बदलाचं वारं वाहतय
डा. निलेश हेडा
या वेळी राजस्थानच्या ग्रामिण जीवनाला जवळून बघता आलं. तशीच बकाली, भंणगलेपणा. गरीबी. अभाव. भारतीय गावं स्वत:सोबत अनेकानेक शाप घेऊन जन्माला आलेली वाटतात. पण स्थानिक संस्कृती त्या अभावावर, गरीबीवर चंदनाच्या लेपाचं काम करते, हे राजस्थानच्या ग्रामिण जीवनात मिसळून कळते. या वर्षी पुन्हा उत्तर राजस्थान मध्ये पाऊस नाही. विदर्भासारखीच परिस्थिती आहे. वातावरणातील बदलाचा मोठाच फटका ग्रामिण भारताला बसतोय. येणा-या काळात मोठीच उलथापालथ होणार असं दिसतं. पाणवठ्यांच्या कलेकलेने विकसीत झालेला हा समाज आहे ज्याला सुका आणि ओला दुष्काळ वाईट दिवस दाखवणार आहे. त्याच वेळी पाण्याबद्दल, निसर्गाबद्दल समज नसलेला आणि केवळ "वेग - सिमेंट - लोखंड - प्लास्टीक" यांनीच विकास होतो असं माननारा त्यांचा वर्तमान शाषक वर्ग हे आमच्या काळचं मोठच दुरदैव आहे.पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत आपल्या पुर्वजांच्या पासंगातही आपण बसत नाही. जैसलमेर मध्ये गडीससार तलाव आहे. 1367 मध्ये रावल गडसी सिंघ या राजाने याचं निर्माण केलं. त्यावेळी जैसलमेरची लोकसंख्या ५००० होती. तसेच दररोज २००० उंटावर लादून विविध प्रकारचा माल घेऊन व्यापारी जैसलमेर वरुन आखाती देशात जायचे. या सर्वांना हा तलाव जीवन द्यायचा. या तलावाच्या काठावर एक पुर्णाकृती हत्ती चा दगडी पुतळा आहे. पावसाळ्यात हत्तीचे पाय पाण्यात बुडाले की शहरात दवंडी दिल्या जायची की आता एक वर्ष जैसलमेरला पाण्याची चिंता नाही. हत्ती पाण्यात बुडाला की तिन वर्ष चिंता नाही. हत्तीच्यावर घोड्याची प्रतिमा आहे. घोडा बुडाला की ५ वर्ष चिंता नाही. पाण्याच्या नियोजनाबद्दल खरचं काही गांभिर्यानं शिकायच असेल तर राजस्थान हा आपला गुरु आहे.
या वेळची "नदी खोरे व्यवस्थापनाची" बॅच फार वेगळी होती. जी. बी. पंत इन्स्टिट्युट आफ टेक्नालाजीच्या बांधकाम अभियंत्यांच्या विद्यार्थ्यांना नदीचं परिस्थितीकी तंत्र समजून सांगायचं होतं. आजकालचे विद्यार्थी अतिषय चौकस आहेत. चांगलीच तयारी करुन मैदानात उतरावं लागतं.
शेवटच्या दिवशी अलवर जिल्ह्यातल्या भानगढ़ या प्राचिन उजाड शहराला भेट दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीत याचा कारभार चालतो. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आमेरचे शासक राजा भगवंत दास याने या शहराची निर्मिती केली. राजा मानसिंहाचे बंधू माधोसिंह जे मुगलांचे प्रमूख सरदार होते त्यांनी या शहराला आपली राजधानी बनवलं. प्रत्येकाने एकदा तरी बघावं असं हे शहर. आखीव उजाड झालेल्या बाजारपेठा, सुंदर मंदीरं, व्यवस्थित प्लान केलेली घरं आपल्या पुर्वजांच्या सिटी प्लानिंगच्या सेंसचं उत्तम उदाहरण आहे. उपयोगीतेला सौंदर्याची किणार द्यायची अन्यथा कोणतीच निर्मिती करु नये हा अलिखीत नियम तेव्हा असावा. भारतातली सर्वात शापीत, भितीदायक जागा (The Most "Haunted" Place In India) असा याचा दुष्प्रचार केल्या गेल्यामुळे आता पर्यटकांची संख्या बरीच वाढलेली आहे ! मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भानगढ मधल्या सर्व आत्मा सुट्टीवर गेल्या होत्या!
उत्तर राजस्थान मध्ये आजकाल प्रवासी गाड्यांमध्ये, पानटप-यांवर हरीयानवी भाषेतली पॉप रॉक या पाश्चात्य संगितात मिसळून बनवलेली शृंगार गिते प्रचंड लोकप्रिय होत आहेत. अगदी साधे साधे ग्रामिण शृंगारीक शब्द अन स्थानिक चाली मध्ये तयार केल्या जाणारी ही गाणी (उदा. तू रुप की भरी तिजोरी है, कोई परदेसी मारा जावेगा!) तालुका जिल्हा स्तरावरील युवक यु ट्यूब चॅनेल काढून त्यावर प्रकाशीत करत आहेत. हा वेगळ्याच प्रकारचा सांस्कृतीक बदल आहे. आपण युरोपीयन होतोय. भरपूर गाणी ऐकली ही. मजा आली.
निलेश (सप्टेंबर २०१७)