Saturday, November 16, 2013

माझे आदिवासी खाद्य जीवन
डा. निलेश हेडा
मेंढ्यातले खाद्य जीवन लिहितांना बऱ्याचदा माझ्या तोंडात पाणी येत आहे. खाद्य पदार्थांची इतकी विविधता मी इतर कोठे बघीतली नाही. बरेचदा मला वाटतं, जैविक विविधता आणि खाद्य विविधता यांचे सरळ प्रमाण असावे. जितकी जैविक विविधता जास्त तितकी अन्नाची विविधता जास्त. मेंढ्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत भरपूर नवीन गोष्टी खायला मिळाल्यात.
मोहा फुल
मोहा (=इरपी) पासून आपण सुरुवात करुया. मोहा हा आदिवासींचा कल्पवृक्ष. ह्या झाडाने आदिवासींच्या जीवनात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. परिस्थितीकी शास्त्रात "की स्टोन स्पेसीज" नावाची संकल्पना आहे. मराठीत त्याचं भाषांतर आपण ’मूलभुत संसाधन’ असं करुया. परिसंस्थेत साऱ्याच प्रजाती महत्त्वाच्या असतात पण त्यातल्यात्यात काही ह्या फार जास्त महत्त्वाच्या असतात कारण अनेक अन्य प्रजातींचे जगणे ह्या मूलभूत संसाधनांवर अवलंबून असते. मोहा हा त्यातलाच एक. मोहाची फुलं (गोंडीत इरपी पुंगार) म्हणजे एक प्रकारची किशमीश. शर्करेने भरपूर अशी ही फुलं चविष्ठ आणि पौष्ठिक असतात. त्यांच्या फुलांची पोळी करतात. एका कार्यशाळेत मोहाची चिक्की खायला मिळाली, दिल खुश हो गया! मोहाची फुलं पाण्यात टाकून त्या पाण्याला उकळवायचं, काही वेळाने फुलातील सर्व साखर पाण्यात उतरते नंतर फुलांचा चोथा काढून टाकायचा, घटट झालेल्या पाण्याला भरपूर वेळ उकळत राहायचं, घटट झालं की ताटात थापायचं. मजेदार चिक्की तयार! मोहाच्या फळाची साल उकडून मीठ मिरची सोबत खातात.
बांबूचे कंद
आदिवासी जीवनातील दुसरी सर्वात महत्त्वाची प्रजाती म्हणजे बांबू. बांबूचे कंद (गोंडीत वास्ते) हा माझा मेंढ्यातला आवडता खाद्य प्रकार (ह्याच कंदाचा पुढे बांबू तयार होतो). पावसाळ्यात येणारे हे कंद अनेक पद्धतीने खाता येतात पण याचे तळून केलेले वडे म्हणजे चविची पर्वणीच असतात. हे कंद किसुन वाळवून साठवताही येतात आणि ह्याचा मौसम सरला की भाजी बनवून खाता येते. बेंगलुरच्या एका तीनतारांकीत हॅटेलात बांबू कंदाच्या एका डिशची किम्मत ४५० रुपये आहे हे बघून चाट पडलो होतो!
तांदूळ हे मेंढ्यातलं महत्त्वाचं अन्न. हातसडीचे तांदूळ, म्हणजे राईसमील मध्ये न पाठवता घरीच साळी कुटून तयार केलेला तांदूळ. हा तांदूळ जर आपण खाल्ला तर अश्वत्थाम्याच्या कथेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हातसडीचे तांदूळ खाल्ले की जाणवतं आजवर आपण भाताच्या नावाने केवळ ’स्टार्च’ खात होतो. मेढ्यांत जेवणासोबत आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जावा. जेवण कोणतेही असो पण सोबत तांदळाच्या पिठाला आंबवून तयार केलेली आंबील (=जावा) ही हवीच. हा काहीसा आंबट चवीचा पदार्थ शेतात जंगलात काम करताना सोबत घेऊन जातात आणि जेव्हाजेव्हा भूक किंवा तहान लागेल तेव्हा तेव्हा ह्याचा समाचार घेतला जातो. 
