आधूनिक करंज महात्म्य
डॉ. निलेश
हेडा
कारंजा
हे आटपाट नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांच्या ठिकाणापासून
६० ते ७० किलोमीटरच्या “सुरक्षीत” अंतरावर वसलेलं शहर आहे. कुठही उभं राहून ब्रम्हांडाकडे
बघीतलं तर ते जसं सारखचं दिसतं (संदर्भासाठी गरजूंनी स्टीफन हाकींग वैगेरेंची भारी
पुस्तक चाळावीत!), तसच कुठूनही बघा कारंजा नगरी सारखीच दिसते. उपरोक्त चारही शहरांशी
कारंजा नेहमीच "रोमांस" च्या मुड मध्ये असते पण "सिरीयस अफेअर"
कोणाही सोबत ठेवत नाही. आम्ही अमरावतीत शिक्षण घेतो, अकोल्यातुन औषधी घेतो, वाशिम मध्ये
फक्त कार्यालयीन कामासाठी जातो आणि यवतमाळशी आमचं नातं काय आहे या बाबतीत आम्ही नेहमीच
"कनफ्युजन" मध्ये असतो. शिवाजींनी आमचं शहर दोनदा लुटल्यामुळे आणि साठ उंटांवरची कस्तुरी गा-यात टाकूण कस्तुरीची
हवेली बांधल्यामुळे आम्ही नेहमीच एका वेगळ्याच तो-यात असतो. अहमदनगरची राजकूमारी चांद
बिवी आमच्या कारंजाचीच, त्यामुळे आम्ही नेहमी “तहजीब” मध्ये असतो. आमच्या नगराची स्थापना
करंज ऋषींनी केल्यामुळे, गुरु महाराजांचं जन्मस्थळ, जैनांची काशी, चंद्राचं भारतातलं
(जगातल हो! घ्या आपल्या बा च काय जाते!) पहिलं मंदीर कारंजात असल्याकारणाने आम्ही “ऑलरेडी” मोक्ष
प्राप्त करुनच या नश्वर जगात जन्माला येतो. कारंजा नगरीतल्या एकाच घरात मोदीवादी, राहुलवादी,
केजरीवाल प्रेमी, वादी, प्रतिवादी, अ-वादी गुण्यागोविंदाने नांदत असल्याने कोणताही
उमेदवार भरघोस मतांनी निवडुन येण्याची प्रथा आमच्याकडे नाही (त्याचा परिणाम नश्वर जगातील
रस्ते, पाण्याच्या सोई, कच-याची योग्य विल्हेवाट अशा मूलभूत सोई इत्यादी गोष्टींवर
होतो ही बाब अलाहीदा!). अशा ह्या छोट्याशा करंज महात्म्याच्या “झलक” ने वाचकांची कारंजा
नगरीला भेट देण्याची इच्छा जागृत झाली तर ह्या आलरेडी मोक्षप्राप्त लेखकाला मोक्षातही
बाल्कनीची सिट मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
बिबिसाब पु-यातील अहमदनगरची राजकन्या चांदबिबिची मजार |
ज्ञानेश्वर
महाराजांनी “नगरेची रचावी, जलाषये निर्मावी, महावने लावावी नानाविधे” ही ज्ञानेश्वरी
मधली ओवी कारंजा शहराला भेट देऊनच लिहली असावी असा आमचा प्रगाढ दावा आहे. तिन विषाल
जलाषयांच्या मध्ये वसलेलं कारंजा हे “टाऊन प्लानिंगचं” उत्तम उदाहरण आहे. करंज ऋषींना झालेला असाध्य आजार दूर
व्हावा म्हणून त्यांनी तप केले आणि त्यातुन ऋषी तलावाची निर्मिती झाली. या वर्षी ऋषी
तलावामध्ये पुन्हा कमळ फुलल्याने देशातही कमळ फुलेल असा राजकीय विष्लेशकांच्या निष्कर्षाने
कारंजाचे भारतीय राजकारणात महत्व अधोरेखीत होते. दुसरा तलाव चंद्र तलाव ह्याची कथा
मोठी इंट्रेस्टींग आहे. चंद्राने (तोच आपला आकाषातला बरं!) म्हणे त्याचे गुरु बृहस्पतीच्या
