Friday, November 24, 2017

संस्मरण - राजस्थान

नद्या वाचल्या तर सभ्यता तग धरुन राहील

डा. निलेश हेडा

यावेळी राजस्थानमध्ये नदी अभ्यासक्रमाची बॅच फार वेगळी होती. सॉफ्ट वेअर इंजीनीयर, आर्किटेक्ट, सि.ए. पी.एचडी चे विद्यार्थी इत्यादी बरेच जन होते. अशा विषयात प्राविण्य मिळवून सुद्धा निसर्गाबद्दल जाणून घ्यायची यांची इच्छा अचंबीत करणारी होती. सर्वांचा परिचय घेतांना त्यांच्या विभागात पावसाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत होतो. भारतभर ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचं सावट आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम आता स्थानिक स्तरावर दिसायला लागले आहेत. आपण मात्र शहामृग होऊन बसलोय. इथे अरावलीच्या पायथ्याशी बसून आम्ही पाण्याबद्दल चिंता करतोय आणि जवळच जयपुर मध्ये “मद्मावती” साठी हजारोने युवक आंदोलन करत आहेत. इतिहासाने युवकांचा मेंदू फारच वाईट पद्धतीने काबीज केलाय? निसर्गासाठी आंदोलनाचे दिवस सरलेत भारतात. आता पुन्हा "चिपको" "नर्मदा बचाओ" सारखी आंदोलनं घडेल की नाही माहित नाही. 
दुस-या दिवशी पंधरा सोळा विविध देशातुन आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांसोबत गप्पा मारता आल्या. युरोपातील लोक नद्यांबद्दल प्रचंड संवेदनशील आहेत. कोणे एके काळी मात्र तिथल्या नद्यांची परिस्थिती आपल्या पेक्षाही वाईट होती. सध्या आपण मात्र भारतीय नद्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील झालोय. नदीला माता बिता मानून आपण एक नंबरचे पाखंडी आहोत हेच सिद्ध करतोय. लंडन शहरातुन थेम्स वाहते. ३ सप्टेबर १८७८ रोजी थेम्स नदीत सुप्रसिद्ध लंडन ब्रिज जवळ The Princess Alice नावाचं जहाज बुडालं. त्यात ६५० लोक बुडून मरन पावले. त्यातल्या बहुतांश लोकांना पोहायला यायचं मात्र तरीही ते का बुडाले? त्याचं कारण हे होत की, त्या काळी थेम्स इतकी जास्त प्रदुषीत झाली होती की पाण्यातल्या विषारी वायूनेच लोकांचा अंत झाला (त्या काळी दररोज ७५ दसलक्ष इंपेरीयल गॅलन इतकं सांडपाणी थेम्स मध्ये सोडल्या जायचं. १ इंपेरीयल गॅलन =३.७८ लिटर). मात्र आजची थेम्स अतीषय निर्मळ अशी नदी आहे (मी स्वत: २०१२ मध्ये लंडन मध्ये हे अनुभवलय). 
चंबल ही भारतातली अतीषय निर्मळ अशी नदी म्हणून ओळखल्या जाते. तिचं पौरानीक नाव चर्मवंती (यज्ञात आहुती देण्यासाठी रांतीदेव या राजाने हजारो गाई बैलांची कत्तल केल्याने चामडं (चर्म) आणि रक्ताचे लोट या नदीत गेले म्हणून चर्मवंती हे नाव, असा महाभारतात संदर्भ आहे. पुर्वी हा शकुनी मामाचा प्रदेश होता. द्रौपदीच्या वस्त्रहरनाच्या वेळी तिने या प्रदेशातल्या लोकांना शाप दिला की चंबलचे पाणी जर तुम्ही वापरले तर तुमचं अहीत होईल आणि याच कारणामुळे चंबल अनेक शतकांपर्यंत स्वच्छ राहीली!). कोटा वरुन आलेले एक जन चंबलचं दुख: सांगत होते की आता चंबल पुर्वी सारखी राहिली नाही. कोटा शहरातील कचरा, प्लास्टीक, वाढत चाललेली शेती आणि त्यातुन नदीत जाणारा किटकनाशकांचा प्रवाह, वाढत चाललेले कारखाने आणि त्यातुन बाहेर पडनारं पाणी, मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या खाणकामाने चंबलचा घास घ्यायला सुरु केलीय. चंबल मगरींसाठी अत्यंत उत्कृष्ट अधिवास आहे. हीच कथा कमी अधीक प्रमाणात सगळ्यात भारतीय नद्यांची आहे. नागपूरवरुन प्रणय तिजारे नावाचा एक मित्र सामील झाला होता, नाग नदीच्या बाबतीत रिवर फ्रंट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचं त्याचं म्हणनं होतं. रिवर फ्रंट (अहमदाबादच्या साबरमती सारखं!) ने नद्या वाचतील ही फार मोठी अंधश्रद्धा गुजरात मॉडेल ने आपल्याला दिलीय. 
पुण्याचे विनोद बोधनकर सुद्धा या वेळी सोबत होते. अनेक वर्षांपासून विनोदजीं सोबत माझा वार्तालाप आहे. अतीषय संवेदनशील असं हे व्यक्तीमत्व. तिन दिवस दोघही सोबतच होतो. “सागरमित्र” म्हणून ते एक विद्यार्थ्यांसोबत अभीयान चालवतात. प्लास्टीकचं नियोजन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्लास्टीक हे नद्यांच्या मृत्यूचं महत्वाचं कारण आहे. हे सगळं प्लास्टीक शेवटी समूद्रात जातं आणि त्याचे मायक्रोफिल्मस चक्क जैवविविधतेच्या मध्ये जाऊन शरीराचा भाग बनतात. प्लास्टीक बद्दल खुप गांभिर्यानं विचार करण्याची गरज आहे.  
परततांना राजेंद्र सिंह सोबत होते. त्यांना भोपाळला उतरायचं होतं, मी पुढे नागपुरला उतरलो. रेल्वेत उशीरा पर्यंत गप्पा करत बसलो. राजेंद्र सिहांमध्ये पॅशन, करुणा, वात्सल्य असे सगळे गुण एकसाथ नांदतात. कंपॅशन शिवाय पॅशनला काही अर्थ नसतो हे त्यांच्या कडून शिकावं. भेटल्यावर किंवा निरोप घेतांना पाठीवर इतक्या मायेने हात फिरवतात की उगाच आपल्याला गहिवरुन येतं. भेटल्यानंतर घरातल्या सगळ्यांची चौकशी करणे, आमच्या सगळ्या मित्रांची आठवण ठेउन प्रत्येकाबद्दल विचारने हे त्यांच्या कडून सहज घडते. भोपाळला येतांना त्यांच्या जवळ एक अगदीच छोटीसी बॅग होती. भोपाळवरुन ते हैदराबादला जाणार, तिथुन भुवनेश्वर, तिथुन दिल्ली, आणि दिल्लीवरुन जर्मनी. एका छोट्याश्या बॅगमधल्या मोजक्या गोष्टींनी सगळ चालणार. इतकं साधेपण पाहून स्वत:चीच लाज वाटायला लागली.



No comments:

Post a Comment