वास्ते
पावसाळा थोडासा ओसरायला लागला की बांबूच्या बेटाच्या तळाशी पांढरीशुभ्र भूछत्रे (मशरुम=कुहुक) फुलायला लागतात. भूछत्रांची भाजी एकदा शिवरामकडे खायला मिळाली. हिदकुहुकु, पुतकुहुकु आणि तुमीर बोरसेला हे तीन भूछत्रांचे प्रकार मेंढ्यात खाण्यासाठी वापरतात. प्रथीनांनी भरपूर हे अन्न आम्हा शहरवासीयांना मिळू शकत नाही हे आमचं दुर्दैव. पण योग्य आणि बिनविषारी भूछत्रे ओळखण्यासाठी सरावलेली दृष्टी आणि अनुभव असावा लागतो.
जंगली  भाज्यांची भरपूर  पर्वणी पावसाळ्यात बघायला मिळते. जवळ जवळ २५ प्रकारच्या जंगलातल्या भाज्या खाण्यात असतात. त्यापैकी करटुले ह्या वेलीची फळे गडचिरोली आणि काही अन्य विदर्भातील जिल्ह्यातून शहरात ट्रकांनी भरुन पाठविली जातात.
पावसाळा सरला आहे. पावसाळ्यात भरपूर पोषन मिळवून अनेक कंदांनी आपल्या मुळात भरपूर खाद्य पदार्थ साठवून ठेवले आहेत. जवळ जवळ १५ प्रकारचे कंद लोक खातात (बेसे माटी, हिर माटी, जंगा माटी, कैमुल माटी, करवुल माटी, कसुर माटी, केहका माटी, कुपट माटी, पद माटी, पोवाड माटी, सावली माटी, सुपार माटी, तुपुड माटी, गंजा माटी, हातुर उल्ली माटी! माटी म्हणजे कंद!). काही प्रकारचे कंद आपण आरामात भाजून किंवा उकडून खाऊ शकतो पण काहींच्या बाबतीत काळजीपूर्वक प्रक्रिया करण्याची गरज असते. एकदा एक समाजसेवा महाविद्यालयाचा चमू मेंढ्यात आला. त्यातील एका (अती उत्साही!) विद्यार्थीनीने एक प्रकारचा कंद अभावितपणे चावला. कंद चावताच तिचा श्वास अवरुद्ध व्हायला लागला, तिला धड बोलताही येईनासे झाले. मला वाटलं हिला फिट वगैरेचा झटका आला असावा. जवळ जवळ एक तासानंतर ती पूर्व पदावर आली. तेच मशरुमच्या बाबतीत असतं.
पळसाची फुलं
उन्हाळ्यात विदर्भाची जंगले पळसाच्या लालचुटूक फुलांनी नव्या नवरी प्रमाणे नटतात. त्याची भडक रंगाची फुलं प्रेमीयुगलांच्या ’दिलचा दर्द’ वाढवितात. त्यातच भरीस भर म्हणजे होळी येते. ह्या मादक अशा ऋतूत तीन प्रजाती फार महत्त्वाच्या असतात, दोन प्रजाती मन रंगीत बनवतात तर एक तन! त्यातली एक म्हणजे ताडीची झाडं, ह्याची ताडी पिऊन मस्त होण्यासाठी. दुसरी प्रजाती म्हणजे मोहा, ह्याच्या फुलांच्या दारुबद्दल अधिक सांगणे न लगे! पळसाच्या फुलांपासून रंग आणि ’सॅफ्ट ड्रिंक’ तयार होते. ज्याला ताडी अन मोहाची चालत नाही त्याने पळस फुलांच्या शरबतचा आनंद घ्यायचा! पळसाची लालभडक फुलं सावलीत वाळवून ठेवतात. शरबत बनवायच्या आधी त्यांना काहीवेळ पाण्यात भिजत ठेवायचं, नंतर ओली  झालेली  फुलं  काढून  टाकायची, गाळून साखर टाकली की रंगीत पेय तयार. याची चव काही फारशी मला आवडली नाही पण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी हे शरबत रामबाण आहे. एकदा जंगलात भटकत होतो. सोबत केशव गुरनुले म्हणुन एक मित्र होते. केशव गुरनुले म्हणजे एक प्रकारचे ’जंगल बुक’ आहेत. जंगलाबद्दल त्यांना इतक्या अंतरंग गोष्टी माहीत आहेत की मला त्यांचा हेवा वाटतो. उन्हाळ्याचे दिवस होते, चालता चालता तहान सुद्धा लागली होती आणि प्रचंड थकवाही जाणवत होता. पाणी लवकर प्राप्त होईल याची चिन्ह दिसत नव्हती. केशव मला म्हणाला की तहान आणि थकवा घालवण्यासाठी पळसाच्या फुलांच्या देठाकडची बाजू शोषायची. त्यात असणारा पाण्याचा एक थेंब फार गोड असतो. मी ही युक्ती आजमावली, अशी बरीच फुलं शोषल्यानंतर थोडेसे पाणी शरीराला मिळाले आणि त्यातील ग्लुकोज मुळे थकवा सुद्धा गेला. फार जास्त जर तहान लागली तर मात्र आपल्याला ’डावड तोंडा’ नावाच्या वेलीचा शोध घ्यावा लागेल. ह्याच्या दांडीच्या पेरात भरपूर  पाणी  (एका माणसाची पूर्ण तहान भागवेल इतके!) असते. नारळाच्या पाण्याशी साधर्म्य असणारी चव असलेल्या दावडतोंडाच्या पाण्याने आपला शारीरिक संगणक ’रिफ्रेश’ झालाच म्हणून समजा. याच तीन प्रजातींपैकी ताडीचे कंद सुद्धा एक उत्तम ’टाईमपास’ खाध्य आहे.
