुरु केले होते. त्या व्यवसायांमध्ये पालखी वाहने, नावेच्या सहाय्याने लोकांना या काठावरुन त्या काठावर नेणे (रामाला नदी पार करविणारा केवट हा मासेमार जमातीतलाच!) आणि हरभ-यापासून फुटाने तयार करण्याचा समावेश होता. दळणवळणाच्या सोयींमुळे पालखीची प्रथा निकालात निघाली, नदीवरच्या पुलांमुळे नावा संपल्या. फास्ट फुडच्या प्रचारामुळे फुटाने कालबाह्य होत आहेत आणि अनेक कारणांमुळे मासे संपले. जुणे पारंपरिक व्यवसाय नष्ट होणे, नवीन व्यवसाय दृष्टीच्या टप्यात न येणे, छोटे समूह असल्याने राजकीय दबाव न निर्माण करु शकणे अशा अनेक दृष्टचक्रात हे व-हाडातले लोक अडकत गेले.
त्यातच मग सिंचन प्रकल्प आले. नेत्यांच्या, अभियंत्यांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या. 372 कोटी रुपयांच्या बजेटचं गोसे खुर्द धरण ३२ वर्षांच्या कालावधीत १८४९५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं यातचं विदर्भातल्या सिंचनाचं गौडबंगाल लक्षात यावं. असो, बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली. त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून ज्ञानाची पारंपरिक तिजोरी रिती व्हायला लागली. अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले. याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला. या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, “शेतमालाचे भाव वधारणे”. हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा. शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग बोंब ठोकणार. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही. उत्पादन खर्च आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले. परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला. यातुन मग सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली. शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या. आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले.
आता उरला महत्वाचा आधार तो म्हणजे भागवत सप्ताहांचा, मंदीरांचा, आधुनिक भटांच्या धार्मिक दुकानांचा. गावागावात ५०-५० हजाराचं बजेट ठेऊन आयोजीत केल्या जाणा-या भागवत सप्ताहांचं अक्षरश: पीक आलं. गणपती, दुर्गा देवी मंडळांची चलती आली. एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला. सरकारही शेतक-यांनी आत्महत्या करु नये म्हणून कोटी कोटी रुपयांचे बजेट असलेले, जगण्याची कला (आर्ट आफ लिविंग) शिकवणा-या बाबांना आयात करती झाली. बाबा आले अन गेले पण आत्महत्या होतच गेल्या. आत्महत्या होतच आहेत.

No comments:

Post a Comment