पत्नीशी व्यभीचार केला (मानवी स्वभाव पुरातन काळापासून असाच आहे!), परिणामत: बृहस्पतीने
चंद्राला शाप दिला. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रेश्वर महाराजांनी तप केले अन
चंद्र तलाव निर्माण झाला. तथापी सांप्रत काळात त्या तलावात शहरातलं सर्व सांडपाणी टाकूण
आम्ही कारंजेकर “स्थितप्रज्ञ” आहोत हे जगाला दाखऊन देत असतो. तिसरा तलाव, सारंग तलाव,
याला मात्र कोणताही ऐतिहासीक किंवा पौराणीक संदर्भ नाही. कारंजा शहर ही नद्यांच्या
उगमाची जननी असून इथून बेंबळा, कापसी, उमा आणि साखळी नामक नद्या उगम पावतात हे (आत्मस्तुतीचा
दोष स्विकारुन!) अस्मादिकांनीच कुठेतरी लिहुन ठेवल्याचा संदर्भ गरजूंनी अवश्य शोधून
काढावा. कारंजा शहराबद्दल सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे शहर दोन महासागरांना (अरबी
समूद्र अन बंगाल चा उपसागर) जोडणारं शहर आहे कारण तापी आणि गोदावरी खो-याच्या रिजवर
हे वसलेले आहे. म्हणजे असं बघा, लेखकाच्या घरावर पडणारं पावसाचं पाणी बेंबळा नदी मार्गे,
व्हाया वर्धा नदी गोदावरीतून बंगालच्या उपसागरात
जाते तर आमच्या घराच्या मागे ५०० मीटरवर (स्थानिकांना संदर्भ लागावा म्हणून रिलायंस
पेट्रोल पंप जवळ!) पडणारं पाणी हे उमा नदी व्हाया पुर्णा, तापी असा प्रवास करत अरबी
सागरात विलीन होते. ज्या वाचकांना आमच्या या विधानावर विश्वास नाही त्यांना आम्ही नकाशासह
पटऊन देऊ आणि चुक निघाल्यास गांधी चौक, जयस्तंभ चौक, इंदिरा गांधी चौक, आंबेडकर चौक
अशा कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी माफी मागण्यास तयार आहोत.
ऋषी तलावाचे विहंगम दृष्य |
कारंजा
हे पारंपरिक विहरींसाठी सुप्रसिद्ध शहर आहे. गणीकांची विहिर, चोरांची विहीर, सोण्याचे
भांडे देणारी विहीर (आमच्या कडे घरी काही मंगल किंवा अमंगल प्रसंग असला की एका चिठ्ठीवर
लागणा-या भांड्याची लिस्ट (ताट, वाट्या इत्यादी इत्यादी) लिहुन ती या विहरीत आम्ही
टाकायचो अन सकाळी जाऊन तरंगत असलेली सोण्याची भांडी घरी आणायचो. पण एका व्यक्तिने लोभापाई
भांडी परत न केल्याने ती सर्विस वर्तमान काळात बंद करण्यात आली आहे. जर कुणाला ट्राय
करायचं असेल तर तो त्याचा/तिचा वैयक्तिक प्रश्न!)
कारंजाचे
ख-या चिंतेचा, चिंतनाचा आणि अस्मितेचा एकच विषय आहे आणि तो म्हणजे कारंजाच्या मुघल
कालीन वेशी. ह्या वेशींच्या खालून जातांना आजही आम्हाला रणांगणात लढायला निघालेल्या
सैनिकांसारखं वाटतं. स्थानिक वर्तमान पत्रांना कधीही बातम्या कमी पडो, ठेवणीतली वेशींच्या
दुरावस्थेची बातमी काढून ती छापने हे वर्तमान पत्राच्या शोधापासून अविरतपणे सुरु आहे.
डायरेक्ट दिल्लीशि आमचे संबंध सांगणारी दिल्ली वेश, दारव्हा वेश, पोहा वेश, मंगरुळ
वेश ह्या चारही वेशी कारंजेकरांचा विक पाइंट आहे.
