Friday, April 23, 2010

मधमाशा संपने म्हणजे शेती संपने

मधमाशा संपने म्हणजे शेती संपने

डा. निलेश हेडा

मधमाशी तसा छोटासाच जीव पण सहजीवनाचं उत्तम उदाहरण आपल्याला पटऊन देतो. अविरत कार्यमग्न असणे, समुहाचं हित जोपासुन त्यानुसार कृती करत जाणे, विविध कामांची विभागणी (Division of labor) करुन मधाच्या पोळ्याचं उत्कृष्ठ व्यवस्थापन करणे, प्रसंगी पोळ्याच्या हितासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकणे हे काही गुण प्रत्येकाने शिकुन घ्यावेत असेच आहेत. दुर्दैवाने ह्या जीवाचे अस्तीत्वच धोक्यात आले आहे.

उत्क्रांती शास्त्रात (Evolution) को-इव्होलुशन म्हणून एक संकल्पना आहे. को इव्होलुशन म्हणजे एका प्रजातीची उत्कांती होत असतांना त्याच्या सोबत सोबत अन्य प्रजातीची सुद्धा होत जाणे. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सपुष्प वनस्पती आणि किटकांच्या उक्रांतीच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते. सपूष्प वनस्पतीत दिसणारी फुलांच्या रंगाची, आकाराची, गंधाची विविधता निर्माण होण्याचं कारण म्हणजे वनस्पतींना किटकांना आकर्षीत करायचे होते. जास्त सुंदर रंग म्हणजे जास्त किटक आणि जास्त किटक म्हणजे जास्त परागीकरण. सहजीवनाचं सुंदर उदाहरण किटक आणि सपुष्प वनस्पतीच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळते. वनस्पती त्यांच्यातला गोड मध किटकांना देतो तर त्याबदल्यात किटक परागीकरणाची सेवा वनस्पतींना उपलब्ध करुन देतात.

सहभागी सहजीवनाचं एक उत्तम उदाहरण मधमाशांच्या स्वरुपात आपल्याला बघायला मिळते. आपल्या मधाच्या पोळ्यासाठी प्रत्येक सभासद सतत झटत असतो. प्रत्येक सभासदाची एक विषिष्ट अशी जबाबदारी निसर्गाने प्रदाण केलेली असते. प्रसंगी प्राणाची बाजी लाऊन अशा जबाबदारीचं पालन केल्या जाते. उदाहरणादाखल मधाच्या पोळ्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी असणा-या मधमाशा (Fighter bee) जेव्हां शत्रूला डंख मारतात तेव्हा त्यांचा सुद्धा जीव जातो! अशाचं अनेक प्रकारच्या मधमाशात कामकरी माशा (Worker bee) सुद्धा असतात. अशा मधमाशा अनेक किलोमीटर अंतरावरुन परागकण गोळा करुन आणतात आणि त्यापासुन पोळ्यात मध तयार करतात.

जेव्हां मधमाशा शेतात किटकनाशकांनी फवारणी केलेल्या फुलातुन परागकण गोळा करुन आणतात तेव्हा परागकणासोबतच सुक्ष्म प्रमाणात विषाचे अंश सुद्धा त्यांच्या शरीरात जातात आणि आपल्या मधाच्या पोळ्याजवळ येण्याआधीच त्यांचा मृत्यू होतो. परिणामत: आपल्यासाठीच्या अन्नाची वाट बघणारी मधमाशांची छोटी बालके, राणी माशींची उपासमार होते. अशा रासायणीक किटकनाशकात कार्बोफुरान (Carbofuran), मेथोमिल (Methomyl), मेथीयोकार्ब (Methiocarb), मेक्झाकार्बेट (mexacarbate), प्रोपोक्झर (Propoxur), अझिनफास मिथील (Azinphos-methyl), क्लोरपायरीफास (Chlorpyrifos), डेमेटान (Demeton), डायाझीनान (Diazinon), डायक्रोटोफास (dicrotophos),मॅलाथीआन (Malathion), मोनोक्रोटोफास (Monocrotophos), एंडोसल्फान (Endosulfan), अल्ड्रीन (Aldrin), डाएल्ड्रीन (dieldrin) सोबतच शेकडो प्रकारच्या किटकनाशकांचा समावेश होतो.

इतक्यात मधमाशांच्या पोळ्यांमध्ये विविध प्रकारचे आजार बळावत चालले आहेत. हे आजार विविध प्रकारच्या कारणांनी, ज्यात रासायणीक किटकनाशकांचा महत्त्वाचा समावेश आहे, होत असल्याचे अभ्यासक सांगतात. युरोपीयन देशांमध्ये मधमाशात ’कालनी कोलॅप्स डिसआर्डर’ नावाचा एक गंभीर आजार बळावतो आहे. ह्या आजारात मधमाशांच्या पोळ्यातल्या कामकरी माश्या अचानक संपून जातात. भारतातही ह्या रोगाची लागन झाल्याचे लक्षात येत आहे. प्रत्येकाने एक निरिक्षण केले असेल की आपल्याकडे एकेकाळी मोठ्यासंखेने आढळणारी आग्यामाशांची (Apis dorsata) पोळी झपाट्याने कमी होते आहे. मोठ्या इमारती, मोठी झाडे एकेकाळी मधमाशांच्या पोळ्यांनी लगडलेली असायची पण आता ती ओकीबोकी होत आहे. आपल्या आदिवासींना हक्काचा रोजगार दरवर्षी मधमाशांच्या मधाच्या, मेणाच्या, स्वरुपात मिळायचा आता तो दरवर्षी घटतो आहे. मधमाशा निसर्गातुन कमी होणे म्हणजे एका मोठ्या अन्न धान्य संकटाला निमंत्रण देणे आहे कारण फलधारणाला मदत करणा-यांमध्ये मधमाशा एक महत्त्वाची भूमिका बजावतात (म्हणजे कदाचीत अशीही वेळ येऊ शकते की झाडांना भरपुर पाने फुले लागतील पण फलधारणा होणार नाही!).

त्यामुळे किटकनाशकांच्या अवाजवी उपयोगाबद्दल गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. किटकनाशकांच्या उपयोगाने यापुर्वीच मोठ्या प्रमाणावर आपण नद्या दुषीत करुन माश्यांच्या अनेक प्रजाती संपवल्या आहेत. पक्षांच्या अनेक जाती सुद्धा आपण धोक्यात आनल्या आहेत. तननाशकाच्या उपयोगाने एकावेळी चाळिस-चाळिस मोर मृत्यूमुखी पडल्याच्या घटना विदर्भात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मानसाच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर गेलेल्या विषाचे दुष्परिणाम आज शरीरावर जानवायला लागले आहेत. त्यामुळे सरकारी स्तरावर किटकनाशकाच्या अवाजवी वापराबद्दल नीती निर्धारण करुन कडक नियम तयार करण्याची गरज आहे पण त्याच वेळी प्रत्येक शेतक-याने दुरचा विचार करुन शेतीच्या आणि मधमाशाच्या सहसंबंधाला जाणुन घेऊन किड नियंत्रणाचे विकल्प शोधने गरजेचे झाले आहे.

(लेखक पर्यावरण अभ्यासक असुन रुफोर्ड फाउंडेशन, लंडनचे फेलो आहेत)

No comments:

Post a Comment