Friday, May 9, 2014

आमराई गेली कुठे?


आमराई गेली कुठे?
डॉ. निलेश हेडा

आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभून्नारिकेलान्तरम
प्राय: कणकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम
आस्तैधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रताम ।
शामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ।।

आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. फणसाच्या अंगावर काटा आला. काकडी दुभंगली. द्राक्षे संकोचाने खुजी झाली आणि जांभळे मत्सराने काळवंडली.
(सुभाषितरत्नभांडार. सहकारान्योक्तिं)
लहाणपणी उन्हाळ्याच्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच जायचा. कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसने, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे, डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मधे मधे आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबने हे आमचे आवडते उद्योग. आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.
कैऱ्या उतरवणी योग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका “उताऱ्याला” द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या “खुडी” घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे. झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या “झेल्यामधून” खाली सोडले जायचे. कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा. आंबे मोजण्याच्या पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा. विस फाड्यांमागे उताऱ्यांना एक फाडा मिळायचा. राखणदार जर असेल तर त्याला एकुण आंब्यांच्या चवथा हिस्सा मिळायचा. एकाच आमराईत शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या अशा अनेक स्थानीक नावांच्या आंब्याच्या प्रजाती गुण्यागोवींदाने नांदायच्या. प्रत्येकाचे गुणधर्म, चव, आकार, उपयोग वेगवेगळे. आमट्या फक्त लोणच्या साठी तर शहद्या रसाळीसाठी, नारळी कच्चा खावा तर शेप्या नावडता! उतरलेले आंबे बैलगाडीतुन घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा “माच” घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादली मध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माहीत असुनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, “इवलासा बाबू, गवतात दाबू”. सर्व जन ओरडायचे “आंबा”! दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवने आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधुन शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते? असा मोठा प्रश्न आम्हाला पडायचा. कोणी म्हणायचं साबन बनवण्यासाठी उपयोग होतो, कोणी म्हणायचं त्यापासुन तेल काढतात!
पाऊस पडण्याच्या आधी लोणच्यासाठीचा आंबा उतरवल्या जायचा. फ्रिज ची सोय नसल्याने पाऊस पडून गारवा निर्माण झाला की लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडायचा. घराघरातून मसाल्यांचा घमघमाट यायचा. प्रत्येक घरची लोणच्यांची चव वेगळी असायची. शाळेत आनण्याच्या डब्यांमध्ये अशी लोणच्यांची विविधता चाखण्यासारखी असायची. 
बऱ्याच वर्षानंतर गावाकडे जाणं झालं. आजोबा कधीचेच आमराई सोडून गेले होते. जीथे आधी आमराई होती तीथेच त्यांच्या अस्थी ठेऊन एक चबुतरा बनवला आहे. आता आमराई नव्हती. अरुणावतीचा डोह गाळाने भरला होता. आंबा नसल्याने कोकीळेचा आर्त स्वरही नव्हता. आजोबा जाणे, आमराई जाणे, नदीचा डोह जाणे, कोकीळेचा स्वर जाणे यात काही परस्परसंगती आहे काय हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत होता. एक दोन ओळींची झेन कथा आठवली: एका जंगलातून शेवटचा वाघ संपला आणि जंगलातून वाहणारी एक नदी कोरडी झाली………………एवढीच ती कथा. आजच्या आपल्या परिस्थितीकी शास्त्राच्या परिपेक्षात ही कथा खरी आहे. तीच आमराईलाही लागू पडते.
विषन्न मनाने आजोबाच्या समाधी जवळ बसलो. उण्यापुऱ्या २०-२५ वर्षांमध्ये तथाकथीक विकासाचा बराच मोठा टप्पा गाठल्या गेला होता. आमराई संपली होती. विदर्भातला शेतकरी जेव्हां कर्जामध्ये आकंठ बुडाला, किटकनाशकांच्या, रासायणीक खतांच्या अवाजवी खर्चाला भागवण्यासाठी सर्वप्रथम शेतातली, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणनारा निर्णय त्याने घेतला. मातीत आधीसारखी ओल टिकत नाही म्हणून सुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसुकच वाळली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली. बाजार प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. स्वस्तात मिळणारी, बाहेरुन येणारी, रसायनांनी पिकवलेली कलमी, बदाम आंब्यांनी गावराण आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसीकतेमुळे शेतकरी निरुत्साहीत झाला. आंब्याला जेव्हां बार नसतो तेव्हा भाव भरपूर, जेव्हां बार भरपूर तेव्हा भाव नाही अशा दृष्टचक्राने शेतकरी जीथे होता तीथेच राहिला. रस्त्याच्या कडेने एकेकाळी असणारी आंब्याची जुणीजाणती झाडं रस्त्याच्या रुंदीकरणात कापल्या गेली.
एकुणच काय तर जुनी मातीशी इमान असणारी माणसे माती आड गेल्याने, पर्यावरणाच अतोनात ह्रास झाल्याने आणि बाजाराच्या बदलेल्या स्वभावाने आमराई गेली.
काही दिवसांआधी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हराळ ह्या गावात होतो. गावातील नरवाडे नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हातातही मावनार नाही एवढा एक आंबा आनून दिला. अशी आंब्याची जात पुर्वी कधीही बघितली नव्हती. त्याचा असा गोडवा कधीच चाखला नव्हता. तश्या प्रकारचं ते गावात एकमेव झाड होतं. अशा आंब्याच्या जातीची दखल घेण्याची सुबूद्धी सरकारच्या कृषी विभागाला, कृषी विद्यापीठांना होऊ नये याचे आश्चर्य आहे. विदर्भातील विविध आंब्यांच्या जातींची साधी चेक लिस्ट, त्यांचा आढळ बनवले गेल्याचे मला माहित नाही. परवा एका गावाला तंटा मूक्तीचा दोन लक्ष रुपयांचा धनादेश मिळाला. आलेल्या पैशात मोठे प्रवेशद्वार निर्माण करायचं नियोजन सुरु झालं. माझा एक पर्यावरण प्रेमी मीत्र म्हणाला गावच्या इ क्लास जमीनीवर गावराण आंब्यांची आमराई उभारुया. दरवर्षी गावाला उत्पन्नही मिळेल आणि आमराईच्या पुनरनिर्मानाच्या दिशेने एक पाऊल सुद्धा टाकल्या जाईल. ज्या प्रमाणे नक्षत्र वन, स्मृती वनाच्या दिशेने आपली वाटचाल आहे तशीच वाटचाल आमराईच्या बाबतीतही व्हायला हवी. हराळ गावच्या दूर्मिळ आंब्याच्या जातींची कलम करुन त्याला संरक्षीत करता येईल. गरज आहे जुण्या पर्यावरणीय गोष्टी नष्ट होणार नाहीत, त्या जुण्या गोष्टींचं सांस्कृतीक, पर्यावरणीय महत्त्व आहे अशी मानसीकता बनवण्याची.

1 comment:

  1. मामाचे गांव, गांवची आमराई हरविली आहे

    ReplyDelete