आता काही जंगली फळांबद्दल. भिलाई खोजी (गोंडी भाषेत भिलाई म्हणजे मांजर आणि खोजी म्हणजे पायांचा ठसा. मांजराच्या पायांच्या ठश्याचा आकार असणारे फुल असलेली वनस्पती!), जांभूळ (=नेंडी), चिंच (=हित्ता), सुर्या (=कडही), बेल (=महाका), पिही पोरटी, बोर (=रेंगा), उंबर (=तोया) इत्यादी फळे मेंढ्यात चवीने खाल्ली जातात. यातील तेंदू (=तुमरी) आणि चारोळी (=रेखा) बद्दल थोडी जास्त माहिती.
तेंदू ची फळे
मोहा आणि बांबू नंतर आदिवासी जीवनात तेंदू हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्यातच तेंदुला फळे येतात. मी ज्या वर्षी मेंढ्यात होतो त्या वर्षी तेंदु फळाचा बार आला होता. दरवर्षी इतक्या जास्त प्रमाणात फळे लागत नाहीत. लोक सांगतात की एका वर्षी जर का जास्त फळे लागली तर येणाऱ्या वर्षात झाड आराम करतं! ज्या प्रमाणे मोहा फुलं ही आदिवासींची किशमीश आहे त्याच प्रमाणे तेंदु फळे ही त्यांचा चिकू आहे (अन बिब्बे आणि चारोळी म्हणजे काजू!). तेंदूच्या फळांना सुकवून, कणगीत (=ढोलीत) साठवून ठेवतात आणि पावसाळ्यात खातात. त्यावर्षी मी भरपूर तेंदुफळे खाल्ली. कोणत्याही घरी गेलं की घरमालकीन परडीभर फळे आणून पुढ्यात ठेवायची. तसच एकदा चारोळीच्या बाबतीत झालं. जंगलभर चारोळीची झाडं अक्षरश: चारोळीने लगडून गेली होती. त्यावेळी भरपूर चारोळी खाल्ली.