गुरुमंदीर प्रवेशद्वार (फोटो गुरुमंदीरच्या वेबसाइटवरुन साभार) |
लुटले
जाण्यात सुद्धा अभीमान बाळगारं कारंजा हे जगाच्या पाठीवर एकमेव शहर असावं. पुरंदरच्या
तहात ठरलं की शिवाजींनी आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घ्यावी. महाराजांच्या महाराष्ट्र
ते उत्तर प्रदेशच्या दौ-याचा खर्च (एक लाख रुपये त्यावेळी!) औरंगजेबाने द्यावा. पण
घडलं विपरीतच, चक्क महाराजांनाच आग्रात अटक केल्या गेली. पण सह्याद्री के वादळ को कोई
रोक सकता क्या? महाराज सुटले अन औरंगजेबाला आपल्या दौ-याच्या खर्चाची मागणी केली (मेरे
पैसे मेरे कु वापस देदे रे बाबा. तू तो खासच आदमी हय. मेरे कु आग्रा बुलाया, आरोपी
बनाया और अटक किया!). पण औरंगजेबाने ऐकले नाही. शेवटी वसूली म्हणून महाराजांनी मुघलांच्या
आधिपत्याखाली असणा-या कारंजा शहराची लूट केली. ४००० बैलांवर लादून संपत्ती कारंजातुन
नेली असे जुणे जानकार म्हणतात.
ज्या
प्रमाणे पुण्याला विध्येचे माहेरघर म्हणतात तसेच कारंजाला सुद्धा शिक्षणाचे माहेरघर
म्हणावे असा ठराव पुढच्या विदर्भ साहित्य संघाच्या अन्युअल जनरल मिटींगमध्ये मांडण्याचा
आमचा मानस आहे (आमच्या विभागातले सर्व सांस्कृतीक प्रश्न विदर्भ साहित्य संघ सोडवतो,
सर्व राजकीय प्रश्न नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडवते आणि या दोन्हींच्या पलिकडचे प्रश्न
घेऊन आम्ही सरळ सरळ शेगावला जात असतो). कारंजातील JC, JD सारख्याशाळांच्या एका गेटमधून
जाणारी चिल्लीपाल्ली काही वर्षानंतर दुस-या गेट मधून MBBS, MD, CA सारख्या हाय प्रोफाईल
डिग्र्या घेऊनच बाहेर पडतांना याची देही याची डोळे आम्ही पाहिले आहे. इथे पालक आपल्या
मुलांना JD, JC मध्ये अडमीशन मिळाल्याबरोब्बर वैश्नोदेवीला किंवा अजमेरच्या दर्ग्याला
नवस फेडण्यासाठी जातात. एका पालकानेतर आपल्या मुलाची अडमीशन JC मध्ये व्हावी म्हणून
चक्क घोर तप करुन खुद्द शंकरालाच प्रसन्न करुन घेतल्याचे सुद्धा आमच्या ऐकिवात आहे.
JD, JC मधले विद्यार्थी नेहमीच “उंच माझा झोका गं” सारख्या तत्सम मराठी सिरीयल मधल्या
बालकांसारखी वागतात, “अभ्यास करावयास बसावयास हवे” सारखी वाक्ये बोलतात, एक प्रश्न
विचारला तर दहा उत्तर देतात इत्यादी अफवा या महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या
पाल्यांचे पालक पसरवत असतात ही बाब अलाहीदा! मात्र कारंजातल्या काही मुलजी जेठा, विवेकानंद
हायस्कूल, महावीर ब्रम्हचार्याश्रम सारख्या शाळा मात्र नेहमीच सिंचनाचा अनुषेश न भरुन
निघालेल्या विदर्भासारख्या आम्हाला वाटतात. “जादा मस्ती किया तो आश्रम में दाल दुंगी”
ही लहानपणी आम्हाला मिळालेली धमकी आम्ही पुढच्या पीढीत पासआन करुन घरातला दंगा आटोक्यात
आनत असतो. KN कालेज
आणि विद्याभारती कालेज ही दोन महाविद्यालये कारंजाच्या शैक्षणीक इतिहासात “तुका झालासी
कळस” सारखी आहेत. दस्तूरखुद्द लेखक हे तब्बल ५ वर्ष विद्याभारतीचे विद्यार्थी राहिले
असल्याने त्यांना इथल्या शिक्षणाच्या क्वालिटी अन क्वांटीटीची जवळून माहिती आहे आणि
त्याबाबतीत आम्ही सद्यातरी “नो कामेंट प्लिज” च्या राजनैतिक पवित्र्यात आहोत. पण प्राद्यापक
मंडळी खुप प्रेमळ होती, हे आवर्जून नमूद करुन प्रेम आणि ज्ञान ही विभीन्न टोकं आहेत
हे मंडूक उपनिषदामधलं वाक्य आम्हाला आठवते आहे. असो. KN कालेज बद्दलच्या आमच्या आठवणी
ह्या मात्र फारच हिरव्या आहेत. एकदा आम्हाला पर्यावरणावर भाषण द्यायला बोलवले आणि व्याख्यात्याच्या
प्रत्येक वाक्यागणीक विद्यार्थ्यांनी केलेला टाळ्यांचा गजरामूळे आमचे भाषण आम्हीच ऐकू
शकलो नाही हे पक्के आठवते. कारंजाच्या सांस्कृतीक विकासात जसा इथल्या शैक्षणीक संस्थांचा
वाटा आहे तितकाच दरवर्षी इमानेइतबारे होणा-या शरद व्याख्यानमालेचा सुद्धा आहे. पु.ल.
