Friday, April 23, 2010

अरुणावतीचे अश्रू पुसण्याची गरज आहे

अरुणावतीचे अश्रू पुसण्याची गरज आहे

डॉ. नीलेश हेडा

संवर्धन

कारंजा (लाड)

( ९७६५२७०६६६

नदी अभ्यास आणि नदीच्या व्यवस्थापनशास्त्राचा पहिला धडा मी मानोरा शहरातुन वाहणा-या अरुणावती नदीच्या काठावर सुमारे २० वर्षांआधी गिरवला. ही नदी तेव्हा ख-या अर्थाने ’नदी’ होती, सतत प्रवाही. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणारी ही नदी पुर आला की रौद्र रुप धारण करायची. मानो-याच्या पोलिस स्टेशन जवळची ‘घाटी’ फुटली की बाजारातली सारी दुकानं उठायची. अनेक दुकानदार नदीला नारळ अर्पन करुन पुर कमी होण्याची प्रार्थना करायचे. नदीच्या काठावर असलेले मारुतीचे मंदीर म्हणजे आमचा ’परमनंट’ आसरा. नदीच्या एका काठावर विस्तीर्ण असे भराटीचे रान ज्याला आम्ही ’भराट बन’ म्हणायचो आणि भराटबनच्या नंतर दिग्रस रोड वर आमची शाळा, रविंद्रनाथ टागोर विद्यालय. मानोरा हे गाव त्या काळी नैसर्गिक संसाधनाने परिपूर्ण होते. एकीकडे उंच हिरवीकंच्च टेकडी त्याच्या खाली सतत वाहणारी अरुणावती आणि नदीच्या काठावर वसलेले मानोरा हे गाव अशी सुंदर नैसर्गिक रचना असलेले हे एक टुमदार गाव. वसंत नगर, जुणे मानोरा शहर आणि धामणी ह्या तीन पाड्यात विभागलेले हे शहर प्रत्येक कोप-यावर नदीशी सतत संपर्कात असल्यासारखे आहे.

सुमारे पंचेविस वर्षानंतर अरुणावती बघणे हा एक मनस्ताप देणारा अनुभव आहे. ज्या डोहाचे पाणी कधीच तुटले नाही ते सारे डोह आता हळुहळू गाळाणे भरत आहेत. शहर वाढत गेले तशी पाण्याची गरज वाढत गेली. जशी पाण्याची गरज वाढत गेली तसे प्रदुषन वाढत गेले. अतीक्रमणाने नदीचा सुद्धा घास घ्यायला सुरुवात केली. जुण्या शहराजवळ एक मोठा नाला नदीला मिळतो. तो नाला एका फार मोठ्या भूभागाचे पाणी अरुणावतीला देतो. आता तो नाला संपला आहे. वाढणा-या मानोरा शहराला नैसर्गिक संसाधने पुरवता पुरवता आसपासचे हिरवे डोंगर उघडे बोडखे व्हायला लागले. झाडोरा संपल्याने मातीची धुप व्हायला लागली. शहरात मोठ्या प्रमाणावर खोदल्या जाणा-या बोअरवेलने नदीचे पात्र कोरडे व्हायला लागले. जुण्या मानोरा शहरालगत गिट्टी खदान आहे, तीचे क्षेत्र वाढत गेले त्याच वेळी वाढणा-या शहरासाठीच्या घर बांधणीसाठी रेतीचा अविरत उपसा वाढला आणि नदीची नैसर्गिक संरचना पुर्णत: बदलायला लागली. अरुणावतीच्या काठावर भोई लोकांची वस्ती आहे. मानो-याच्या भोई लोकांसाठी अरुणावती म्हणजे हक्काच्या रोजगाराचा राजमार्ग. लहानपणी अनेक तास भोयांची मासेमारी निरखत बसायचो. एकदा मानो-याच्या बाजारात एका भोयाने एक प्रचंड आकाराचा कासव पकडुन आणला होता. नक्कीच तो ५० किलो वजनाचा तरी असावा. इतक्या मोठ्या आकाराचा कासव नंतर मी माझ्या प्राणीशास्त्राच्या संपूर्ण कारकिर्दीत बघीतला नाही, पण नदीतील जैवविविधतेचे अधिवास नष्ट झाले, कासव ही गेले आणि माश्यांच्या अनेक जाती सुद्धा संपूष्टात आल्या. मध्यंतरी अमेरीकेतील इंडीयाना विद्यापीठातील माझ्या एका मत्स्य अभ्यासक मैत्रीनीसोबत मानोरातील मुस्लीम कब्रस्तान लगतच्या डोहात मासेमारी करायला गेलो अनेक तास मासेमारी करुनही हाती काही विशेष लागलेच नाही. कुठे गेले सर्व मासे? निसर्गात बदल होतच असतात, पण इतक्या वेगाने बदल होऊ शकतात ह्याचा मी कधी विचारच केला नाही.

आज वर्तमान पत्रातुन मानोरा शहरात पाण्याची भिषण टंचाई आहे अशा बातम्या येतात आणि मी आश्चर्यचकित होतो. ज्या शहराजवळ सतत प्रवाही अरुणावती आहे त्या शहराचे पाण्यासाठी असे हाल ! जी परिस्थिती मानोरा लगतच्या नदीची आहे तीच मानोरा तालुक्यातल्या इतर नैसर्गिक संसाधनांची सुद्धा आहे. वाशिम जिल्ह्यातील काही चांगली जंगले, काही चांगले गवताळ माळराण मानोरा तालुक्यातच होते. भरपूर प्रमाणात तेंदू पत्ता, डिंक, औषधी वनस्पती, चारोळी, जनावरांसाठी चारा, जळतण ह्या जंगलातून स्थानीक लोकांना मिळायचा. जंगले चांगली असल्याने शेतीची परिस्थिती सुद्धा उत्तम होती. पेरणीच्या वेळी आणि पिक कापणी दरम्यान बंजारा स्त्रिया त्यांची पारंपरिक गाणी गात जेव्हा बैलगाडीतुन जायच्या तेव्हा साक्षात निसर्ग मंत्रमुग्ध व्हायचा. दुर्दैवाने. आज वाशिम जिल्ह्यात शेतक-यांच्या आत्महत्येत ह्या तालुक्याचा पहिला क्रमांक आहे.

ह्या बदलांच्या मागच्या कारणांचा काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. त्यासोबतच उपायांच्या बाबतीत सुद्धा पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे. बिघडलेला निसर्ग पून्हा जागृत करता येतो असा विश्वास ठेऊन हे काम करता येईल. मानोरा तालुका मानव संसाधनांच्या बाबतीत अतीषय सधन असा तालुका आहे. मजूरांची फार मोठी संख्या ह्या तालुक्यात आहे. दुर्दैवाने असे मजूर रोजगाच्या शोधात मोठ्या प्रमाणावर मुंबई-पुण्याकडे धाव घेत आहेत. वाशिम जिल्ह्यातुन बाहेरगावी स्तलांतरीत होणा-या मजुरांची संख्या मानोरा तालुक्यातुनच जास्त आहे. अशा हजारो मजूरांच्या मदतीने आणि रोजगार हमी योजनेसारख्या योजना राबवून मानोरा तालुक्याची नैसर्गिक संसाधने पुन्हा जिवंत करता येतील. पुन्हा अरुनावती हसु शकते, गरज आहे जागृतीची आणि कृतीची.

(लेखक पर्यावरण अभ्यासक असुन लंडन स्थित रुफोर्ड मॉरिस फाउंडेशन चे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत)

No comments:

Post a Comment