मधाच्या बाबतीत मेंढा भाग्यवान आहे. मधाच्या बाबतीत जो सहभागी अभ्यास मेंढा गावकऱ्यांनी केला, जी व्यवस्थापकीय पावलं उचलली ती अनेक गावांना स्फुर्तीदायक ठरावी अशीच आहेत. मधमाशी हा इटूकला पिटुकलासा जीव पण सहजीवनाचं आणि सामाजिक व्यवस्थापनाचं शिक्षण देणारं ते एक जिवंत उदाहरण आहे. मध तर ते देतच पण त्याच सोबत परागीकरणाची अनमोल सेवा निसर्गाला प्रदान करतं. बहुतांश ठिकाणी मध काढायची जी पद्धत आहे ती विध्वंसक असते. सरळ सरळ पोळे जाळून टाकणे, झाड तोडून टाकणे अशा पद्धतीने मध काढल्यामुळे माशा तर मरतातच पण मधाची गुणवत्ता सुद्धा घसरते. डॅ. गोपाल पालीवाल, एक तरुण वैज्ञानिक, किटकशास्त्राचा पदवीधर आणि त्याच विषयात आचार्याची पदवी मिळवलेला तरुण. त्याने मेंढ्यात बराच काळ ठाण मांडले. लोकांसोबत मधमाशांचा अभ्यास करता करता मध काढायची अभिनव आणि निसर्गानुकूल अशी पद्धतही शोधून काढली. ह्या पद्धतीत त्यांच्या चमुने मेंढ्यात एक अभिनव असा पोषाख तयार केला. ह्या पोषाखामधून मधमाशीचा डंख शरीरापर्यंत पोहचू शकत नाही. हा पोषाख घालून आणि हेल्मेट घालून सायंकाळी झाडावर चढायचं (अंधारात मधमाशांना व्यवस्थित दिसत नाही) आणि मधमाशांच्या पोळ्यात जो भाग मधाचा असतो फक्त तेवढाच कापून काढायचा. ना मधमाशांचा मृत्यू, ना अंड्यांची हानी ! याही पुढे जाऊन गोपाल पालीवाल म्हणतात की, अशा पद्धतीमुळे मधमाशा आळशी बनत नाहीत आणि पुन्हा मध गोळा करण्यासाठी तत्परतेने सज्ज होतात. म्हणजेच जास्त परागीकरण आणि जास्त निसर्ग संवर्धन! असो, माझ्या दोन वर्षाच्या काळात भरपूर मध खायला मिळाले.
मेंढ्याच्या मांसाहारी जीवनाबद्दल मला जास्त लिहिता येणार नाही. ज्यावेळी मी मेंढ्यात होतो तेंव्हा माझ्या विषयाच्या प्राण्याशिवाय (मासे) मी इतर प्रकार खात नव्हतो. माश्यांच्या (=मीन) बाबतीत बरीच विविधता मेंढ्यात बघायला  मिळते. मासे हा आदिवासींचा ’विक पॅइंट’. कठाणी नदी खेरीज माश्यांच्या संदर्भात दुसरा कोणताही स्त्रोत मेंढ्याजवळ  नव्हता. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी लोकांनी सामुहिक व वैयक्तिक स्तरावर आता मासे पाळायला सुरुवात केली आहे. ह्या बाबतीत मेंढ्यातील लोकांनी उचललेल्या एका महत्त्वाच्या पावलाची माहिती इथे द्यावीशी वाटते. मेंढ्यात वनतलाव निर्माण करायचा होता. या कामासाठी सरकारी मदत सुद्धा मिळाली. जंगलातील ’मोलोल कोहोडा’ (=मोलोल म्हणजे ससा आणि कोहोडा म्हणजे नाला. जिथे ससे पाणी प्यायला येतात ती जागा!) ह्या ठिकाणची निवड अभ्यास गटाने केली. मोलोल कोहोडा हे ठिकाण जंगल आणि शेतीच्या सिमेवर आहे. हे ठिकाण निवडण्याच्या संदर्भात दूरदृष्टी ही होती की वन्य प्राण्यांना पाणी मिळावे आणि शेतीलाही. पण तलावाचे काम अर्धे झाले आणि सरकारी निधीतील पैसा संपला. आता काय करावं? असा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला. त्यातच पावसाळा आला. तलाव पाण्याने अर्धा भरला. त्यात गावकऱ्यांनी माश्यांची बीजाई सोडली. मासे मोठे झाले. गावकऱ्यांनी ठरवलं की जर एक किलो मासे कोणाला हवे असतील तर त्याने १० बाय १० फुट एवढा तलाव खोदायचा. हा हा म्हणता तलावाचे काम पूर्ण झाले. आज त्या तलावात माश्यांचे चांगलेच उत्पादन लोक घेतात आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला मोठ्या अभिमानाने हा तलाव दाखवतात.