देशपांडेच्या शब्दात “भूईमुंगावरील किड नियंत्रणाच्या पद्धतींपासुन तर अमेरीकेची सिरीयाच्या
बाबतीतली भूमिका” इतक्या प्रचंड आवाक्याची व्याख्यानं आम्ही इथेच ऐकली आहे. कारंजात
सासरी गेलेल्या मुली ह्या दिवाळी दस-याला माहेरी न परतता शरद व्याख्यानमालेच्या काळात
परततात अन ज्ञानाचे कण वेचून आपआपल्या सासरी परत जातात हे आमच्या माघारी आपण पोरीबाळींना
विचारुन घेऊ शकता. कारंजाच्या सांस्कॄतीक अस्मितेचा एक महत्वाचा पैलू हा गुरु मंदीरात
उत्सव काळात होणा-या संगीताच्या मैफली सुद्धा आहेत. अजीत कडकडे पासून तर शौनिक अभीषेकी
पर्यंतच्या गायकांची अंगावर रोमांच आनणारी गायकी आम्ही इथेच अनूभवली आहे.
कारंजाच्या बाबतीत आम्ही अनेक गोष्टी वाचकांना सांगितल्या. त्या अनेक कारंजेकरांना ज्या अनुपातात आवडल्या तितक्याच गैर कारंजाकरांना सुद्धा आवडल्या. कारंजाचा आग्रह नाही हो, इतर कोठेही जन्मलो वाढलो असतो तर त्या गावाचे गुण गाईले असते हे नक्कीच. प्रत्येक गाव स्वत:त आदिम काळाचा इतिहास घेऊन धावत असतं. आपण कुठेही असलो तरी ते गाव जगण्याला आयुष्यभराचं इंधन पुरवत असतं.
कारंजाच्या बाबतीत आम्ही अनेक गोष्टी वाचकांना सांगितल्या. त्या अनेक कारंजेकरांना ज्या अनुपातात आवडल्या तितक्याच गैर कारंजाकरांना सुद्धा आवडल्या. कारंजाचा आग्रह नाही हो, इतर कोठेही जन्मलो वाढलो असतो तर त्या गावाचे गुण गाईले असते हे नक्कीच. प्रत्येक गाव स्वत:त आदिम काळाचा इतिहास घेऊन धावत असतं. आपण कुठेही असलो तरी ते गाव जगण्याला आयुष्यभराचं इंधन पुरवत असतं.
शकूंतला एक्सप्रेस |
परिवर्तन
हा जीवनाचा नियम आहे असं अनेकांनी लिहून ठेवलय, कारंजातही अनेक परिवर्तन घडले ज्यातील
९० टक्के परिवर्तनांनी तर आम्हाला वेदनाच झाल्या (कदाचीत आमच वय वाढत चाललं असाव!).
प्रत्येक स्टेशनावर थांबत थांबत जाणा-या दोन डब्यांच्या शकुंतलेला “एक्सप्रेस” म्हणनारे
आम्ही, जेव्हा पहिल्यांदा तीचं कोळशावर चालणारं इंजन बंद झालं तेव्हा शकुंतले इतकेच
हळहळलो होतो (देशात सगळी कडे कोळशाची इंजन बंद झाली होती पण आमच्या शकुंतलेला त्याची
माहिती सर्वात शेवटी झाली! आज मैसूरच्या रेल्वे म्युजीयम मध्ये शंकूतलेचं हृदय ठेवलेलं
आहे). शतकांपासून कारंजाला पाणी पाजणा-या विहरी जेव्हा हळुहळू बाद होत गेल्या, बुजत
गेल्या, ३ रुपयांचं तिकीट काढून ज्या प्रभात टाकीज अन शशीकांत टाकीज मध्ये आम्ही आमचं
तरुणाइचं पॅशन अनुभवलं त्या टाकीजा जेव्हा भंगारात विकल्या गेल्या, तेव्हांच आम्ही
ओळखलं आता नवीन जमाना येतो आहे, असा जमाना जिथे मित्रांच्या घरी जातांना अपाइंटमेंट
घ्यावी लागणार आहे, असा जमाना ज्यात विजय होटेलमध्ये चहा पिताना विचारच करावा लागेल
आपल्या तकलादू स्टेटसचा, असा जमाना जीथे संवेदनशीलतेचा अर्थ स्पर्धेत न टीकणारा असा
काढल्या जाईल. पण कालाय तस्मे नम: असते हो! जुण्या वास्तू संपने, जुण्या व्यक्ती संपने
म्हणजे आपल्यातला सुद्धा एक मुक कोपरा हिरमूसला होत असतो. जुणीजाणती आपल्याकडे पाहुन
“थम्स अप” करणारी मोठी झाडं पडतात तेव्हा आपणही थोडे फार मरतच असतो. बन्नोरे काकांच्या
दुकानात जगातलं काहीही मिळायचं, जन्मापासून तर मृत्यू पर्यंत कोणतही सामान मिळणारं
हे कारंजातलं अजायबघर (त्यांना जर जेट विमानाची आर्डर दिली असती तर कोण सांगाव त्यांनी
त्याला ही उपलब्ध करुन दिलं असतं!). काल परवा बन्नोरे काका गेले, आमच्या प्रगतीवर सुक्ष्म
लक्ष ठेवणारा एक बुजूर्ग गेला, सराफा लाइनमधून जातांना उगाच चुकल्याचुकल्या सारखं वाटलं.
देवचंद अगरचंद चं अजब गजब कटलरीचं दुकान बंद पडलं अन आम्ही थोडेसे हिरमूसलोच (गेल्या
विस वर्षात किमान काही हजारांचे पेन आम्ही इथून खरेदी केले होते. कारण घेतलेला पेन
एक आठवड्यापेक्षा जास्त काळ आमच्याकडे टिकत नाही असं आम्हाला सरस्वतीचं वरदान आहे!).
एखाद्या शास्त्रज्ञांप्रमाणे कारंजात रुग्नांवर उपचार करणारे डा. खोना गेले. डा. खोनांच्या
दवाखाण्यात गुढ गोष्टी होत्या, एक जुणाट मायक्रोस्कोप, अनेक प्रकारच्या परिक्षण नळ्या,
विचीत्र रंगांच्या रसायणांनी भरलेल्या काचेच्या नळ्या. कारंजातला पहिला फोटोग्राफीचा
कॅमेरा त्यांनीच आनला होता. “अभी ३ मेगा पिक्सेल के कॅमेरे आ गये निलेश” अशी माहिती
त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी जेव्हा मला दिली तेव्हा त्यांच्या भोळेपणावर फिदा
झालो होतो (कारण मी नुकताच १० मेगा पिक्सेल चा कॅमेरा विकत घेतला होता!). डा. संपट
हे एक उत्तम जादूगार होते देश विदेशात त्यांचे जादूचे प्रयोग व्हायचे, त्यांनी अनेक
दशकांपासून कारंजात किती पाऊस पडतो याचा डेटा मेंटेन केला होता. ते सुद्धा गेल्या वर्षी
गेले. गजब चे पॅशनेट लोक होते, त्यांचे अजब गजब छंद होते.
हिच ती शेवटच्या घटका मोजत असलेली सोण्याची भांडी देणारी विहीर |
आता
कारंजाच्यात बकालपणा वाढतो आहे. रस्ते म्हणावे की खड्डे असा विचार करण्याची वेळ आली
आहे. ज्या वेशींमधून कधीकाळी कस्तुरीने ओवरलोड झालेला ६० उंठांचा काफीला कारंजात शिरला
होता त्या वेशी शेवटच्या घटका मोजताहेत. जिथे तिथे विखूरलेल्या गुटक्याच्या पुड्या,
जिकडेतिकडे पसरलेली घान, मोकाटपणे रस्त्यात रवंथ करणारी जनावरं, बापाच्या पैशावर वेगाने
गाड्या उडवणारी छोटी छोटी पोरं असं विभस्त दृष्य मनाला वेदना देतं. आपल्या नव वधूंसोबत
ज्या ऋषी तलावात आमच्या बुजूर्गांनी बोटींग केलं होतं तो तलाव आता जणू अश्रूंनी भरला
आहे. बाबरी मशीदच्या प्रकरणाच्या वेळी देश पेटलेला असतांना भाईचारा दाखवणारं कारंजं
आता पुर्वी सारखं राहिलं नाही. गेल्या विस वर्षात “धक्याला बुक्की” किंवा इंट का जवाब
पत्थर” ची वाढत चाललेली अखील भारतीय मानसीकता कारंजातही हळुहळू शिरते आहे. बिल्डर्सची
लाबी फक्त पुण्या मुंबईत नसते ती इथेही सक्रिय होत चाललीय. प्लाट चे भाव वाढतच चालले,
पैसे कमवण्यासाठी उत्पादन करण्याची गरज नाही, प्लाटसची “अलटापलटी” केली की गब्बर होता
येते ही “स्युडो इकानामी” इथेही वाढत चालली, अतीक्रमणाचा विळखा सारंग तलावापर्यंत पोहोचला,
मोबाइल टावर्सची संख्या वाढत चाललीय, मंदीरांची संख्या अन जुण्याजाणत्या मंदीरातलं
राजकारण शिगेला पोहोचतय, काल पर्यंत सिंगल स्टोरी असणारी मंदीर ट्रिपल स्टोरी झाली
पण मंदीरांकडे जाणारे रस्ते मात्र “भगवान के तरफ जानेवाला रास्ता कठीण होता है” हेच
सांगतात. कारंजातली नगर परिषद देशातल्या काही जुण्या नगर परिषदांपैकी एक (११८ वर्ष
जुणी) पण आता फक्त ठेकेदारांनी न केलेल्या किंवा निकृष्टपणे केलेल्या कामाची बिलं काढण्यापुरतीच
उरली की काय अशी शंका आम्हाला येते आहे.
कारंजात
कधीच “तकल्लूफ” नव्हता. अघळपघळ असने हा इथला स्थाई स्वभाव. पण आता “सभ्यपणा” जरा जास्तच
वाढत चाललाय, सोबतच थोड्याश्या उष्णतेने वितळून जाईल अशी मेनाची पावलं सुद्धा वाढत
चालली. जिथे प्रत्येक शब्द मोजून मापून वापरावा लागतो, जिथे अंतरंग संबंधांमध्ये सहजता
उरत नाही अशा मानवी सहसंबंधाच्या काम्प्लिकेटेड इंटररिलेशनशीप कडे मार्गक्रमण सुरु
आहे.
उद्या
कारंजात मल्टिप्लेक्स येईल पण साई व्हिडिओ ला विसरता येईल काय जीथे ६० पैशांची तिकीट
काढून “एक दुजे के लिये” बघीतला होता? मॅकडोनाल्डचा पिझ्झा येईल पण फुकटे बिस्किटला
किंवा शितल वाल्याच्या “इस्पेशल” बदाम ला, गुप्ताजींच्या गरम जलेबीला, बिस्मिल्लाभाईच्या
पानाला, रवूफ भाईच्या चाय ला विसरता येईल काय? अनेक मन रमवनारी साधनं आली तरी कामाक्षामाता
मंदीरची यात्रा, भिलखेडा मंदीरची हनुमान जयंतीची यात्रा, रामदास मठाची दस-याची यात्रा,
रामनवमीची मोठ्या राममंदीरची यात्रा, गुरुमहाराज उत्सवादरम्यान भरणारी यात्रा विसरता
येईल काय? नवनविन शाळा येतील पण जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघणारे विद्यार्थी निर्माण
होतील काय? हजारो दोस्त निर्माण करणारी असंख्य माध्यमे येतील पण कितीही कठीण परिस्थितीत
“दोस्ता साठी कायपण” असा ऋषीतलावच्या टेकडीवर पाठीवर ठेवलेला उबदार हात विसरता येईल
काय?
जुन्याचा
आग्रह मुळीच नाही हो, पण येणार नवीन हे विभस्त, बकाल, सौंदर्यहीन, संवेदनाहीन नसावं
येवढच!
(समाप्त)
aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
डॉक्टर साहेबांनी लेखामध्ये खराखेरच जिव ओतला आहे
ReplyDeleteवाचत असतांना कारंजाचे चित्र डोळयासमोर ऊभे राहते. निलेशभाऊ तुम्ही लिहीने चालुच ठेवावे