उपरोक्त खाद्य जीवन कमी अधिक प्रमाणात बऱ्याच आदिवासी भागात बघायला मिळेल. खाद्य साधनांची विविधता हे त्यातील समान दुवा आढळतो. इतके खाद्य प्रकार असुनही आजकाल बऱ्याच आदिवासी भागात  कुपोषणाचे  प्रमाण  जास्त का आहे? या प्रश्नाचा विचार आपल्याला अनेक अंगानी करण्याची गरज आहे. मेंढ्यात कुपोषण नाही, कारण अन्नाची शाश्वती आहे. जंगल भरपूर आहे, चांगल्या स्थितीत आहे. ग्रामसभा सक्षम असल्याने अन्नाचे दुर्भिक्ष जाणवत नाही. ’धान्य कोश’ सारख्या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्याने काही विशिष्ठ काळात जाणवणारे अन्नाचे दुर्भीक्ष आता जाणवत नाही. पण अन्य ठिकाणी अशी परिस्थिती आता राहिली नाही. जंगल नष्ट झाल्यामुळे आता पूर्वीसारखी अन्नाची शाश्वती राहिली नाही. सरकारी स्तरावर याबाबतीत बरेच प्रयत्न केले जात असतात पण असे प्रयत्न म्हणजे वरवरची मलमपटटी केल्यासारखे असतात. मूळ प्रश्न आहे जैवविविधतेचे संवर्धन आणि लोकांना त्या संसाधनाना वापरण्याचा हक्क. इंग्रजाच्या आगमनानंतर आजवर सुद्धा जंगल नावाची संकल्पना केवळ सागवान सारख्या काही मोजक्या प्रजातींची शेती इथपर्यंतच सिमीत राहिलेली आहे. यवतमाळच्या जंगलात फिरताना ही भीषण परिस्थिती वारंवार जाणवत होती. जैवविवीधतेच्या संकल्पनेची माहिती नसणाऱ्या व्यक्तिसाठी इतके घनदाट जंगल पाहून आनंदाच्या उकळ्या फुटाव्या पण त्या जंगलाला जंगल न म्हणता सागवानाची शेती म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल.  लोक सांगत होते, ’गावाला भरपूर जंगल आहे पण आमच्या काय कामाचे? सारं जंगल सागवानाने भरलेलं, सागवान खाता येत नाही, त्याला विकता येत नाही, उलट ह्या जंगलाचा त्रासच आहे’.
त्यामुळे कुपोषणाचा विचार करताना मूलभूत विचार हा जंगलावरच्या लोकांच्या हक्काचा व्हायला हवा, जैवविवीधतेला वाचविण्याचा व्हायला हवा. जंगलावरचे हक्क मिळाले तर लोक जंगल वाचवतील, स्वत: जाणीवपूर्वक निर्णय घेतील, जैवविविधता वाचेल कुपोषण कमी होईल. १९७० पासुन भारतातील २५० जिल्ह्यात ’पोषण सुधार कार्यक्रम’ (nutrition enhancement programme) राबविल्या जात आहे; पण ह्या कार्यक्रमाचे फलित काय आहे? तर कुपोषणाचा आलेख वाढतच चाललाय. कारण रोग वेगळाच आहे आणि औषधी वेगळीच दिल्या जात आहे. चक्क लोकांना भिकाऱ्यासारखे अन्न वाटप करणे सुरु आहे. पण शाश्वत दृष्टीने प्रयत्न केले जात नाहीत.
दुसरा मुद्दा ह्या खाद्य जीवनाशी संबंधित इतक्या सरस गोष्टी असुनही त्यांना बाह्य जगात स्थान का नाही. का मोहाची फूल व्यवस्थितपणे पॅक केलेल्या वेस्टनात मिळत नाही. कारण ह्या गोष्टींची जाहिरात नाही. ह्या सर्व गोष्टींवर प्रक्रिया करण्याचं तंत्र लोकांकडे नाही. मेंढ्यात ग्रामसभेतर्फे मोहाची खरेदी केल्या जाते. एकदा पावसाळ्यानंतर मोहाच्या गोदामाला बघायला गेलो. मोहाच्या फुलांमधून चक्क अळ्या बाहेर येत होत्या, त्याचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठीच केल्याजाणे शक्य होते. तेच डिंकाच्या, चारोळीच्या, तेंदू फळाच्या बाबतीत आहे, मुल्यवृद्धीच्या तंत्राची कमतरता.
येणारा काळ हा हवाबंद खाद्य पदार्थांचा काळ असणार आहे. एक मोठी बाजारपेठ ह्या क्षेत्रात उभी राहणार आहे असे जागतिक बाजारपेठेच्या एकुणच प्रवाहावरुन दिसते. कोणत्याही किटकनाशकापासून वंचीत अशा वनखाद्याच्या क्षेत्रात आदिवासीं क्षेत्राला बरीच संधी आहे. गरज आहे व्यवस्थितपणे आखलेल्या रणनीतीची आणि तळागाळापर्यंत तंत्रज्ञान पोहचवण्याची.

2 comments:

  1. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete
  2. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete